Pages

Showing posts with label भटकंती. Show all posts
Showing posts with label भटकंती. Show all posts

Wednesday, January 10, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग ३

महाबळेश्वरात यायला आणि महाबळेश्वरातून जायला संध्याकाळी सातनंतर एसटी नाही. पसरणी आणि आंबेनळी-पोलादपूर घाटातून रात्री एसटी जात नाहीत. साडेआठला आर्थरसीटला पोचल्यामुळे महाबळेश्वरातून मेटतळ्यात जायचे सर्व शासकीय वाहनांचे पर्याय बंद झाले होते. मग टेंपोवाल्यालाच मेटतळ्यात सोडायला विनवलं. तोही तयार झाला, हे नशिब. जाता जाता सचिनला महाबळेश्वर एसटी स्टँडला सोडलं. त्याला दुसर्‍या दिवशी एका फ्यामिली फंक्शनला जायचं होतं. त्याला बरेचदा सांगून पाहिलं, की 'सांग एसटी नाही मिळणार एवढ्या रात्री आणि म्हणून नाही येवू शकणार. किंवा फोन बंद करून टाक' वगैरे वगैरे. पण तो बधला नाही. (पुढच्या ट्रेकचं भविष्य आपल्याच कर्माने संकटात टाकायला कुठलाही कुटुंबधारी ट्रेकर तयार होत नाही, ह्याचं हे उदाहरण!) महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर राहू देत नाहीत, हे त्याच्यामुळे आम्हाला कळलं. रात्री त्याला म्हणे पोलिसांनी स्टँडवर मुक्काम करू दिला नाही. मग त्याने मुकाट्याने हॉटेलमध्ये मुक्काम केला. (पण पुण्याकडे जायचा निश्चय अजिबात बदलला नाही!)

मेटतळ्यामध्ये पोचायला साडेनऊ झाले. तिथल्या एका हॉटेलमध्ये जेवणाचं आधीच सांगून ठेवलं होतं. तिथेच राहण्याचीही सोय झाली. जेवताना 'उद्याचा प्लॅन' ह्यावर थकलेल्या मेंदूंची चर्चा झाली. विरागच्या MI2 Wrist Band नुसार ढवळे गाव ते आर्थरसीट पॉईंट ह्यात आज आमची ३९००० पावलं चाल झाली होती. अंतरात सांगायचं झालं तर २४.८८ किमी एवढं चालून आलो होतो. (म्हणजे ढवळे गाव ते आर्थरसीट हे २४.८८ किमी आहे, असं नसून, जेवढी पावलं आम्ही चाललो ते सगळं मिळून तेवढे किमी भरलं. ह्यात चंद्रगड चढाई-उतराईसुद्धा आली.) एका जहाल गटाचं म्हणणं होतं, की 'काही रडतोंडी नको आणि दाभिळ नको. हवंतर महाबळेश्वरात फिरू आणि संध्याकाळच्या एसटीसाठी डायरेक्ट महाड गाठू' (रविवारी संध्याकाळची महाड-पुणे आणि महाड-मुंबई एसटी रिझर्व्हेशन्स झालेली होती). तर दुसरा गट मवाळ होता. त्याचं म्हणणं होतं, 'फक्त रडतोंडी घाट करू आणि वाडा कुंभरोशीतून पोलादपूर आणि मग महाड गाठू. दाभिळ स्किप करू'. मी आणि आणखी एक-दोघे तिसर्‍या गटात होतो. 'पूर्ण ट्रेक ठरल्याप्रमाणेच करायचा' हा आमचा हेका. वास्तविक, मी इतका दमलेलो होतो, की उद्या सकाळी किती वाजता उठेन ह्याचीही मला कल्पना नव्हती. पण हातातोंडाशी आलेला जबरदस्त ट्रेक अर्ध्यावर सोडायची मनाची तयारी नव्हती.

त्या रात्रीच्या झोपेने खरोख्खर किमया केली. सकाळी उठलो तेव्हा बरंच फ्रेश वाटत होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी नाष्ट्याला जमलो तेव्हा तीनही गटांचं प्लॅनमिलन झालं होतं. 'रडतोंडी आणि दाभिळ दोन्ही वाटा करायच्या'.  विरागने काही जणांकडून स्ट्रेचेस करून घेतले. बाकीच्यांनी लांबूनच हात (स्ट्रेच करून) जोडले. मला ह्या शरीर विलक्षण लवचिक असणार्‍या लोकांचं कौतुकच वाटतं. माझे तर दोन्ही हात - एक मानेवरून आणि दुसरा कमरेवरून असे पाठीवर नेले तरी एकमेकांना भेटत नाहीत. ह्या 'स्ट्रेचर' लोकांचे तर सगळे अवयव त्यांच्या मनानुसार वळतात, वाकतात आणि जुळतातसुद्धा! (मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे - समर्थ रामदास)

मेटतळे गावातूनच रडतोंडी घाट सुरू होतो असं ऐकलं/वाचलं होतं. महाबळेश्वर-पोलादपूर हायवेच्या उजव्या बाजूला मेटतळे गाव आहे आणि डाव्या बाजूला दरी. (जिथे दरी नाही, तिथे गावातली घरं-मंदिरंही आहेत) तर अशा मेटतळे गावातून घाट सुरू होतो म्हणजे नक्की कुठून हे कळेना. ओंकारच्या (उर्फ आदरणीय सह्याद्रीगूगल) मते 'समजा मेटतळे नावाचं एखादं घर असेल, तर त्याच्या एखाद्या दरवाजातून घाट सुरू होतो' असं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर, काल चिकार चाल झाली होती, आणि आजही नक्की किती उतरून जायचंय हे माहित नव्हतं. पुन्हा पारगाव ते वाडा कुंभरोशी ह्या दहा-बारा किमी अंतरासाठी गाडी मिळालीच नाही, तर ती चाल नक्की होती. म्हणून सुरुवातीलाच वाट चुकायला नको ह्या सद्हेतूने हॉटेलवाल्याकडे चौकशी केली - 'रडतोंडी घाटाची सुरूवात कुठून आहे?'. त्याला हे असं काही घाटाचं नाव आहे हेच माहित नव्हतं! मग 'शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ज्या वाटेने पारमध्ये उतरवलं ती वाट दाखवा' असं सांगितलं. त्याला फक्त 'पार' कळलं आणि त्याने त्याच्या हॉटेलमधल्या एकाला आम्हाला वाट दाखवायला पाठवलं.

मेटतळे गाव संपल्यानंतरच्या (बहुतेक) पहिल्याच वळणावर महाबळेश्वर-पोलादपूर घाटरस्त्याची संरक्षक भिंत फोडलेली आहे. हीच ती इतिहासप्रसिद्ध रडतोंडी घाटाची सध्याच्या काळातली सुरूवात. आमच्या वाटाड्याला आम्ही पुन्हा पुन्हा विचारत होतो की 'हीच बरोबर वाट आहे ना?' त्यावर त्याने दोन-तीन मिनिटे काहीतरी संवाद केला. त्यावरून आम्हाला एवढंच कळलं, की तो एक 'शिवभक्त मावळा' आहे. अखेर आमच्यातही मतभेद व्हायला लागले. अनिरुद्ध तर समोर पायवाटांमधल्या हायवेसारख्या दिसणार्‍या प्रशस्त वाटेने चालायलाही लागला. ती वाट खालीच चालली होती म्हणजे कुठेतरी नक्की पोचली असती. मला मात्र रडतोंडी घाटानेच उतरायचे होते. म्हणून मी रडतोंडी घाटाची खात्री झाल्याशिवाय एक पाऊलही उतरायला तयार नव्हतो. जर अर्ध्या वाटेवर गेल्यावर समजलं असतं की हा रडतोंडी घाट नाहीच, तर केवढी पंचाईत झाली असती? (मग ज्या वाटेने आम्ही गेलो तिलाच रडतोंडी घाट म्हणून ब्लॉगमध्ये लिहावं लागलं असतं, ते वेगळंच!) त्या वाटाड्याला एवढंच माहित होतं की 'ही वाट घोघलवाडीला जाते. थोडं उतरून गेल्यावर मध्येच एक वाट फुटते - ती दुधोशीला जाते. तुम्ही ह्याच वाटेने जावा.' अखेर त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला निरोप दिला आणि त्याच वाटेने निघालो. वाटेत एक गावकरी भेटला. त्यानेही वाटाड्याचीच माहिती दिली. पण त्याच्याकडून आणखी एक माहिती मिळाली की पारसोंड गावात अकरा वाजता एसटी येते. हे तर फारच बरं झालं. कारण एसटीमुळे आमचा पारसोंड (उर्फ पार) ते वाडा कुंभरोशी टप्पा पार पडणार होता. एरवी हे अंतर डांबरी रस्त्याने चालावे लागले असते.

रडतोंडी घाट मात्र अप्रतिम आहे. दोन्ही बाजूला दगडी कुंपण (आता ढासळलं आहे, पण तरी ओळखू येईल इतपत आहे), पायर्‍या आणि छान वळणं घेत जाणारा प्रशस्त घाट. ह्याच वाटेने अफझलखानाला आणि त्याच्या सैन्याला महाराजांनी पारगावापर्यंत आणलं होतं. काहींच्या मते हा घाट थेट महाबळेश्वरातून सुरू होतो. बाँबे पॉईंटकडे जाणार्‍या वाटेपाशी मूळ सुरूवात आहे. हे खरेही असावे. कारण, वाईतून डोंगर चढून महाबळेश्वरला खान आला. पारकडे खाली उतरायची सुरूवात महाबळेश्वरातूनच होणे हे पटण्यासारखेच आहे. पण, तिथून सुरू होणारी वाट मेटतळ्यात हायवेला मिळते आणि पुन्हा डोंगरात उतरते. म्हणून आम्ही मेटतळ्यातून उतरायचं ठरवलं. हा घाट खास खानासाठी महाराजांनी बांधला. आता बराच सोपा वाटत असला तरी त्या काळात तो भयानकच होता. महाबळेश्वर खोर्‍यातली त्यातल्या त्यात बरी दिसणारी एक वाट म्हणजे हा घाट असं म्हणायला हरकत नाही. शेवटच्या टप्प्यात झाडी आहे. अगदी पूर्ण सावली! झाडांझाडांवर दिशादर्शक खुणा म्हणून हिरव्या/भगव्या रिबिनी लावलेल्या आहेत. 'जावळीची आल्हाददायक जंगलशोभा अनुभवायला खानसाहेबांनी सैन्यासह यावे' हा आग्रह खानापाशी महाराजांच्या वकिलांनी धरला होता. त्यामागचा हेतू वेगळा असला, तरी 'आल्हाददायक जंगलशोभा' मात्र ह्या घाटात आहेच, ह्यात शंका नाही.

तो घाट अवघ्या चाळीस मिनिटात उतरून घोघलवाडीत आलो. तिथून डांबरी रस्त्याने कोयनेवरचा शिवकालीन पूल ओलांडून पारगावात पोचलो. रडतोंडी घाटाने उतरलेल्या अफझलखानाला पारगावात जाण्यासाठी वाटेतली कोयना नदी ओलांडता यावी म्हणून कोयनेवरचा तो पूल महाराजांनीच अफझलखानासाठी बांधला असं म्हणतात. (अफझलखानाची भेट आणि एकूणच लढाई हे शिवरायांच्या युद्धतंत्राचा आणि नियोजनाचा एक मास्टरपीस आहे, हे जाता जाता लिहून ठेवतो.) पारगावात रामवरदायिनीचं दर्शन घेऊन एसटीने वाडा कुंभरोशीला उतरलो. तिथून टेंपोने दाभिळ टोक. दाभिळ टोकापासून जावळी खोरं, आर्थरसीट, महाबळेश्वर हा सगळा आसमंत सुरेख दिसतो. खाली लहुळसे गाव दिसतं (आम्ही त्याला दाभिळ समजत होतो). चंद्रराव मोर्‍यांवर हल्ला करण्यासाठी महाराज ज्या वाटेने जावळीत उतरले ती निसणीची वाट तसंच जावळीचं खोरं हेही दिसतं. आर्थरसीट पॉईंट दिसतो. चंद्रगड कुठे असेल, ह्याचा अंदाज करता येतो.

दाभिळ गावात उतरणे हा आमच्या ट्रेकचा शेवटचा टप्पा होता. दाभिळ टोकाखाली दाभिळ गाव आहे. ह्या संपूर्ण वाटेवर पायर्‍या आहेत. पायर्‍या सुस्थितीत नाहीयेत, पण जुन्या काळी ही एक प्रचलित वाट होती हे लगेच कळतं. आजही दाभिळ गावातून डांबरी रस्त्याहूनही कमी वेळात महाबळेश्वरकडे येणारी हीच एक वाट आहे. आम्हाला दाभिळ टोक ते दाभिळ गाव ह्यासाठी अर्धा तास (गावकर्‍यांच्या चालीने २० मिनिटे) पुरतील असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात एका सपाटीवरून ही वाट डावीकडे वळते आणि मग अगदीच संथ उतारांनी, लांबच्या लांब वळसे मारत (एकदाची) दाभिळमध्ये उतरते. ही वाट उतरायला आम्हाला जवळजवळ एक तास लागला. (आदल्या दिवशीच्या थोडाफार थकव्याचा परिणाम असेलही)

दाभिळमध्ये पोचलो तेव्हा एक वाजला होता. दाभिळहून चार वाजता पोलादपूर एसटी होती. एवढा वेळ वाट पाहण्यापेक्षा एक जीप ठरवून कापडा गाठलं. (पोलादपूर-महाबळेश्वर हायवेवरचं कापडा हे गाव). तिथून टमटमने पोलादपूरला पोचलो. चौकातल्याच हॉटेलमध्ये सामिष-निरामिष जेवणाची ऑर्डर दिली. पोलादपूरच्या त्या हॉटेलात सुरमई थाळी ३०० रुपयांना होती. (लोक शहर महागडी असतात म्हणून उगाच शहरांना नावं ठेवतात). बिल आल्यावर ही गोष्ट कळल्यामुळे नाईलाज झाला. महाडमध्ये पाच वाजताच पोचलो. साडेसहाच्या एसटीला तुडुंब गर्दी होती. पुण्यात पोचायला रात्रीचे बारा वाजले.

