Pages

Monday, August 22, 2016

ओंजळ

तुझ्या एका झुळुकीने माझे झाड सळसळे
तुझ्या प्रकाशाभोवती माझी तिरीप रेंगाळे

माझ्या देहाचा ठिपका तुझ्या कवेत आभाळ
तुझ्या हातात विसावे माझी फाटकी ओंजळ

होऊ पाहते आधार तुला पावलोपावली
अशी स्वप्नाळू बिचारी माझी अशक्त सावली

तुझे बेभान वादळ तुझे मंथन-तांडव
तुझ्या दारी घुटमळे माझे अबोल आर्जव

तुझ्यातून जन्म घेतो तुझ्यातच विसावतो
श्वास मंथर हिंदोळ देह पार्थिव उरतो

- नचिकेत जोशी (१९/८/२०१५)

Tuesday, August 9, 2016

करवंदांचे सार

लागणारा वेळ: ३०-३५ मिनिटे
लागणारे जिन्नस -
१. करवंदे (कच्ची किंवा पिकलेली कुठलीही चालतील. कच्ची असल्यास सार पिवळसर होईल, पिकलेली असल्यास लालसर. - इति स्त्रोत.)
२. फोडणीचे साहित्य (जिर्‍याची फोडणी, लसूण, कडीपत्ता, तिखट, उडीद किंवा मसूर डाळ)
३. मिरच्या-कोथिंबीर (आवडीनुसार)
४. तिखट-मीठ-गूळ (आवडीनुसार व चवीनुसार)
कृती -
१. लगदाटाईप दिसू लागेपर्यंत गरम पाण्यात करवंदे उकडून घ्यावीत. (इंडक्शन कू़कटॉप वर २०० डिग्रीला साधारण वीस मिनिटे). उकळत असतांना करवंदांचा रंग बदलू लागतो. मी पिकलेल्या करवंदांची केल्यामुळे लालसर रंग आला होता.
२. उकळून झाल्यावर पाणी वेगळे काढून घ्यावे. ते नंतर वापरता येईल.
३. उकळल्यामुळे मऊ झालेल्या करवंदांच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्यांचा गर एकत्र करावा.
४. करवंदांचे बाजूला काढलेले पाणी आणि गर यांची एकत्रित मिक्सरमधून काढून पेस्ट करून घ्यावी. (लसूण आवडत असल्यास तीही घालावी)
५. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात जिरे, तिखट, उडीद/मसूर डाळ घालून ही पेस्ट घालावी.
६. साखरेऐवजी गूळ घालावा. (आवडत असल्यास)
७. उकळी येईपर्यंत मंद आचेवर ठेवावे.
८. करवंदांचे सार रेडी!

विसू: या पदार्थाला बेसनही लावता येते. आम्ही विदाऊट बेसन खाल्ले त्यामुळे मी तशी पाकृ लिहिली आहे.
अवांतरः मी केलेले सार चवीलाही उत्तम झाले होते. (आंबटगोड, मध्यम घट्ट)

स्त्रोतः आंबिवली गावातील (पेठ किल्ला उर्फ कोथळीगडाच्या पायथ्याचे गाव) सौ. सावंत काकू.
दोन वर्षांपूर्वी कोथळीगडाचा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक केला होता. त्यावेळी दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडे जेवणात हे सार होते. या पदार्थाला तिकडे 'करवंदांची कढी' म्हणतात. पण या कृतीमध्ये बेसन पीठ वापरले नसल्यामुळे 'सार' म्हटले आहे. शेवटी नावात काय आहे, असा विचार करायचा आणि सार/कढी जे म्हणू त्याचा - आस्वाद घ्यायचा!

 - नचिकेत जोशी




Monday, August 8, 2016

मित्रा!

तसे पाहता खूप दूरचे होते अंतर मित्रा
तुझ्या सोबतीने येताना झाले सुंदर मित्रा!

किती ठिकाणी पडलो, रडलो, काचांवरती चिडलो!
जखमांवरती तुझी नेहमी आली फुंकर मित्रा!

अता अवेळी कट्ट्यावरची दिसू लागते मैफल
रमून जातो स्मरणांपाशी मग मी क्षणभर मित्रा!

शिक्षण घेताना पडलेले प्रश्न मोजके होते!
तीच उत्तरे शोधत फिरतो आता जगभर मित्रा!

फार लांबच्या स्वप्नांमागे धावत आहे नुसता
दिसते आहे सर्व जवळचे हल्ली धूसर मित्रा!

एकेकाळी वाटायाचे क्षण अपुरे दोघांना
आता नाही वाटत याचे नकोच उत्तर मित्रा!

या मैत्रीचा सुगंध जपणे हीच तिची सार्थकता!
सांग कधी जपता येते का मुठीत अत्तर मित्रा?

तसा एकट्यानेही जमला असता प्रवास सारा
दोघे असल्यामुळे पोचलो बहुधा लवकर मित्रा

कृतज्ञ मी राहीन नेहमी, अमोल या नात्याशी
अजून आहे बोलायाचे - बोलू नंतर मित्रा!

- नचिकेत जोशी (३०/९/२०१४, अश्विन शुद्ध षष्ठी)

Friday, August 5, 2016

... श्रावणाला

दाटते आभाळ त्याच्या स्वागताला
गाठते क्षितिजावरी त्या पावसाला

साजणीला भेटण्या आतूर झाला
वाट आभाळातली सोडून आला

मुक्त पागोळ्या उड्या घेतात खाली
चिंब रांगोळी सुवासिक अंगणाला

थेंब ओघळले तिच्या देहावरी अन्
गंध मोहरता नवा मातीस आला

भेट होऊ द्या अशी एकांत जागी!
पाठवा जमिनीत भिजलेल्या नभाला

वाट ओली पावलांना साद घाली
रान ओले दाखवी भय पाखराला

सातही रंगांमध्ये पाऊस मनभर!
काजळाचा रंग माझ्या श्रावणाला!

- नचिकेत जोशी (१७/६/२०१४)