Pages

Saturday, June 18, 2011

जपणूक

त्याला एकटक पाहत बराच वेळ बसलो होतो मी -
तो स्वतःच पाऊलभर चिखलात बुडालेला.
खाली जुन्या उन्हाने घायाळ झालेल्या जमिनीवर
नुकत्याच आलेल्या फुंकरपावसाचा ओलावा..

स्वतःशीच पुटपुटत त्याने खाली बसून
थोपटलं मातीवर - आणि बाजूला केलं तिला.
खाली होते तिच्या आत रूतलेले तण, कुजलेली मुळं, हट्टी दगड.
ते सगळं काढायला जरा जडच गेलं त्याला,
पण त्याने काढले - निर्विकारपणे ओढून ओढून!

सनातन आदिम श्रद्धेने आकाशाकडे पाहिलं मग!
आणि धोतराच्या सोग्यात बांधून आणलेले मूठभर कोवळे दाणे पेरत बसला..
मग अपार जिव्हाळ्याने बराच वेळ माती पुन्हा सारखी केली
आणि घाम पुसत शांतपणे खाली बसला.
सगळं झाल्यावर माझ्याकडे लक्ष गेलं त्याचं.
हसला, म्हणाला - खणावं लागतं अधूनमधून -
मोकळं करायला, मोकळं व्हायला,
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...

तिथून निघताना मी भलत्याच विचारात!
आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...


- नचिकेत जोशी (१६/६/२०११)