ढवळे ते आर्थर ते दाभिळ (मार्गे चंद्रगड, रडतोंडी घाट) हा 'सुईदोरा ट्रेक' अशा प्रकारे संपला. मला 'सुईदोरा ट्रेक'चे दोन अर्थ वाटायचे. पहिला, ज्या ट्रेकला सुईदोर्‍यापासून सगळं न्यावं लागतं. आणि दुसरा - अवघड ट्रेकमध्ये भीतीने किंवा चढाई-उतराईमध्ये 'फाटलेली' शिवण्यासाठी सुईदोरा न्यावा लागतो असा ट्रेक म्हणजे सुईदोरा ट्रेक. खरा अर्थ 'सुईतून दोरा ओवताना जसा यू-टर्न मारून दोरा पुन्हा मूळ दिशेने येतो, तशा प्रकारचा मार्ग असलेला ट्रेक' हा आहे. आम्ही ढवळ्यातून (कोकणातून सुरू करून आर्थरसीटपर्यंत जाऊन पुन्हा दुसर्‍या मार्गाने कोकणात उतरलो होतो).

एक विलक्षण ट्रेक संपला. मागे उरल्या त्या आठवणी.  काही वर्षांनी मागचं आठवताना हे उद्योग नक्की आठवावेत, ह्यासाठीच लिहिण्याचा हट्ट. खरं सांगायचं तर आम्हाला वेळेची बंधनं होती (स्पेशली ढवळे-आर्थरसीट ट्रेकसाठी) म्हणून आम्ही जरा काटेकोरपणे वागलो. अन्यथा वाटा चुकाव्यात आणि आपलं आपण शोधत कुठेतरी पोचावं, इतका सुंदर हा जावळी प्रदेश आहे. इथला सह्याद्री एक वेगळीच घनदाट माया करतो. इथे पावलापावलावर सावली आहे. रानाचं भय आहेच पण आपली पावलं जर मुघली आणि आदिलशाही मनसुब्याची नसतील, तर आपल्याला भ्यायचं कारण नाही. पाठपिशवी घ्यायची, मनात उत्साह आणि छातीत इथला भर्राट वारा भरायचा आणि निघायचं - पुढचं सगळं सह्याद्रीबाबाच्या भरोशावर सोडायचं!

************

एकाही फोटोशिवाय नुसत्या शब्दांतून वर्णन केलेलं एवढं सगळं वाचायचं, आणि समजून घ्यायचं ह्यासाठी तिसरा डोळा असावा लागतो. प्रिय वाचकहो, तो तुम्हाला आहे ही माझी खात्री झालेली आहे. ह्या चिकाटीला पुन्हापुन्हा सलाम. हा ट्रेक आयोजित केल्याबद्दल, आणि त्यासाठी घेतलेल्या आवश्यक मेहनतीबद्दल नरेशकाका उर्फ गिरी ह्यांनाही सलाम. (पुढचा ट्रेक लवकर ठरवा ही विनंती).

तर दोस्तहो, भेटूच, पुन्हा असंच कुठेतरी, केव्हातरी, कुठल्यातरी आडवाटेवर.
शुभास्ते पन्थानः सन्तु |

(पुढचा भाग शेवटचा: फक्त फोटो)
- नचिकेत जोशी

Tuesday, January 9, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २

ह्या ट्रेकचं एक वैशिष्ट्य म्हणजे, जिथे चाललोय ते ठिकाण जिथून सुरुवात करतोय त्या ठिकाणापासून मुळीच दिसत नाही. उदाहरणार्थ, ढवळे गावातून चंद्रगड दिसत नाही. चंद्रगडावरून ढवळे घाटवाट दिसत नाही. ढवळे घाटातून घुमटी दिसत नाही. घुमटीपासून जोरचे पाणी दिसत नाही. जोरच्या पाण्यापासून आर्थरसीट पॉईंट दिसत नाही. (आणि ह्या जंगलात हरवलं, तर कुणीच कुणाला दिसत नाही). जिथे चाललोय तिथे ते आहे, ह्या एकमेव भरोशावर करायचा हा ट्रेक आहे.

ढवळ्यात पोचलो, तेव्हा चिकार वारं सुटलं होतं. 'ओखी' वादळामुळे सह्याद्री माथ्यावर आणि कोकणात 'येत्या ४८ तासात पावसाची शक्यता' नेमकी आदल्याच दिवशी प्रसारित झाली होती. 'येवढं वारं पावसाळ्यातही नव्हतं इथं' - इति गाईड रवी मोरे. मग काय! उद्या संध्याकाळी महाड-पुणे एसटीत बसेपर्यंत पाऊस पडू नये किंवा अगदी दाभिळ गावात पोचेपर्यंत पाऊस नको अशी प्रार्थना करण्यापलिकडे हाती काहीच नव्हतं. सह्याद्रीत, त्यातही जावळीत असताना पाऊस लागला तर काय हाल होतात, हे इतिहासालासुद्धा माहित आहे. तिथे आमची काय कथा!

स्थानिक गावकरी कम ढवळे घाटाचा एकमेव गाईड रवीदादा मोरेंकडे चहा नाष्टा झाला. ढवळ्यातून चंद्रगडावर पोचायला दीड एक तासांची चढाई होती. गडावर पाणी आहे. पण, त्यानंतर मात्र थेट बहिरीच्या घुमटीजवळच पाणी आहे. म्हणजे एकदा चंद्रगड सोडला, की पुढचे कमीत कमी पाच तास कुठेही पाणी नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे कमीत कमी तीन लिटर पाणी घेऊनच मग निघायचं ठरलं. (मी सवयीप्रमाणे चार लिटर घेतलं. मग सॅक व्हायची ती जड झालीच, त्याला इलाज नाही.)

ढवळे गावातून निघायला साडेसात वाजले. आमच्यासोबत रवीदादांचे वडील कोंडिरामबाबा (वय सत्तर) बहिरीच्या घुमटीपर्यंत वाट दाखवायला येणार होते. मला तर ह्या ट्रेकसाठी जी माहिती मिळाली होती, त्यावरून गाईड अजिबात घेऊ नये असंच वाटत होतं. वापरात असलेला, एकाच पायवाटेने घनदाट जंगलातून एकाच पायवाटेने वळणं घेत घेत जाणारा घाट म्हणजे ढवळे घाट! फक्त एक दोन वळणं लक्षात ठेवली आणि आजूबाजूचे डोंगर लक्षात ठेवले की झालं, असं जवळजवळ प्रत्येकाने सांगितलं होतं. त्यामुळे गिरीशी बोलताना एक-दोनवेळा "जाउ रे आपलं आपण, सगळे चालणारे, वाटा शोधण्यात तरबेज आहेत" असे प्रस्ताव मांडले होते. त्याने सुदैवाने ते मनावर घेतले नाहीत. 'बघू, तिकडे गेल्यावर ठरवू' असं म्हणून त्याने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली.

आम्ही प्लॅनपेक्षा अर्धा ते एक तास उशीरा निघालो होतो. पाठीवर दहा-एक किलोचं ओझं घेऊन चालताना सपाट वाटेवरही दम लागत होता. ढवळे गावापासून दहा मिनिटांवर धनगरवस्ती आहे. त्या गावात चक्क संडास बांधलेले पाहून माझा दम लागल्यामुळे आधीच फुलून आलेला उर अभिमानानेही भरून आला! उशीरापर्यंत टिकलेल्या पावसामुळे झाडोरा चिकार होता. वाटा लपलेल्या होत्या. धनगरवाडीपासून सहज दिसणारी पायाखालची वाट सोडून म्हातारबाबांनी झाडीतली न दिसणारी वाट पकडली आणि 'गाईड का घेतला' ह्याचं पहिलं उत्तर मिळालं. उशीरा संपलेल्या पावसामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला गवत छातीच्या उंचीपर्यंत होतं, आणि वाट त्यात लपलेली होती. ती वाट पकडली आणि लगेचच अंगावर येणारी चढाई सुरू झाली. चंद्रगडाचा चढ खरोखरीचा छातीवर येतो. अक्षरशः कमी वेळात आपण जवळजवळ पन्नास-एक फूट चढून जातो.

वाट चालताना म्हातारबाबांशी ओळख होत गेली. गडावर उघड्या चौकोनी खड्ड्यात दगडात कोरलेलं शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे. म्हातारबाबा गेली ३६ वर्ष दरवर्षी महाशिवरात्रीला नेमाने पूजेसाठी जातात. त्यादिवशी गडावर मोठी यात्रा भरते. ढवळे आणि आसपासच्या गावातलेच नव्हे, तर गावातून कामानिमित्त मुंबईला वगैरे गेलेलेही त्या दिवशी आवर्जून गावाकडे येतात. म्हातारबाबांचं उभं आयुष्य ढवळे खोरं आणि त्या भागातल्या जंगलात गेलं आहे. आमचा प्लॅन ऐकल्यापासून ते सांगू लागले, "ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं. सामान देवळात ठेवायचं आणि फक्त एक छोटी बॅग घेऊन चंद्रगड करायचा. दिवेलागणीपर्यंत खाली उतरायचं, आणि झोपून जायचं. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता ढवळे घाटाला लागायचं. ११ वाजेपर्यंत घुमटी, आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट!" ही वाक्यं पुढे दिवसभरात त्यांनी कमीत कमी दहा वेळा ऐकवली.

चंद्रगडावर पोचायला सव्वानऊ वाजले.  गडावर त्या दिवशी भन्नाट वारं सुटलं होतं. गडावरून आसमंत सुरेख दिसतो. कोळेश्वर, रायरेश्वरचे विस्तीर्ण डोंगर, मंगळगड, प्रतापगड हे विविध दिशांना दिसतात. पश्चिमेला ढवळे खोरं, त्यापलिकडे महादेव मुर्‍हा (मुर्‍हा म्हणजे विस्तीर्ण पठार) दिसतात. आर्थरसीट पॉईंटकडे जाताना लागणारी सापळखिंड, घुमटीचा डोंगर हे गडावरून खुणेने दाखवता येतात. चंद्रगड हा भोवतालच्या डोंगरांच्या तुलनेत अगदीच खुजा आहे. (हे घुमटीपाशी किंवा ढवळे घाटाच्या शेवटच्या टप्प्यात गेल्यावर प्रकर्षाने जाणवतं) गडाच्या उत्तर टोकाच्या कड्याच्या पोटात थंड पाण्याचं टाकं आहे. गडफेरी झाली.चंद्रगड चढताना रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरून घेतल्या. कारण आता वाटेत पाणी कुठेही मिळणार नव्हतं.

चंद्रगडाची उंची साधारण २३०० फूट. ढवळे घाटाची वाट ढवळे गावापासून सुरू होते आणि चंद्रगडाला उत्तरेकडून पायथ्यातून वळसा घालून उजवीकडे वळते. चंद्रगडावरून ढवळे घाटाच्या वाटेला लागायचं असेल तर पुन्हा ढवळे गावापर्यंत यायची गरज नाही. चंद्रगडाच्या अंतिम टप्प्यातली कातळांतून चढणारी वाट जिथे सुरू होते, तिथेच उजवीकडे गडाला थोडा वळसा घालून खिंडीच्या दिशेने एक वाट जाते. त्या खिंडीतून एक वाट जवळजवळ पन्नास-साठ अंशात सलग खाली उतरत ढवळे घाटाच्या वाटेला जाऊन मिळते. आम्ही ह्या वाटेने उतरलो. ह्या वाटेबद्दल नेटवर वाचलं होतं. पण त्यात जे वर्णन होतं, तेवढी खतरनाक वगैरे नाही वाटली. गायदरा घाट, गुहेरीचं दार वगैरे केलेल्यांसाठी ही वाट सोपी आहे. पण ह्या वाटेला कुठेही सपाटी नाही. सतत खालीच उतरत जाणारी ही वाट संपवायला आम्हाला दीड तास लागला. डावीकडून उजवीकडे जाणार्‍या ढवळे घाटाच्या वाटेला एका बेलाच्या झाडापाशी ही वाट छेदून सरळ जाते. (म्हणजे तिठा नाहीये!) जर ढवळे घाटाची वाट क्रॉस करून पुढे गेलो, तर वाट नेईल तिकडे जावं लागतं. (गाईड का घेतला ह्याचं दुसरं उत्तर!) आम्ही त्या बेलापाशी पोचलो, तेव्हा (घड्याळात) बारा वाजले होते. ही जागा बहुधा ढवळे गावाच्याच उंचीवर किंवा त्याहून किंचित अधिक उंचीवर असावी. म्हणजे आर्थरसीट पॉईंटपर्यंत आता पुन्हा चार हजार फुटांची चढाई करावी लागणार होती. ढोबळमानाने, दोन टप्प्यात हा ट्रेक समजता येतो. ढवळे ते सह्याद्रीच्या सरासरी उंचीवरची बहिरीची घुमटी हा पहिला टप्पा आणि घुमटी ते आर्थरसीट पॉईंट हा दुसरा टप्पा. बेलाच्या झाडाजवळची वेळ - दुपारी बारा! इथून बहिरीच्या घुमटीपर्यंत पोचायला चार तास लागतील - इति म्हातारबा! "म्हणून मी काय सांगत होतो, ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं.... आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट! (इच्छुकांनी गाळलेल्या जागा ह्याच लेखातून इतरत्र शोधून भरून घ्याव्यात)"

इथून पुढच्या घुमटीपर्यंतच्या वाटेने व्यक्तिशः माझा पार दम काढला. गच्च झाडीतून, काट्या-फांद्यातून कमालीच्या संथ चढाची ही वाट अक्षरशः जीव काढते (माझा काढला). कमालीचा संथ चढ, माती, अनियमित उंचीचे दगड हे सगळं एकत्र म्हणजे कसोटीच! हा भाग म्हणजे जावळीचा ऐन गाभा म्हटलं तरी चालेल. दोन्ही बाजूंना जंगल. आणि जंगल कसलं? तर रानडुकरं, बिबट्यांचा वावर असलेलं. म्हातारबाबांनी परतीला सोबत म्हणून आपल्या एका चुलत्यालाही सोबत घेतलं होतं. ह्या वाटेच्या उजवीकडे सलग सापळखिंडीची डोंगर-रांग आहे, पण ती जाणवतही नाही, इतकी झाडी आहे.  ह्याच वाटेवर एक सुखद आश्चर्य आमची वाट पाहत होतं. (नाही नाही, बिबट्या वगैरे नव्हता वाटेत).

बेलाच्या झाडापासून ढवळे घाटाच्या वाटेवर अंदाजे पंधरा मिनिटांवर एके ठिकाणी पाणी मिळालं. डिसेंबरचा पहिला आठवडा असल्यामुळे आणि पाऊस उशीरापर्यंत लांबल्यामुळे नदीला पाणी होतं. तिथे जवळजवळ पाऊण तास काढला. हे पाणी जर मिळालं नसतं, तर घुमटीशिवाय अधेमधे कुठेही पाणी नव्हतं. आमच्याकडे शिल्लक असलेल्या पाण्यावर घुमटीपर्यंत पोचणं फारच अवघड झालं असतं असं मागाहून वाटलं. जंगलात, ट्रेकमध्ये सर्वात जास्त आनंद ज्या ज्या गोष्टींमुळे मिळतो, त्यातली एक वरच्या क्रमांकाची गोष्ट म्हणजे पाणी सापडणे. पाणी पिऊन, भरून घेतलं. घुमटीला पोचल्यावरच जेवायचं असं ठरल्यामुळे खजूर-चिक्की-भेळ-वड्यांचा नाष्टा करून घेतला. आणि निघायला एक वाजला.

बेलाच्या झाडापासूनच आमच्या गृपमध्ये 'फाटाफूट' व्हायला सुरूवात झाली होती. अनि, कुशल, पवन सातत्याने आघाडीवर होते. मी, संजय कटाक्षाने मधल्या फळीत होतो. विराग कधी आमच्यासोबत तर कधी आघाडीवर असायचा. गिरी सातत्याने मागे राहायला लागला होता. त्याच्यासोबत अशा बिकट परिस्थितीत 'आपली जबाबदारी' ओळखून सतीश, इंद्रा, यो, रोमा (हे मुलाचं नाव आहे. 'रोहित मावळा'चा शॉर्टफॉर्म) गिरीसोबत राहत होते. गिरीने म्हणे कधीतरी 'माझ्याच्याने होत नाही, मी माघारी चाललो' असे उद्गार काढले असं ऐकलं. पण त्या पाण्यापासून पुढे निघणारं प्रत्येक पाऊल माघारीची शक्यता संपवत होतं. डोंगररांगांमधल्या भटक्यांमध्येही किल्ले आवडणारे, घाटवाटा आवडणारे, सुळके आवडणारे असे प्रकार असतात हे मला हल्लीच कळू लागलं आहे. सतीश हा कातळ-कपार्‍यांत रमणारा. सरळसोट सुळक्यावर चढणे हा त्याचा आवडता छंद. ह्याच्यामुळेच आणि कुशल, सुनिल सारख्या मातबर लोकांमुळे आमची लिंगाणा मोहिम सुखरूप होऊ शकली होती. ढवळे घाटातून सरळ घुमटीवर नेणारा एखादा सुळका असता तर आम्ही पायवाटेने वर पोचायच्या आत सतीश तिथे सुळक्यावरून पोचला असता, असं मला वाटत राहिलं.

इथून पुढे घुमटीपर्यंत पोचणार्‍या वाटेबद्दल लिहिण्यासारखं फारसं काहीच नाही. घनदाट जंगल, घसरवणारी माती, पायात येणारी झाडांची मुळं-खोडं, त्यातून सतत संथपणे वर चढत जाणारी वाट. पाठीवर ओझं नसतं तर कदाचित हा चढ सुसह्य झालाही असता. ह्या वाटेवरच्या एका स्वानुभवावरून गझलेचा एक मतला सुचला, तेवढा लिहून ठेवतो फक्त -

'खोडाने  घसरवले होते
फांदीने सावरले होते'

ह्यावर अजूनतरी पुढे काही सुचलेलं नाही.

सापळखिंडीच्या शंभर-एक फूट अलिकडे वाट झपकन डावीकडे वळते. ढवळे घाटाची वाट वाटते तितकी सोप्या सरळ भूभागातून जात नाही. आता सरळ जायचं असं वाटत असतानाच वळण येतं. डावीकडची सोंड चढायची हे माहित असतं, पण त्या सोडेंच्या सुरूवातीपाशी पोचेपर्यंतही आणखी एक सोंड असते. ह्या संपूर्ण वाटेवरून घुमटी किंवा जोरचं पाणी अजिबात दिसत नाही. उंच डोंगराच्या धारेवर कुठेतरी अंदाजाने समजतं, की तिकडे घुमटी आहे. आर्थरसीट पॉईंट तर कुठूनच दिसत नाही. त्याचं दर्शन जोरच्या पाण्याच्याहीवर वीस-एक मिनिटं चढून गेल्यावर होतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, चंद्रगड सोडल्यापासून उरलेला अख्खा दिवस आम्हाला सूर्यदर्शनही झालं नाही. उजेड भरपूर होता, पण पूर्ण वाट एकतर घनदाट सावलीतून तरी आहे किंवा मग नुसत्या नैसर्गिक उजेडात तरी. वाचायला गंमत वाटेल, पण चंद्रगडानंतर थेट दुसर्‍या दिवशी दाभिळ टोकावरून उतरतानाच आम्ही सूर्य पाहिला. (अपवाद एकचः जेवणं झाल्यावर घुमटीपासून अस्ताला जाणारा आणि आमच्या उर्वरित ट्रेकसाठी आशीर्वाद देणारा सूर्य दिसला.)

ढवळे घाटातल्या किर्र जंगलात सोबत्यांकडून गझल ऐकवण्याची फर्माईश झाली. काही क्षण त्यानिमित्ताने पाठीला विसावा मिळाला.

'दूरवर कोठेतरी असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की' 

त्यानंतर आणखी एक गझल सादर केली. दोस्तांनी रेकॉर्ड करून घेतली.

एव्हाना आमच्यातले काही जण खूप मागे पडले होते. ट्रेकमध्ये आपल्या मागून येणारं कुणीतरी आहे, ही भावना कधीकधी खूपच हुरूप आणते. ती अशाअर्थी, की त्यांच्या निमित्ताने आपल्यालाही हवा असेल तेव्हा दम खाता येतो. ह्या ट्रेकला मी ती संधी अनेकदा साधून घेतली (पेशल थॅंक्स टू गिरी). सगळेच जण झपाझपा चालणारे असते, तर माझ्यामुळे त्यांना उशीरच झाला असता.

घुमटीच्या अलिकडच्या सोंडेवर म्हातारबाबांनी आमचा निरोप घेतला.  "बाबांनु! नीट जावा. मला गुरं पाजायला जायचं हाये. आता न्हाय निघालो तर घरी पोचायला लै उशीर होईल. पण लक्षात ठेवा. ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं....".  म्हातारबा खरंच छान होते. उभं आयुष्य ज्या जंगलात गेलं, तिथली प्रत्येक वाट त्यांच्या माहितीची होती. खरंतर ते घुमटीपर्यंत येणार होते. पण एव्हाना चार वाजून गेले होते. त्यांना माघारी ढवळ्यात पोचायला तीन तास तरी लागले असते. वाट किर्र जंगलातून होतीच, पण वन्य श्वापदांचीही चाहूल त्या रानात होती. (रात्री फोन केल्यावर कळलं, की त्यांना घरी पोचायला पावणे आठ वाजले.)

त्या सोंडेपासून त्यांनी वाट दाखवून दिली. पुढची वाट थोडी सोपी होती. एका बाजूला कडा, दुसर्‍या बाजूला दरी. मुख्य म्हणजे चढ नव्हता. तो ट्रॅव्हर्स थेट घुमटीलाच वर चढला. आम्ही जे पाच-सहा जण पुढे होतो, त्यांना घुमटीला पोचायला साडेचार वाजले. इथे पोचेपर्यंत वैयक्तिकरित्या मी प्रचंड दमून गेलो होतो. घुमटीच्या अलिकडे डोंगराची एक सोंड अख्खीच्या अख्खी चढून यावं लागतं. ह्या सोंडेमध्ये एके ठिकाणी कातळात कोरलेला एक हनुमान आहे. ह्या सोंडेने माझा सगळा दम काढला. ही सोंड संपतच नव्हती! मागून येणारे पाच-सव्वापाच पर्यंत आले.

घुमटीपासून दहा एक मिनिटं चालल्यावर पाण्याचं एक टाकं आहे. इथून जोर गावाकडे जाण्यासाठी एक वाट जाते, म्हणून हे जोरचं पाणी. संपूर्ण ढवळे घाटातला हा एकमेव पाण्यचा स्रोत हे आधी सांगितलंच आहे. त्यामुळे सगळे वन्यप्राणीही इथेच पाण्याला येतात. आमची जेवणं झाली आणि सूर्यास्त होण्याची वेळ जवळ येत चालली. सगळेच दमले होते. इथून आर्थरसीट पॉईंट दिसत नव्हता, तरी आणखी दोन तासांची चाल बाकी होती. कुणाच्या तरी डोक्यात घुमटीपाशीच मुक्काम करण्याची कल्पना आली आणि मी जागीच गोठलो. प्राण्यांच्या भीतीमुळे नव्हे तर थंडीच्या भीतीमुळे. साडेपाच वाजताही घुमटीपाशी मला गारठा जाणवत होता. डिसेंबर महिन्यात उघड्यावर (स्लिपिंग बॅग असली तरी काय झालं) झोपण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. त्यापेक्षा कितीही वाजले तरी आर्थरसीट गाठणं मी पत्करलं असतं. नेटवर जी माहिती वाचली होती, त्यानुसार जोरच्या पाण्यापासून आर्थरसीट पॉईंट पर्यंत दोन माणसं एकावेळी बाजूबाजूने जाऊ शकतील एवढी प्रशस्त वाट आहे. आणि बरीचशी वाट उघड्यावरून आहे. दत्तजयंतीचा आदला दिवस असल्यामुळे रात्री अंधार पडला तरी त्यावाटेवर भरपूर चंद्रप्रकाश मिळाला असता असं वाटत होतं. म्हणूनच इथून निघूया असं हळूहळू सगळ्यांचंच मत बनत गेलं आणि मी मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास टाकला.

पाणी भरून घेतलं आणि निघालो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. आता आकाशातच काळसर निळा प्रकाश शिल्लक होता. बाकी सगळीकडे कातरवेळेची छाया दाटायला सुरूवात झाली होती. जोरच्या पाण्यापासून वाट जंगलात शिरते आणि पुन्हा एक जीव खाणारा चढ चढून सपाटीवर जाते. ह्या चढावर माझ्यातली होती नव्हती ती सगळी ताकद संपली. 'i cannot do it anymore' मी मागून येणार्‍या कुशल आणि विरागला म्हणालो. 'हा बरोबर चालतोयस... चल. छोटी पावलं टाक' - हे त्यांचं उत्तर. ही वाट अगदीच अरुंद होती. त्यात चढ आणि घसरवणारी माती. जंगलभागात असल्यामुळे जवळजवळ शून्य उजेड. पुढे चढणार्‍यातला कोणी घसरला तर ट्राफिक जॅम. अशावेळी असमान पातळीवर थांबून राहायचं. त्यामुळे पायात क्रँप सुरू झाले. जोरचे पाणी ते सपाटीच्या ह्या चढाने माझातरी उत्साह पारच घालवून टाकला. कसातरी तो चढ संपवून सपाटीवर पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता आणि उजेडही जवळजवळ नाहीसा झाला होता. सर्व गोष्टींना काळा रंग आला होता. अशात लांबवर कुठेतरी आर्थरसीट पॉईंटची काळी किनार दिसली. तिथे जायचं होतं! ट्रेकमधला सर्वात रमणीय टप्पा अखेर अंधारात पार करावा लागणार होता.

ह्या सपाटीपासून मी 'दोन माणसं एकाच वेळी चालू शकतील' अशा ऐसपैस वाटेच्या शोधात होतो. सकाळपासूनच्या नुसत्या चढाने पायही दुखत होते आणि पाठही. आता बराच वेळ सपाटी लागेल ह्या आशेने त्या अंधारातच बघायला लागलो तर असं काहीही दिसलं नाही. दुर्दैवाने एकावेळी एकच माणूस चालू शकेल अशी पायवाट लागली. पायवाटेशेजारी छातीपर्यंत वाढलेलं गवत! आणि थोड्याच वेळात ती वाट रानात शिरलीसुद्धा. इतकंच नव्हे, तर पुन्हा चढ-उतार सुरू झाले. माझा तर फारच मूड ऑफ झाला! मूड बदलायला एक कारण मिळालं ते म्हणजे मध्येच एका ठिकाणी पुन्हा गझल म्हणण्याची फर्माईश झाली. वातावरण तर अफलातूनच होतं. जिथे उभे होतो तिथून जेमतेम पाच-एक पावलांवर थेट चार-एक हजार फूट खोल दरी, आकाशात उजळलेला 'चौदहवीका चाँद', मंद सुटलेलं वारं, लांबवर आर्थरसीट पॉईंटची किनार आणि सोबत सह्याद्रीतले आनंदयात्री!

'तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर

जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट ह्या गर्दीत शिरल्यावर'

काही क्षण ती शांतताही अनुभवली. मग निघालो. ह्या संपूर्ण वाटेवर दोन्ही बाजूला अक्षरशः खोल दर्‍या आहेत. उघड्या डोळ्यांनी ते बघायची आमची संधी मात्र पूर्ण हुकली. सह्याद्रीचं एक अतिविलक्षण सौंदर्य ह्या वाटेवरून पाहायला मिळत असणार, ह्याबद्दल माझी खात्री आहे. दोनएक तास ती वाट तुडवत अखेर आर्थरसीट पॉईंटच्या खालच्या शेवटच्या कातळपॅचशी आलो तेव्हा जे काही वाटलं, ते 'सुटलो एकदाचे' ह्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. कातळटप्पा चढून सुप्रसिद्ध अशा 'खिडकी'पाशी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. सकाळी साडेसातला ढवळ्यातून निघाल्यापासून तेरा तासांनी आम्ही डेस्टिनेशनला पोचलो होतो. एकाच दिवसात वेळेच्या हिशेबाने सर्वाधिक लांबीचा हा माझा दुसर्‍या क्रमांकाचा ट्रेक. (पहिला नंबर - रतनवाडी ते डेहेणे व्हाया गुहेरीचे दार - चौदा तास. वर्णन 'anandyatra' ब्लॉगवर वाचू शकाल.).

नेटवर वाचलेलं वर्णन आणि आम्ही घेतलेला अनुभव ह्यात एवढा फरक कसा पडला ह्याचा विचार करण्यात ती वाट संपली. स्पेशली घुमटी ते आर्थरसीट वाटेचं नेटवर वाचलेलं वर्णन आणि आम्ही गवतातून, टेकाडावरून तुडवलेली वाट ह्यातला फरक तेव्हा अनाकलनीयच वाटत होता. मी विचारांती ह्या निष्कर्षावर आलो आहे, की सह्याद्रीमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये वाटांना नवं रूप मिळतं. ज्या भटक्यांनी हा ट्रेक केला आणि त्यावर ब्लॉग लिहिले, त्यांच्या लिखाणात त्यांना त्या त्या ऋतूमध्ये दिसलेली वाट उतरली. आम्ही डिसेंबरमध्ये केल्यामुळे गवत टिकून असेल. पार ढवळे गावापासून संपूर्ण ढवळे घाट, घुमटी ते जोरचं पाणी, जोरचं पाणी ते सपाटी, सपाटी ते आर्थरसीट - सगळीकडे गवत, झाडी आणि एकावेळी एकच माणूस चालेल एवढीच पायवाट. (किंवा मग आम्ही हा ट्रेक करावा म्हणून 'पुरी कायनात' एक झाली असेल आणि असं वर्णन वाचायला मिळालं असेल) पण काहीही असो. आम्ही हा शेवटचा टप्पा अंधारात केल्यामुळे वाटेची स्पष्टता अजिबातच आली नाही आणि आसमंत डोळे भरून बघायचा राहून गेला. माझीतरी घुमटी ते आर्थर हा टप्पा दिवसाउजेडी करायची फार इच्छा आहे.  (नेटवर ब्लॉग्जमध्ये ह्या वाटेचं सुखद आणि मोहक वर्णन केलेल्यांनी मला न्यावं अशी जाहीर विनंती आहे) त्या वाटेत कुछ खास जरूर है!

'खिडकी'पासून पलिकडच्या बाजूला कोसळलेल्या कड्यांची तीव्रता चांदोबाच्या कृपेने रात्रीच्या वेळीही समजत होती. दिवसा बघायला केवढी मजा आली असती! तर ते असो. आर्थरसीट ते महाबळेश्वर प्रवासासाठी आम्ही एक टेम्पो ठरवला होता. तो टेंपोवाला बिचारा साडेपाचपासूनच येऊन बसला होता. घुमटीनंतरच्या सपाटीवरून त्याला फोन लावून थांबण्याची विनंती केली होती. आर्थरसीटवर पोचलो तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हतं. पूर्ण अंधार, आणि कमालीची शांतता. 'दिवसभरच्या गलक्यातून मोकळा झालेला आर्थरसीट पॉईंट विसावा घेत आहे' अशी कविकल्पना मी तेवढ्यात करून पाहिली. आर्थरसीट पॉइंट ते आर्थरसीट गाडीतळ हे अंतर चालणे म्हणजे शुद्ध वैताग होता. कारण - पायर्‍या! अशातच गाडीतळाकडे जाण्याऐवजी टायगरपॉइंटकडे वळलो. वीसएक पायर्‍या उतरून गेल्यावर टायगरपॉईंटचा बोर्ड दिसला. वाट चुकलोच की! ह्याचं मुख्य कारण सह्याद्रीतल्या डोंगरांमध्ये मनमुराद भटकणारे आम्ही महाबळेश्वरातून आर्थरसीटला कधीच आलो नव्हतो. मग स्वतःला शिव्या घालत त्या उतरलेल्या पायर्‍या पुन्हा चढून इप्सितस्थळी कसेतरी पोचलो. घड्याळात वाजले होते रात्रीचे नऊ!

टेंपोवाला गाडीमध्ये खाली डोकं करून लपल्यागत झोपला होता. आर्थरसीट पॉईंटला संध्याकाळी पाचनंतर जायला बंदी आहे. जे आधी गेले असतील त्यांनाही संध्याकाळी सातच्याआत तिथून निघावे लागते. ह्याचे कारण म्हणजे, आजही आर्थरसीटच्या भागात असलेलं वन्य प्राण्यांचं अस्तित्त्व! आम्ही सगळे टेंपोत बसलो. टेंपोला स्टार्टर मारला आणि टेंपोच्या हेडलाईटच्या प्रकाशात अवघ्या पन्नास मीटरवर दिसला - एक गवा! त्याच्या जवळून थोडे पुढे जातोय, तर आणखी दोन गवे दिसले. हेच गवे जर आर्थरसीट पॉईंट उतरून थोडं खाली खिडकीपाशी आले असते, तर आम्ही काय केलं असतं, ह्या विचाराने नाही म्हटलं तरी धडकी भरलीच.

विलक्षण दमलेल्या, पण तरी एका जबरदस्त काहीतरी केल्याच्या भावनेने ताजेतवाने झालेल्या चौदा भटक्यांना घेऊन टेंपो त्या आर्थरसीट पासून दूर दूर चालला होता. आज जेवढं चढून आलो होतो तेवढंच उद्या उतरून जायचं होतं. सगळ्यात आधी आज रात्रीचा मुक्काम-जेवण ह्या गोष्टी बघायचा होता. आमच्या प्लॅननुसार आम्ही उशीरात उशीरा रात्री ८ पर्यंत मेटतळ्यात पोहोचणं अपेक्षित होतं. खरं सांगायचं, तर उशीर झाल्याचं दु:ख आता अजिबात वाटत नव्हतं. माझ्या मनात सकाळपासून केलेली पायपीट फ्लॅशबॅकसारखी पुन्हा चालली होती. चंद्रगड, ढवळे घाटात अवचित मिळालेलं पाणी, त्या पाण्यापासूनच हळूहळू येत गेलेला थकवा, म्हातारबाबांचा ह्या वयातही टिकून असलेला स्टॅमिना, घुमटी ते सपाटी ह्या वाटेवर शब्दशः लागलेली वाट, सपाटी ते आर्थरसीट हा अंधारात चालल्यामुळे काहीसा हिरमोड केलेला टप्पा, आणि ह्या वाटेवर दिवसाउजेडी पुन्हा येण्याची उत्तरोत्तर बळावत गेलेली इच्छा - ढवळे ते आर्थरसीट व्हाया चंद्रगड ट्रेकचा सारांश एवढ्याच शब्दांत येत असला, तरी त्या तेरा तासात जे अनुभवायला मिळालं, ते शब्दांत येणं शक्य नाही! त्यासाठी सॅक पाठीवर टाकून हा ट्रेक करायला हवा. फक्त लक्षात ठेवा -  'ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं....' पुढचं आठवत असेलच.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी

महत्त्वाचे: अगदी शेवटची वीस-एकफूट (तीही सोपी) कातळचढाई सोडली, तर ढवळे ते आर्थरसीट ट्रेकमध्ये कुठेही कातळचढाई नाही. तरीही, हा ट्रेक शारीरिक क्षमतेचा कस पाहतो. ह्या ट्रेकला घुमटीपर्यंत तरी गाईड घ्यावाच. प्रश्न वाट शोधण्यातील कौशल्याचा नसून वाट शोधायला जो वेळ जाईल व त्यामुळे आर्थरसीटला पोचायला उशीर होत जाईल त्याचा आहे. जवळजवळ ९०% वाट वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या घनदाट जंगलातून आहे. त्यामुळे अंतर फार पडू न देणे हितकर. ढवळे गाव सोडल्यावर थेट बहिरीच्या घुमटीपर्यंत (जोरचे पाणी) पाणी नाही. त्यामुळे पुरेसा पाणीसाठा हवाच. नेटवरून, जाऊन आलेल्यांकडून कितीही माहिती काढली असली, तरी आपली स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमताच आपल्याला सुखरूप मुक्कामी नेत असते, हे ध्यानी ठेवावे. सह्याद्रीतल्या आनंदयात्रांसाठी भरपूर शुभेच्छा!

Monday, January 8, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १


फेब्रुवारी २०१७.
'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ.  लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत आलो होतो. शिवाजी पोटेंकडे रात्रीच्या जेवणाची सोय होती. जेवणाची तयारी होत असतानाच शिवाजीदादांच्या घराच्या कट्ट्यावर सह्याद्रीतल्या घाटवाटांचा एक अस्सल आणि अट्टल भटक्या मनोज आणि सह्याद्रीचा गूगल अर्थात ओंकार ओक ह्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. विषय होता - "महाबळेश्वर भागातल्या घाटवाटा". तसा विषय नक्की कुठला होता ते आठवत नाही. कारण दोघेही डोंगररांगांचा जबरा अनुभव असलेले गडी. त्यामुळे विषय अगदी जव्हार भागातले किल्ले इथूनही सुरू झालेला असेल. पण त्यांच्या त्या गप्पांमध्ये मी ढवळे, जोर, बहिरीची घुमटी, आर्थरसीटचा उल्लेख ऐकला. जणू महाबळेश्वराच्या कड्यावर उभे राहून समोरचा भूगोल दाखवावा असे हातवारे करत त्या कट्ट्यावर ते स्थलवर्णन करत होते. (मध्येच मधुमकरंदगड ते कोळेश्वर हे दोन हात पसरून दोन टोकांना आहेत असं काहीतरी सांगताना ओंकारचा हात माझ्या चेहर्‍याच्या दिशेने आला आणि तो मी चुकवला). तेव्हा त्या गप्पांमध्ये ऐकलेलं ढवळे, चंद्रगड, आर्थरसीट हे सह्याद्रीचं जावळीवैभव प्रत्यक्ष केव्हातरी बघायला मिळू दे अशी मनातल्या मनात प्रार्थना केली होती.
*********************

एप्रिल २०१७. 
सुनिलच्या कृपेने पुणे ट्रेकिंग गृपसोबत मधुमकरंदगड ट्रेकला जायची पहिली आणि शेवटची संधी मिळाली. (शेवटची एवढ्यासाठी, कारण त्यानंतर आजतागायत त्यांनी मला त्यांच्यासोबत नेलं नाहीये. त्या ट्रेकला मी खरंतर खूप चांगला वागलो होतो पण... असो.) त्या ट्रेकमध्ये रात्री जेवण झाल्यावर गप्पांमध्ये पुन्हा एकदा महाबळेश्वर परिसरातल्या घाटवाटांची नावं ऐकली. अफझलखानाला महाराजांनी महाबळेश्वरापासून पार गावापर्यंत ज्या वाटांनी आणलं त्यातल्या वाटा, प्रतापगडाभोवतीच्या ज्या प्रदेशात लढाई झाली तो प्रदेश, त्यावेळची महाराजांची युद्धनीती हा सगळा भूगोल मधुमकरंदगडावरून दिसतो. तेव्हा रडतोंडी घाट, प्रतापगडापलिकडचं दाभिळ खोरं, त्यापलिकडची चंद्रराव मोर्‍यांची राजधानी असलेला चंद्रगड हे पहिल्यांदा सविस्तरपणे ऐकलं. आणि पुन्हा महाबळेश्वराच्या आसपासच्या घाटवाटा करायची इच्छा उफाळून आली.
**************************

शुक्रवार, १ डिसेंबर २०१७. 
रात्री दहाच्या पुणे - महाड गाडीत बसलो, तेव्हा कुठे आपण ढवळे ते आर्थरसीट हे स्वप्न खरोखरच पूर्ण करायला निघालो आहोत, ह्यावर विश्वास बसला. (कुठल्याही ट्रेकला गाडीत चढेपर्यंत मायबोलीकर मित्रांना आणि गाडी पुण्याच्या वेशीबाहेर पडेपर्यंत मला आपण खरोखरच ट्रेकला निघालोय ह्यावर विश्वास बसत नाही. उगाच नंतर हळहळ कशाला?) ऑक्टोबरच्या मध्यात केव्हातरी नरेश परब उर्फ गिरी'काकां'नी गृपवर जाहीर केलं की ढवळे-आर्थरसीट ट्रेक मी प्लॅन करतोय, नावनोंदणी करा. माझा तर विश्वासच बसला नाही. स्वप्नं एवढ्या लवकर पूर्ण केव्हापासून व्हायला लागली?

मी येतोय म्हणून कळवून टाकलं आणि ढवळे-आर्थर-रडतोंडी भागाची माहिती शोधायला सुरूवात केली. घाटवाटांच्या अनेक बादशहांपैकी एक - साईप्रकाश बेलसर्‍यांच्या ब्लॉगची पारायणं केली, सह्याद्रीतील एक मनस्वी आणि विनम्र भटके तुषारदांना माहिती विचारली. मनोजला तर अगदी बारीकसारीक गोष्टी विचारायला फोन केले. त्यानेही फोनवरच ढवळे घाटाचा नकाशा वर्णन करून सांगितला. प्रीतीलाही विचारलं, गूगललाही विचारलं. शेवटी माहिती इतकी मिळाली की 'आता प्रत्यक्ष ट्रेकला जायची गरजच नाही' असा विचार मनात यायला लागला. मग मात्र माहिती काढणं थांबवलं. काहीतरी first-hand बघण्यासाठीही शिल्लक ठेवूया असं वाटायला लागलं. अर्थात ही पूर्वासुरींकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव ह्यात आर्थरसीट आणि ढवळे गाव ह्यांच्या अंतराएवढाच फरक होता, हे आवर्जून सांगावंसं वाटतं.

शेवटी तारीखवारांसकट प्लॅन जाहीर झाला. प्लॅन तर जबरा होता. - "ढवळे गावातून २ डिसेंबरच्या शनिवारी सकाळी लवकर निघायचं, पहिल्यांदा चंद्रगड करायचा. तिथून मधल्या खिंडीच्या उतारवाटेने ढवळे घाटाच्या वाटेला लागायचं. संध्याकाळपर्यंत महाबळेश्वरचा आर्थरसीट पॉईंट गाठायचा. रात्री मेटतळ्यात मुक्काम करून दुसर्‍या दिवशी ३ तारखेला रडतोंडी घाटाने उतरून पारगाव, वरदायिनी मंदिर आणि मग दाभिळ टोकावरून दाभिळ गावात उतरायचं." मला प्लॅन वाचतानाच धाप लागली होती.

ढवळे ते आर्थरसीट हा ट्रेक सह्याद्रीतला निर्विवादपणे एक प्रदीर्घ असा ट्रेक आहे. मी जितकी माहिती गोळा केली होती, त्यात एक समान धागा होता - ह्या ट्रेकला कमीत कमी ६ तास लागतात. आणि ह्या संपूर्ण ट्रेकमध्ये जवळजवळ चार हजार फूट उंचीची चढण  होते. (ढवळे - कोकणातले गाव, आर्थरसीट - सह्याद्रीच्या सरासरी उंचीच्याही वर) त्यात आम्ही चंद्रगडसुद्धा करणार होतो. म्हणजे आणखी ३-४ तास वाढणार होते. आदल्या रात्री झोप अपुरी होणार होती. लाल डब्ब्याने ट्रेक करायची हुक्की आल्यामुळे सगळं सामान पाठीवर घेऊन हा ट्रेक करायचा होता. (मी सुचवून पाहिलं, की खाजगी गाडी करू, आणि फक्त गरजेचंच सामान पाठीवर घेऊन चढू. बाकी झोपण्याचं आणि इतर सामान गाडीतच ठेवून गाडीवाल्याला थेट आर्थरसीटला बोलवू. ह्यावर 'मग ट्रेक कशाला करायचा' असं उत्तर आल्यावर मी गुमान पुण्यातून निघणार्‍या सगळ्यांचं दोन्ही वेळेचं एसटीचं रिझर्वेशन करून टाकलं!)

पुण्याहून सात आणि मुंबईहून सात असे चौदा जण महाडमध्ये भेटणार होते. सगळेच जण एकमेकांना चांगलेच 'ओळखून होते' हे ह्या गृपचं वैशिष्ट्य होतं. काही काही जण तर मॅरेथॉन रनर्स, सायक्लिस्ट, क्लाईंबर्स होते (काही जण ह्या तिन्ही प्रकारात प्रवीण होते - माणसानं अष्टपैलू तरी किती असावं ना?) प्रचंड शारिरीक-मानसिक क्षमता असलेल्या ह्या गृपबरोबर ढवळे-आर्थरसीट करण्याचा विचार करताना एका क्षणी मीच स्वत:ला लिंबूटिंबू वाटायला लागलो होतो.

रात्री दहाची पुणे-महाड गाडी चालकाने आपल्या अतीव कौशल्याच्या जोरावर मध्यरात्री पावणेदोनलाच महाड स्टँडात नेऊन उभी केली (निर्धारित वेळेपेक्षा सव्वातास आधी). मुंबईकरांची गाडी पाच वाजता आली. महाडातून ढवळे गावापर्यंत नेणार्‍या टमटमवाल्याने आयत्यावेळी फोनच उचलला नाही. मग दुसरा टमटमवाला शोधावा लागला. (समोर आलेली चोरवणे बस पकडून वासोटा करण्याची टूमही तेवढ्यात निघाली आणि ती गंमत होती हे मला मागाहून कळलं) अखेर ढवळे गावात पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. (ह्या वेळेला आम्ही चंद्रगडासाठी निघणं अपेक्षित होतं).

नाष्टा झाला, आणि सॅकमध्ये पाणी भरून चौदा गडी आणि एक वाटाड्या सज्ज झाले - एका हौसेने ओढवून घेतलेल्या पराक्रमासाठी - ढवळे ते आर्थरसीट व्हाया चंद्रगड! निर्विवादपणे आयुष्यभर जपून ठेवावं असं काहीतरी आज हाती लागणार होतं.

 (क्रमशः)
- नचिकेत जोशी

Tuesday, March 21, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार

कुलंग प्रस्तरारोहणाच्या माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची गोष्ट जवळजवळ संपूर्ण झालीच आहे. हा भाग फोटोत्सुक वाचकांसाठी आणि समारोपाच्या दोन पॅरासाठी.

आम्ही तिघे दुपारी मुक्कामापासून निघाल्यापासून नऊ तासांनी झापापाशी पोचलो, त्याची गोष्ट तुम्ही वाचलीच आहे. त्या दिवशी सूरजने सहाशेपैकी अडीचशे फुटांची चढाई केली. सूरज आणि संजय बेस कँपवर खाली उतरले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. त्या दिवशी संध्याकाळी एक महत्त्वाचा निर्णय झाला, तो म्हणजे, जरी कुलंगची वॉल पूर्ण चढायच्या हेतूने आलो होतो, तरी मोहिमेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी अजून वर चढून न जाता, जेवढ्या उंचीपर्यंत आज चढाई पूर्ण झाली आहे तिथपर्यंत उद्या टीममधल्या प्रत्येकाला चढाई करण्याची संधी द्यायची. थोडक्यात, कुलंग व्हर्जिन वॉलच्या पहिल्या प्रयत्नात अडीचशे फुटांची चढाई हेच अंतिम ध्येय मान्य झालं. टीमवर्कच्या दृष्टीने बघता, प्राप्त परिस्थितीमधला हा एक नि:संशय अप्रतिम निर्णय होता. त्याप्रमाणे सर्वचजण (अगदी मास्टरशेफ मंदारसुद्धा) सूरज-संजयने गाठलेल्या अडीचशे फूटांवरती दुसर्‍या दिवशी आपापली पावले उमटवून आले.

कुलंगची पहिली मोहिम संपली. उतरताना प्रत्येकाकडेच भरपूर म्हणजे भरपूरच ओझे होते. त्यात मी माझं काही सामान तिथेच विसरून आलो होतो. ते तिथल्यापैकी कुणाचंच नसल्यामुळे ते सॅकमध्ये घेणं तर सोडाच, पण हातामध्येसुद्धा घ्यायला कुणीही तयार नव्हते असे मला मागाहून कळले. मग बिचार्‍या संजयने ते ओझे स्वतःकडे घेतले आणि पुण्यात मला सुखरूप आणून दिले.

श्वेताचा पाय अजूनही बरा झालेला नाही. उपचार चालू आहेत असे कळते.

पुढच्या मोहिमेचे प्लॅन आखून तयार आहेत.

प्रिय वाचकहो, आणि आता शेवटचे. सह्याद्रीमध्ये अशा प्रकारच्या मोहिमा अनेकांकडून होतात. त्यात आम्हाला जे अनुभव आले त्याहून बिकट, वाईट, चांगले, खडतर अनुभव त्या त्या वेळी येतात. सगळेच काही कागदावर उमटत नाहीत. ह्याचे मुख्य कारण म्हणजे, ह्या अस्सल ट्रेकर्सची अशा प्रकारच्या अनुभवांसाठी मानसिकता कायमच तयार असते. त्यामुळे, आठ तास उतरायला लागणे किंवा दुखापत झालेली असतानाही मोहिम पूर्ण करणे ह्या गोष्टी सहज घडून जातात. इच्छाशक्तीच्या जोरावर अशा अनेक मोहिमा आजवर पूर्ण झाल्या आहेत, आणि होत राहतील. अशा एका मोहिमेत मला सहभागी व्हायला मिळालं आणि असा भन्नाट अनुभव प्रत्यक्ष घेता आला हेच काय ते माझं भाग्य! बाकी सब - सह्याद्रीबाबा के हवाले! अशा सर्वच मोहिमांमध्ये एक गोष्ट कॉमन असते - ती म्हणजे सुरक्षिततेची घेतलेली काळजी. सुरक्षेचे सर्व उपाय करूनच अशी साहसे केली जातात. ह्या मोहिमांमध्ये सहभागी होताना आपणसुद्धा सुरक्षिततेसंदर्भात काय काय आयोजन आहे ह्याची माहिती घ्यायला हवी.

ह्या भागात फोटो आहेत, पण आधीच्या सर्व भागातलं फोटोशिवाय उभं केलेलं शब्दचित्र एवढ्या चिकाटीने तुम्ही वाचलंत ह्यात निर्विवादपणे तुमचं कौतुक आहे. त्याबद्दल मनापासून आभार.पुन्हा भेटूच!

आता सुरू करूया फोटो सफर - (आधी वर्णन आणि नंतर फोटो असा क्रम आहे. I hope फोटोतले संदर्भ तुम्ही आधीच्या भागात वाचले असल्यामुळे आठवतील)

equipment, इतर सामान. मागे आडवा पसरलेला अलंग आणि त्याच्या उजवीकडचा उंचवटा म्हणजे मदन. (फोटो - रोहन मालुसरे)

उजवीकडचा आडवा कुलंग. त्याच्या डावीकडे कमी उंचीचा एक डोंगर आहे. दोघांच्या मधल्या खिंडीत पोचण्याचे पहिल्या दिवशीचे ध्येय होते. कुलंगची डावी धार चढून जाण्याची मोहीम होती. डावीकडचा उंचवटा मदन.

या फोटोत कुलंग, त्याची डावी भिंत, खिंड आणि खिंडीच्या डावीकडचा डोंगर नीट दिसतोय. त्या डाव्या डोंगराच्या पोटात कपारी आहेत, जिथे आम्ही मुक्काम केला. खिंडीच्या 'V' चे खालचे टोक जिथे आहे, तिथपासून डावीकडे कपारींकडे पायवाट जाते, तर उजवीकडे कुलंगला खेटून पायर्‍यांकडे पायवाट जाते.

६०० फूट भिंत अजून झूम करून. भिंतीच्या उन्हात असलेल्या धारेवरून चढाई झाली.

निघालो! मागे मदन ते कुलंग! (फोटो - रोहन मालुसरे)

वाटेवर एके ठिकाणाहून दिसणारे मदनगडाचे नेढे

कळसुबाई

मुक्कामाची जागा

मुक्कामाच्या जागेवरून दिसणारा नजारा. उजवीकडे उंचीवर जो हिरवी झाडे असलेला डोंगर दिसतोय, त्याच्यापलिकडे खालच्या बाजूला झाप होता, जिथून सुरूवात केली. तसंच सरळ पुढे गेलं की आंबेवाडी.

कुलंगच्या पायर्‍यांवरून घेतलेला मदनगडापर्यंतचा फोटो. कुलंगनंतरच्या पहिल्याच डोंगराच्या पोटात मुक्कामाची जागा.

कुलंगच्या पायर्‍यांवरूनच मदनच्या सुळक्यांचा फोटो. सगळ्यात उजवीकडच्या डोंगराच्या पोटात पांढुरकं आणि त्याच्या लगेचच खाली एक भेग दिसतेय, exactly तीच मुक्कामाची कपार.

सगळ्यात उजवीकडे मदनगड, सगळ्यात डावीकडे कळसुबाई

कुलंगच्या पायर्‍यांची एक झलक

कुलंगवरून दिसणारा परिसर

Good Morning from the nest in the mountains

बेस स्टेशन

खिंडीतून पलिकडचा नजारा. सर्वात डावीकडे दिसतेय ती अलंगची लिंगी. तिच्या उजवीकडे रतनगड धुरकट दिसतोय.

अरूण सर in लीड क्लाईंबिंग


पहिले सत्तर-एक फूट सरांनी लीड क्लाईंब केलं. Now its Suraj to go next. फोटोत डावीकडून सर, संजय आणि सूरज

ओव्हरहँगच्या खाली सूरज. संजय बिले देताना.

त्याच पॅचवर अजून एक फोटो


 सूरज अजून वर पोचला, बिले पोझिशनवर संजय आणि रूपेश


तिसर्‍या दिवशीची चढाई - Its a team reaching the destination! (फोटो - मिलिंद कुलकर्णी)

अडीचशे फुटांवरचा ग्रूप फोटो. मागच्या भिंतीचं सर्वोच्च टोक म्हणजे कुलंगचा माथा. (फोटो - मिलिंद कुलकर्णी)


हा ह्या ठिकाणावरून घेतला गेलेला पहिला फोटो. कारण अजूनपर्यंत इथे कुणीच पोचलं नव्हतं. फोटोत मदनगड आणि आम्ही राहिलो त्या कपारींच्या डोंगराचा टॉप दिसतोय. डावीकडे मागे कळसूबाई. (फोटो -
मिलिंद कुलकर्णी)



फायनली पुण्यात सुखरूप पोचलो. उजवीकडून रोहित, श्वेता आणि मी. (फोटो - रोहित सिंगर)

हॅट्स ऑफ टीम. (फोटो - रोहन मालुसरे). सागर आणि मालतेश ह्या फोटोत नाहीयेत. ते रात्री मुक्कामाला आले होते.


(समाप्त)
नचिकेत जोशी





Monday, March 20, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट

छत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात होते का याबद्दल मी तरी कुठेच वाचलेले नाही. जवळ असलेला पट्टा किल्ला (विश्रामगड) स्वराज्यात होता, इतकेच नव्हे तर शिवाजी महाराज मुक्कामालाही पट्ट्यावर आले होते. पण तसं कुलंगरांगेतल्या किल्ल्यांबद्दल सापडत नाही. आदल्या दिवशी कुलंगवर पाणी आणायला जाताना तिथल्या पायर्‍या बघून हाच विचार मनात येत होता. ह्याचं उत्तर इतिहासालाच माहित!

साडेतीन वाजता संजय आणि सूरज जागे झाले आणि वॉकीची बॅटरी रात्रीच केव्हातरी डाऊन झालेली पाहून चांगलेच काळजीत पडले. सागर कुठपर्यंत आलाय हे कळायला काहीच मार्ग नव्हता. अरूण सरांनी त्यांना खिंडीपर्यंत पाठवून हाका मारून यायला सांगितलं. हाकांना प्रतिसाद आलाच नाही. सागर हा अरूण सरांच्या हाताखाली तयार झालेला गडी असल्यामुळे संपर्क झाला नाही तरी सागर आणि मालतेश सुरक्षित असतील ह्याबद्दल शंका नव्हती. पण communication नसल्यामुळे तो नेमका कुठपर्यंत आलाय हे समजू शकणार नव्हते आणि मुख्य म्हणजे वॉकीची बॅटरी डाऊन झाल्यामुळे हा सगळा घोळ झालाय हे त्याला उद्या सकाळपर्यंत कळू शकणार नव्हते. हा उलगडा सकाळीच झाला आणि मजेदारपणे झाला.  त्याचं झालं असं की सागर आणि मालतेश पहाटे अडीच वाजता कपारींपाशी येऊन पोचले. वॉकीवर प्रयत्न केला पण रिप्लाय आला नाही, मग शिट्ट्या वाजवल्या (व्हिसलब्लो) त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. चुलीजवळ भांड्यांची खुडखुड करून जेवण वाढून घेतलं (तरीही कुणाला जाग आली नाही) आणि आवरून ते दोघे तीन वाजता झोपलेही. माझ्या पलिकडेच त्यांनी स्लिपिंग बॅग अंथरली तरी मलाही जाग आली नाही. आणि मग एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी संजय-सूरजला साडेतीन वाजता जाग आली आणि त्यांनी एक तास सागरच्या शोधात घालवला. सागर वर येऊन पोचलाही असेल ही शक्यता त्यांनी हुकवली हे केवळ दुर्दैवच!

सकाळी स्लिपिंगबॅगमधून डोळे उघडून पाहिले तर आकाशात केशरी रंगाचा एक पट्टा क्षितिजरेषेवर पसरलेला दिसला. मुक्कामाची जागा बरीच उंचावर असल्यामुळे झोपल्या झोपल्याही क्षितिजरेषेवरही आकाशच दिसत होतं. मग यथावकाश सगळे उठले आणि शेफ मंदारने भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेला शिरा समोर ठेवला. आणि सांगितलं की, "आपापल्या प्लेट्स आणा आणि व्हा सुरू!" श्वेताचा पाय दुखत होताच. त्यामुळे मी 'आपण अकरा-साडेअकरापर्यंत निघूयाच म्हणजे झापापाशी पोचायला सहा वाजतील आणि पुढे ड्राईव्ह करत पुण्यात रात्री बारापर्यंत तरी पोचू' असं सुचवलं. हे अरूण सरांनी अर्ध्यातच उडवून लावलं. "छे! चार वाजता निघा, चार तासात खाली जाल.". मला मात्र कुठेतरी आत खात्री होती की आपल्याला खाली पोचायला कमीत कमी पाच ते साडेपाच तास लागणार आहेत. त्यात श्वेताचा पाय दुखत असेल तर वेग आणखी कमी होईल.

अखेर ज्या कामासाठी आलो होतो त्याला सुरूवात झाली. कुठले क्लाइंबिंग शूज कोणी घालायचे ह्यावर सूरज-संजयमध्ये चर्चा झाली. मला तर ड्रेसिंगरूममध्ये क्रिकेटपटू समोर पडलेल्या पाच-सात बॅट्सपैकी आज कुठली न्यायची ह्यावर असंच डिस्कस करत असतील असं वाटून गेलं. मीही मागच्याच महिन्यात नवीन हार्नेस-डिसेन्डर-़कॅरॅबिनर घेतले होते. आमच्या मायबोली ट्रेक ग्रूपच्या लिंगाणा ट्रेकमध्ये त्यांचं उद्घाटनही केलं होतं. पण actual क्लाईंबिंगसाठी त्यांचा उपयोग आज होणार होता. पण आधी लीड क्लाईंबर जाणार, मग सेकंड लीड, मग बाकीचे क्लाईंब करणार असल्यामुळे आम्ही निघायच्या आत मला क्लाईंब करायला मिळेल की नाही याबद्दल मी थोडा साशंक होतो. म्हणून मी काही हार्नेस लगेचच चढवला नाही. हळूहळू क्लाईंबिंगचे सर्व सामान खिंडीत पोचवले गेले. चढाईसाठीचा पहिला बोल्ट अरूण सरांनी मारला, तेव्हा अकरा वाजायला आले होते. पहिली सत्तर-एक फूटांची चढाई अरूण सरांनी केली. आणि ते खाली उतरले. पुढची चढाई सूरज करणार होता आणि संजय बिले देणार होता. आता टीम विभागली गेली. श्वेता आणि मंदार दुपारच्या जेवणाचं बघू लागले. रोहित, रोहन, मालतेश, सागर यादव, मिनेश पाणी आणायला पुन्हा कुलंगवर गेले. मी, सागर आणि मिलिंद खालून चढाई बघू लागलो. हे उत्तम शिक्षण होते. क्लाईंबर्स कसे चढतात हे खाली उभं राहून बघायलाही मजा येते. आपापल्या कुवतीनुसार शिकायला मिळतं. संजय बिले कसा देतोय हे बघायला त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. संजयने 'हेल्मेट घातलं आहेस का' हे नजरेनेच तपासून घेतलं आणि तो बिले देण्यात मग्न झाला. सूरजचं क्लाईंब बघत असतानाच वरून एक दगड सुटला. सूरजचा लाऊड कॉल ऐकताक्षणी डोकं खाली केलं आणि कातळाला चिकटायच्या आधीच तो दगड अस्मादिकांच्या हेल्मेटवर आपटून बाजूला पडता झाला. "हेल्मेट नसतं तर?" एवढाच प्रश्न तेव्हा मनात येऊन गेला, एवढंच!

क्लाईंबिंग हे काळजीपूर्वक आणि म्हणून सावकाश करायचं काम आहे. शंभर एक फूटांवर सूरजला छोटा ओव्हरहँग लागला. म्हणून तिथपर्यंत संजयने वर चढावं आणि तिथून सूरजला बिले द्यावा असं ठरलं. संजय तिथपर्यंत पोचला आणि नंतर सूरज तो ओव्हरहँग चढून वर गेला. हे सगळं होईपर्यंत दोन वाजून गेले. आता आपण खाली उतरायला प्राधान्य द्यायचं असं ठरवून 'क्लाईंबिंग पुढच्या वेळी' असं म्हणून मी मुक्कामाच्या जागी परत आलो.

रोहित पाणी घेऊन अजून आला नव्हता. पण श्वेताला पावले टाकायला वेळ लागत होता त्यामुळे 'आपण पुढे होऊया, रोहित मागून येऊन आपल्याला जॉईन करेल' असे ठरवले. एकूण टीमपैकी तीन जण कमी होणार होतो, त्यामुळे तिघांची equipment खाली न्यायचे ठरले. उरलेल्या टीमला उद्या उरलेले सामान घेऊन खाली उतरायला चिकार कष्ट होणार होते, कारण सामान भरपूरच होते. त्यामुळे जेवढं नेता येईल तेवढे आम्ही खाली नेणार होतो. Equipment (हार्नेस-हेल्मेट) शिवाय चार जादाचे रोप्सही सरांनी आमच्याकडे दिले. आता मला खाली पोचायला पाच ऐवजी सात तास लागणार असे वाटू लागले. आधीच अडीच वाजून गेलेले, त्यात आम्ही फक्त तिघे, त्यात श्वेताचा दुखरा पाय, त्यात उतरताना अंधार पडणार हे नक्की! पण काल सागर आणि मालतेश दोघेच मध्यरात्री चढून आले होते, त्यामुळे (त्यात काय?) आपणही जाऊ शकू असं मनाला समजावलं.

कुठल्या वाटेने उतरावं ह्यावर काल बरीच चर्चा झाली होती. त्यानुसार आम्ही पाणी आणायला गेलो त्या ट्रॅवर्सने जाऊन कुलंगच्या मुख्य पायवाटेला लागणार होतो आणि तिथून प्रचलित वाटेने आंबेवाडीकडे उतरणार होतो. आमच्यासोबत मिलिंदसुद्धा रविवारीच पुण्याला निघणार होते पण क्लाईंबिंग सुरू झाल्यावर त्यांनी 'ज्यासाठी एवढं आलोय ते आता समोर दिसतंय (क्लाईंब). तर आता ते करूनच (क्लाईंब) पुण्याला जाईन' अशी प्रतिज्ञा त्या खिंडींत केली. आता फायनली आम्ही तिघेच उरलो. अरुण सरांनी श्वेतालाही थांबवायचा गमतीत प्रयत्न करून पाहिला, पण तिने काही दाद दिली नाही. मग तिचा दुखरा पाय बघून सरांनीही तिला आणि रोहितला जायची परवानगी दिली. तिला सुखरूप खाली नेऊ शकेल असा एकच पुरूष त्यावेळी पृथ्वीतलावर (आयमीन कुलंगवर) मौजूद होता, तो म्हणजे रोहित. रोहितवर माझी एक्स्ट्रा जबाबदारी पडू नये ह्याची काळजी घेत खाली उतरणे एवढाच काय तो माझा रोल होता. ते दोघे थांबले असते तर मग मलाही थांबावेच लागले असते. इतक्या गहन जंगलातून आणि कातळांवरून एकटाच उतरून अंधारात आंबेवाडीकडे जाण्याइतकी हिरकणीची हिम्मत माझ्यात नव्हती. त्यापेक्षा मी ऑफिसला सुट्टी मारणं पत्करलं असतं. (ती अखेर मारावीच लागली, त्याची गोष्ट पुढे येईलच.)

पाणी-टीमला यायला दोनपेक्षा जास्त तास लागले. त्याचं कारण त्यांनी आल्यावर सांगितलं. कुलंगमाथ्यावर कुण्या आगाऊ मुलांनी आग लावून दिली होती. गवताने पेट घेतला होता. ती आग पसरू नये म्हणून आमच्या पाणी-टीमने भरलेले कॅन तिथे वापरले. (कौतुक म्हणजे त्या मुलांनाही आग विझवायला लावली). मग पुन्हा कॅन भरून ते खाली आले. कालच्यापेक्षा त्यांच्याकडे जादाची अशी ४० लिटरची एक प्लॅस्टिकची पाण्याची बॅग होती. अर्धी निम्मी भरलेली ती बॅग पाठीवर घेऊन रोहित खाली आला आणि त्याला पाहिल्यावर आम्हाला हायसं वाटलं. (आता लगेच निघू शकू! - हाऊ सेल्फिश!) त्या बिचार्‍याने उभ्या उभ्याच जेवून घेतलं आणि फायनली फायनली आम्ही तिघे निघालो.

ट्रॅवर्स न मारता, आलो त्याच वाटेने - नाळ उतरून मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स गाठणे आणि तिथून कुलंगच्या प्रचलित वाटेला लागून झाप गाठणे (exactly ज्या वाटेने चढलो तीच वाट) हे ठरले. श्वेताला सोपं पडावं म्हणून सरांनी खिंडीतून उतरताना नाळेच्या सुरूवातीला रोप लावून दिला. (त्या रोपचा उपयोग करून सर्वात आधी मी उतरलो.) आणि त्या रोपच्या शेवटी लावायला आणखी एक रोप दिला. त्याचसोबत गावात पोचवायला अजून तीन एक्स्ट्रा रोप्स दिले. अखेर आमचे स्वत:चे सामान आणि ते रोप्स घेऊन आमची वरात नाळेत शिरली तेव्हा साडेतीन वाजले होते. आता आमचा लीडर रोहित होता. तो सांगेल तसं उतरायचं हे मी स्वत:ला सांगितलं तरी त्याला अनेक प्रश्न विचारणं काही सोडलं नाही. माझं हे असंच होतं. तर ते असो. सरांनी लावलेला पहिला रोप संपल्यानंतर योग्य अशा झाडाला सरांनी दिलेला दुसरा रोप बांधून रोहित श्वेताला न्यायला पुन्हा वर आला. मी त्या दुसर्‍या रोपवरून फ्री-रॅपल करत खाली उतरलो. मला तसं उतरताना बघून बहुधा रोहितच्या डोक्यात एक आयडीया आली आणि तिने आमचे अंदाजे तीन तास वाचवले.

एव्हाना साडेचार वाजून गेले होते. पूर्ण वाट झाडोर्‍यातून आणि दगडांमधून होती. त्यामुळे खाली मोकळ्या प्रदेशात उजेड रेंगाळणार असला तरी आम्ही नाळेच्या वाटेवर असतानाच काळोख होणार होता. सरांनी आमच्याकडे तीन एक्स्ट्रा रोप्स दिले होते. ते असेही तसेही खालीच न्यायचे होते, मग 'जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत त्यांवरून रॅपल करतच खाली जाऊ' ही ती आयडीया. आणि खरोख्खर यामुळे उतरण्याचा वेग वाढला आणि पूर्ण काळोख पडला तोपर्यंत आम्ही मदनगडाच्या ट्रॅवर्सच्या दिशेने बरेच अंतर जाऊ शकलो. तीन ते चार वेळा रोप्स लावता आला. चौथ्या वेळी वरचा रोप रोहित काढून आणत असताना खाली दुसरा रोप नुसताच हातात धरून उभं राहण्यापेक्षा मी तो अँकर करण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्यासाठी शिकण्याची याहून सुवर्णसंधी दुसरी कुठलीच नव्हती. अँकर जमलाय की नाही हे रोहितने सांगितले असते. आणि अँकर केलेल्या त्या रोपवरून पहिला मीच उतरणार असल्यामुळे पहिला प्रयोग माझ्यावरच झाला असता.  हे मला आधी का नाही सुचले असे वाटून मला विलक्षण म्हणजे विलक्षण खिन्नता आली. पण त्याला काही इलाज नव्हता. 'पुढच्या वेळी अशा गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, शिकण्याच्या अशा संधी हातून सुटतातच कशा?' वगैरे स्वगते मी बोलून घेतली.

श्वेताचा पाय कमालीचा दुखत होता. उजवा पाय फोल्ड करायची सोय नव्हती. उतरताना डावा पाय आधी टाकला तर मागे राहिलेला उजवा पाय फोल्ड होत होताच. त्यामुळे प्रत्येक वेळी उजवाच पाय आधी टाकावा लागत होता. आणि हे अगदी लक्षात ठेवून करावे लागत होते. पहिले काही पॅचेस दगडांतून आणि कातळांवरून होते. पण तीन-चार वेळा रॅपल करून झाल्यावर वाट झाडीत शिरली आणि नेमका तेव्हाच अंधार पडू लागला. मुकाट्याने रोप्स कॉईल केले, सॅकवर टाकले आणि हातात काठ्या घेऊन एकामागोमाग एक निघालो. सर्वात पुढे रोहित, त्यानंतर श्वेता आणि सगळ्यात शेवटी मी हा क्रम पार रान संपवून रात्री मोकळ्यावर आलो तरी सोडला नाही.

कसे कुणास ठाऊक, पण त्या नाळेच्या वाटेने आम्ही इतके सरळ खाली गेलो की थेट एका दरीच्या तोंडाशी जाऊन थांबलो. वाटेत मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स क्रॉस झाला होता. आता घड्याळात आकाशात नुकताच उगवलेला चंद्र, घड्याळात सातवर पोचलेला छोटा काटा आणि अखेर चुकलेली वाट. शप्पथ सांगतो, तेव्हा मला ज्जाम टेंशन आले होते. झाप अजून कितीतरी दूर होता. तो अजूनही त्या डोंगराच्या आडच होता. फरक इतकाच होता, की आम्ही ऑलमोस्ट त्या डोंगराच्या उंचीपर्यंत खाली उतरलो होतो. मोबाईलला रेंज नव्हती. आमच्याकडे पुरेसे पाणी होते असे वाटत होते. आणखी पाणी आता आंबेवाडीशिवाय कुठेही नव्हते. त्यात समोर दरी. कालपासून जो काही इथला भूगोल पाहिला होता, त्यावरून एवढे कळले होते, की हे काम साधेसुधे नाही. सह्याद्री ज्या बेलाग, उत्तुंग कडेकपार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे, त्या इथे मुबलक आहेत. जरा पाय घसरला तर प्रकरण महागात जाणार एवढे नक्की. त्याचे एक जिवंत उदाहरण माझ्या आणि रोहितच्या मधून वाट उतरत होतेच. वाट सापडल्यावर कमीत कमी तीन तास खाली उतरायला लागणार होते. अशी सगळी गुंतागुंत डोक्यात सुरू होती. माझी ह्या भागात पहिलीच खेप असल्यामुळे मला ब्रॉड लेव्हलला दिशांचा अंदाज सोडला तर पायवाटांचे बारकावे अजिबात माहित नव्हते. अखेर शेवटचा अ‍ॅरो दिसला ती जागा फारशी दूर नसल्यामुळे आलो त्याच वाटेने माघारी फिरलो. पाच-सात मिनिटात वाट सापडली आणि काल दुपारी जिथे जेवलो होतो, त्या वाटेवर आलो. खरंतर अवघा पंधरा-वीस मिनिटांत हे सगळं घडलं. पण त्या क्षणी डोक्यात चाललेलं सगळं रामायण आत्ता या क्षणीही ठळकपणे आठवतं.

मोकळी जागा बघून सॅक आणि रोप्स खाली उतरवले आणि थोडं खाऊन घेतलं. रेंज आली म्हणून घरी फोन लावला आणि बायकोला वेळेची कल्पना दिली. 'सुखरूप आहे' हे तिला सांगण्यामागचं कारण तिला माहित नसलं मला नुकतंच पटलं होतं. खाली दूरवर गावातून ढोल आणि टिमक्यांचा आवाज येत होता. आज होळीपौर्णिमा! यंदाची ही होळी माझ्यासाठी अभूतपूर्व असा भटकंतीचं दान घेऊन आली होती. आपण ओंजळ पुढे करायची आणि दान स्वीकारायचं. रोहितने मोबाईलवर गाणी लावली आणि अचानक आम्हा तिघांनाही आजूबाजूचं वातावरण भरून गेल्यासारखं वाटलं. आतापर्यंत भवतालची किर्र शांतता ऐकून झाल्यानंतर हा चेंज खूप सुखद होता. वरून कपारीच्या जागेतून आमचे लोक टॉर्च मारत होते. त्यांना आमचे टॉर्चेस दिसत असल्यामुळे आम्ही कुठे आहोत हे त्यांना समजत होते. असा दूरचा आधार त्या क्षणी महत्त्वाचा वाटत होता. पुन्हा सॅक उचलल्या आणि निघालो. सॅक उचलताना खालून काही चिकटलं नाहीये ना, रोपच्या गुंडाळीत काही शिरलं नाहीये ना हे बघायला विसरलो नाही. जेमतेम वीसएक पावले चाललो असू, आणि फांद्या टाकून वाट बंद केलेली आढळली. तरी माहितगार रोहितने त्या फांद्या ओलांडून पुढे जाऊन वाट तपासली. वाट बरोबर होती. त्या फांद्या कुणी आणि का टाकल्या हे काही कळलं नाही. मग थोड्याच वेळात कुलंगची आंबेवाडीतून येणारी प्रचलित वाट लागली आणि मी मनातल्या मनात हुश्श! केलं.

एव्हाना पूर्ण अंधार पडला होताच आणि वाटही आता झाडीतून चालली होती. आधारासाठी मी हातात काठी घेतली होती. कुलंगचा प्रदेश म्हणजे अनेक प्रकारच्या सरपटणार्‍या जीवांचं निवासस्थान आहे. त्यामुळे 'आधारासाठी आता कुठल्याही झाडाला किंवा फांदीला हात लावायचा नाही' अशी सक्त ताकीद रोहितने देऊन ठेवली होती आणि त्याची तो वारंवार आठवण करून देत होता. श्वेताचं प्रत्येक पाऊल तिच्या इच्छाशक्तीचं दर्शन घडवत होतं. वाटेत काल ज्या पायरीवरून तिचा पाय घसरला आणि जो दगड तिच्या गुडघ्यावर घासला गेला, ती जागा आली. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहिलो. कालच्या त्या दु:खद क्षणांना श्रद्धांजली व्हायला नव्हे, तर आता हे नीट कसं उतरून जाता येईल ते बघायला. श्वेताची जिद्द आणि हिम्मत यांना मी मनातल्या मनात केव्हाच साष्टांग घातले होते. तो पॅचही उतरून पुढे झालो.  वाटेत एके ठिकाणी मोकळी आणि डोक्यावर उघडी जागा मिळाली, तिथे ब्रेक घेतला. नऊ वाजून गेले होते. ज्या गतीने चालत होतो ते बघता 'झापापाशी पोचायला अजून कमीत कमी तीन तास लागतील' अशी एक मनाशी नोंद करून ठेवली. कपारीमधून अजूनही टॉर्च येत होते. त्यांना प्रतिसादाचा सिग्नल दिला आणि पुढे निघालो.

वाटेत एक कोरडा धबधबा लागला आणि फायनली सर्व मोठे उतार संपले. इथून पुढे अजून बरंच अंतर चालायचं होतं, पण ते मोस्टली सपाटीवरून होतं. झाडी तर होतीच. झाडीचा तो शेवटचा टप्पा संपता संपेना. अखेर पुन्हा 'आपण वाट तर चुकलो नाही ना' अशी भीती वाटायला लागली. दर दहा पावलांना तिघे एकमेकांना विचारत होतो, की 'अजून किती चालायचंय? अजून हा पट्टा संपला कसा नाही? येताना तर अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला नव्हता, मग आत्ता का एवढा वेळ लागतोय?' शेवटी आपला वेगच इतका कमी आहे की त्यामुळे एवढा वेळ लागणारच यावर एकमत झाले. घड्याळात अकरा वाजायला आले होते. आजूबाजूला गर्द झाडी, किर्र रात्र, त्यात पौर्णिमा, त्यात बाराची वेळ... मग माझ्या मनात भलतेसलते विचार यायला लागले. 'मागून कोणी हाक मारली तर?', 'किंवा कसला आवाज आला तर?' आणि काय सांगू? असा विचार येत असतानाच माझ्याच पायाखाली काटकी मोडली आणि आवाज झाला. त्या क्षणी काळजात जे धस्स झालंय त्याला तोड नाही! एवढा दचकलो की जागीच थांबून गेलो. 'भीती ही पूर्ण मानसिक असते' ह्यावर त्या अनुभवाने शिक्काच मारला. मन खंबीर असेल तर हे क्षण सहज झेलले जातात. अखेर चार-पाच तास चाललो असं वाटल्यावर (प्रत्यक्षात अर्धा तास चाललो असू) एकदाचा तो टप्पा संपला. मोकळ्यावर आलो आणि माझ्या पुढे चालत असलेल्या श्वेताला चक्कर आली.

श्वेताच्या शारिरिक कष्टांची सर्व परिसीमा केव्हाच ओलांडली गेली होती. गुडघा तर दुखत होताच, पण आता घोट्यावरही भार येऊन तोही दुखायला लागला होता. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर एखादी व्यक्ती कायकाय करू शकते, त्याचं जिवंत उदाहरण गेल्या काही तासांमध्ये मी बघत होतो. ती जे काही चालत होती, त्यासाठी लागणारी एनर्जी कुठून येत होती हे तिलाच माहित! पण म्हणजे याचा अर्थ असाही होऊ शकतो, की आपण आपल्यावर मर्यादा घालून घेतो आणि जगत असतो. त्या कधीतरी मोडून जगलं की आपलं आपल्यालाही समजू शकतं की आपण किती उंच झेप घेऊ शकतो! एव्हाना माझाही खांदा दुखायला लागला होता. पण श्वेताच्या दुखापतीपुढे इतका वेळ त्याच्याकडे लक्षच गेलं नव्हतं. खरं सांगायचं तर आम्ही तिघेही केवळ एकमेकांसाठी आणि एकमेकांना प्रेरित करत चालत होतो. म्हणून केवळ गरजेपुरतंच थांबत इथपर्यंत येऊ शकलो होतो. आमच्यापैकी एक जण (मग तो कुणीही असो) जरी थांबला असता, किंवा हरला असता तर तिघांचं मनोबल खचलं असतं. सुदैवानं तसं काही झालं नाही.

वाट मोकळ्यावर आली असली तरी झाला तेवढा नाईट-ट्रेक पुरे झाला असं बहुतेक सह्याद्रीदेवाला वाटत नव्हतं. झापाच्या अलिकडे एक कोरडी नदी ओलांडायची होती. ती आम्ही इतकी अलिकडे ओलांडली, की तब्बल एक टेकडी अलिकडच्या शेतात उतरलो (हे तेव्हा कळलं नाही). आता हे वाचताना तुमच्या डोळ्यासमोर येत नसलं तरी माझ्या आत्ताही डोळ्यासमोर येतंय. आम्हाला तर हेही कळत नव्हतं की झाप नेमका कुठल्या दिशेला आहे! सुदैवाने (आणि केवळ सुदैवानेच) पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चंद्रप्रकाश भरपूर होता आणि त्यामुळे आजूबाजूला थोड्या अंतरावरच्या गोष्टी दिसत होत्या. झाडी संपवून मोकळ्या वावरात आलो होतो हेही एक बरं होतं. कपारीतून दिसणारे टॉर्च अजूनही दिसत होते. बिचारे बारा वाजले तरी आमचे लोक्स जागे होते! कारण आमचे टॉर्च दिसत होते, म्हणजे आम्ही पोचलेलो नाही हे त्यांना समजत होतं. 'झापापासून कपार दिसत नाही. आपल्याला टॉर्च दिसताहेत याचाच अर्थ अजून आपण झापापाशी आलेलो नाही', एवढं कळत होतं. दिशांचा अंदाज आजूबाजूला बघून येत नव्हता मग माझ्या डोक्यात एक आयडीया आली. मी सरळ कुलंगकडे बघितलं. आंबेवाडीकडे पाठ करून झापाजवळ उभं राहिलं की कुलंग उजव्या हाताला extended दिसत होता. आत्ता वावरात उभे राहून कुलंगकडे बघितलं तर कुलंग डावीकडे extended दिसत होता. याचाच अर्थ आम्हाला कुलंगकडे पाठ करून अजून उजवीकडे समांतर चालत जायचं होतं. झापाची तीच दिशा होती. तेव्हा कळलं की आपण एक टेकडी अलिकडे उतरलो आहोत. आता ती टेकडी पार कशी करायची ह्यावर विचार सुरू झाला. आणि नशीबाने हात दिला! टॉर्च इकडे तिकडे मारत असताना एका बोर्डवर गेला. बोर्ड? म्हणजे रस्ता असणार हा! आणि उभे होतो तिथून खरंच शंभर फुटांवर रस्ता जात होता. रात्रीच्या वेळी तो दिसलाच नाही. आंबेवाडीकडून इगतपुरीकडे जाणारा एक शॉर्टकट डांबरी रस्ता बांधला गेलाय, तोच हा रस्ता. डांबरी रस्ता लागल्यावर जे सुटल्याचे फिलींग आले ना, त्याची तुलना पेटार्‍यातून निसटल्याच्या फिलींगशीच होऊ शकेल. त्या रस्त्याने आंबेवाडीच्या दिशेला अंदाजे २ किमी चालल्यावर झापाकडे जाणारा कच्चा रस्ता लागला. त्या रस्त्याने झापापाशी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते! कपारीपासून निघाल्यापासून नऊ तासांनी डेस्टिनेशनला पोचलो होतो! आता ताबडतोब पुण्याकडे निघावं की गाडीतच झोपावं हे ठरत नव्हतं. शेवटी 'आंबेवाडीत भोरूकडे सामान पोचतं करू आणि मग ठरवू' असं ठरवलं. तिथे गेल्यावर सगळंच ठरून गेलं.

आंबेवाडीत भोरूकडे रोहित एकटाच गेला आणि भोरूला घेऊन आला. 'सागर सरांचा फोन आला होता. तुम्हाला पोचायला उशीर होणार म्हणून त्यांनी तुमच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं आहे. आता चला आणि जेवून घ्या.' हे ऐकून फार भारी वाटलं. ह्याला म्हणतात टीममेट्सची काळजी! आणि आम्ही इतकी तंगडतोड करून आलो होतो, की भुकेची इच्छाही विसरलो होतो. त्यामुळे ही बातमी गिफ्टसारखीच वाटली. (सागरला मनातल्या मनात किती वेळा सॅल्यूट मारला असेल याची गणतीच नाही!) भोरूच्या घरी चुलीच्या खोलीत पानं मांडली. चवदार डाळ-भात, भजी आणि पुरणाची पोळी! होळी अशा प्रकारे साजरी झाली! भोरूच्या गृहलक्ष्मीने डाळीमध्ये कशाची फोडणी घातली असेल याचा काही अंदाज लावू शकता? हां... बोला बोला.... तीन ट्राय! उत्तर आहे - दगडाची! नदीपात्रातल्या दगडाची. i was amazed and shocked! मी आयुष्यात पहिल्यांदा दगडाची फोडणी दिलेली डाळ खाल्ली. पण चवीला छान झाली होती. तर इतकं स्वादिष्ट जेवण झाल्यावर लगेच गाडी काढून पुण्यात येणं अशक्यच होतं. चुलीच्या उबेत पथार्‍या पसरल्या आणि झोपलो. दुसर्‍या दिवशी, सोमवारी सकाळी साडेसहाला स्टार्टर मारला आणि राजूर-कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा रस्ता केवळ दुसर्‍यांदाच उजेडात पाहिला. काही प्रवास अटळ असतात, हेच खरं! पुण्यात पोचायला बारा वाजले. ऑफिसला सुट्टी झाली.

माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची ही गोष्ट इथे संपते. सह्याद्रीचं आणि टीमवर्कचं हे आगळंवेगळं रूप ह्या दोन दिवसात बघायला मिळालं. टीममधल्या प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं असतं. ते तसं या मोहिमेतही होतं. उतरण्याचा अनुभव दोन गोष्टींमुळे लक्षात राहिल - पहिली, श्वेताची हिम्मत आणि जिद्द आणि दुसरी - रोहितची कमाल. उतरायला सुरूवात केल्यापासून थोड्याच वेळात नाळेच्या वाटेवर रोहित एके ठिकाणी पायाखालचा दगड सटकल्यामुळे ढुं*** वर जोरदार आपटला होता ही गोष्ट त्याने आम्हाला आम्ही खाली मोकळ्यावर येईपर्यंत सांगितलीच नाही. त्याच्या वेदना त्याने आम्हाला सांगितल्या तर नाहीतच, पण जाणवूही दिल्या नाहीत. श्वेताला सुखरूप खाली आणण्याची मोठी जबाबदारी त्याने अतिशय चोखपणे पार पाडली.

ही भटकंतीची गोष्ट माझ्या चिरकाळ लक्षात राहिलंच, पण साठी ओलांडल्यावर (जिवंत असलो तर) कलत्या उजेडात दिवेलागणीला किंवा रात्री झोपताना माझी नातवंडे (नशिबात असली तर) जेव्हा भोवती चिवचिवाट करतील, तेव्हा त्यांनाही सांगेन आणि हे क्षण पुन्हा जगून घेईन. तर दोस्तहो, पुन्हा भेटूच अशाच कुठल्यातरी कडे-कपार्‍यांमध्ये, कातळवाटेवर किंवा घळीत किंवा घाटवाटेवर. तोपर्यंत, have a safe trekking!
शुभास्ते पन्थानः सन्तु |

(क्रमशः)
- नचिकेत जोशी
टीपः चौथा भाग - फोटो आणि उपसंहार.


Friday, March 17, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग!

अलंग-मदन-कुलंग हे सह्याद्रीतलं एक वेगळंच प्रकरण आहे. कळसुबाईच्या सान्निध्यातलं हे त्रिकूट तिच्यासारखंच बेलाग, उंच आणि अवघड आहे. कळसूबाईच्या रांगेतली सगळीच शिखरं कमीअधिक तेवढ्याच उंचीची आणि कस पाहणारी आहेत. कळसूबाई हा सपाट प्रदेशातून आकाशात घुसलेला सुळका नसून, सारख्याच उंचीच्या डोंगरसमूहातलं एक सर्वात उंच शिखर आहे. माणसांचंही असंच असतं की! एखाद्या कर्तृत्त्ववान, यशस्वी, कीर्तीमान माणसाच्या संगतीत कमी-अधिक त्यासारखीच माणसे असतात (असावी लागतात). हे माणूस आणि त्याच्याभोवतीची माणसं याबद्दल झालं. पण हे एकाच माणसातील विविध गुणांबद्दलही खरं असू शकतं. म्हणजे एकाच माणसात अनेक उत्तम गुण थोड्याफार समप्रमाणात असतात आणि त्यातलाच एखादा गुण सर्वोत्तम असतो. म्हणजे कसं, की आशाबाईंचा गाणं हा सर्वोत्तम गुण आहे पण स्वैपाककलाही त्यांना उत्तम येते. सुमन कल्याणपूर गायकीसाठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याच बरोबर लोकरीचे विणकाम, स्वयंपाककला असे इतरही अनेक गुण त्यांच्यात आहेत. तर असो. अ‍ॅनॉलॉजी फारच झाली. मुद्दा हा, की जसा माणूस तशी त्याच्याभोवतीची माणसं. जसं कळसूबाई शिखर, तसे अलंग-मदन-कुलंग.

कुलंगची चढाई सह्याद्रीतली सर्वात मोठी चढाई का आहे ह्याचा पुरेपूर अनुभव त्या दिवशी मी घेतला. त्यात आमची वाट पूर्णपणे कुलंगच्या माथ्याकडे जाणारी प्रचलित वाट नव्हती. अर्धा कुलंग आंबेवाडीतून जाणार्‍या प्रचलित वाटेने चढल्यावर एके ठिकाणी दोन वाटा फुटतात. डावीकडे मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स लागतो आणि उजवीकडे कुलंगची वाट आहे. आता आमच्या लोकल गाईडने, चंदरने, आम्ही लहानपणापासून कुलंगच्याच प्रदेशात वाढले असून दर उन्हाळ्याच्या सुटीत कुलंगला वनभोजन करायला जात असू त्यामुळे आम्हाला कुलंगच्या डोंगरावरच्या सगळ्या वाटा तोंडपाठ आहेत अशी समजूत करून घेतली असावी. कारण स्वत:च्याही खांदा-पाठीवर भरपूर ओझं असून हा कधी भराभर चढून सगळ्यांच्या खूप पुढे जात होता तर कधी सगळ्यांच्या मागे राहत होता. आणि थकला की "लई सामान हाय" असं काहीतरी बडबडत होता. त्या वर सांगितलेल्या फाट्यावर साहेब कुलंगच्या वाटेला लागले तेव्हा अरूण सरांना कसलीतरी शंका आली आणि त्याला सरांनी थांबवले. चार-पाच उलट सुलट प्रश्न विचारल्यावर हे कळलं की चंदरला आम्हाला कुठे घेऊन जायचं आहे तेच कळलेलं नाही. आणि मग पुढची पाच-दहा मिनिटे हातातल्या काठीने त्या पाऊलवाटेवरच सरांनी आडव्या उभ्या रेघा मारून आपल्या त्या कुलंग आणि शेजारच्या डोंगराच्या मधल्या खिंडीत जायचं आहे हे समजावून दिलं. मी 'सर बोलतात कसे, काय काय सांगतात' ह्याचं बारकाईनं निरिक्षण करत होतो. सरांनी अगदी बालवाडीतल्या मुलाला समजावून सांगावं तसं त्याला समजावून सांगितलं. आणि हे सांगतानाही त्याला सतत इकडून तिकडून प्रश्न विचारून खात्री करून घेतली की त्याला नेमकं कळलंय कुठल्या खिंडीत जायचंय ते! याला म्हणतात अनुभव. तर मग मागे येऊन पुन्हा मदनगडाच्या दिशेने ट्रॅव्हर्सवरून आम्ही निघालो.

आता इथे घटना सांगितली पाहिजे, जिचा पुढे येणार्‍या गोष्टीशी खूप जवळचा संबंध आहे. ट्रेक-मोहिमांमध्ये दुखापती या नित्याच्या नसल्या तरी त्यांच्या शक्यता गृहीत धराव्याच लागतात. मागून येणार्‍या श्वेताचा पाय एका पायरीवरून घसरला आणि ती जवळपास सहा-एक फूट खाली घसरली. तिच्या मागेच असणार्‍या रोहनने प्रसंगावधान दाखवून तिला आधार दिला (नाहीतर तिच्या मते फॉल नक्की होता!). पण घसरत असताना पायरीतून बाहेर आलेल्या एक मजबूत आणि टोकदार दगडावर तिचा गुडघा घासत खाली गेला. गुडघा फाटला नाही तरी जबरदस्त मुका मार लागला. एवढं घडल्यावर मी असतो, तर चूपचाप कुणाचंही न ऐकता तिथूनच गावात खाली गेलो असतो. पण आपण नक्की कशाचे बनलेलो आहोत हे सिद्ध करणार्‍या काही वेळा नशिबात लिहिलेल्या असतात. श्वेताच्या नशिबात ती वेळ त्या दिवशी लिहिलेली असावी. तिने तरीही वर येण्याचा निर्णय घेतला आणि रोहित आणि रोहन (बिचारे) तिला शेवटपर्यंत वर घेऊन आले.

मदनगडाच्या ट्रॅव्हर्सला लागल्यावर मग लगेचच एका सुकलेल्या धबधब्याच्या पात्रात जेवायला थांबलो. एक वाजून गेला होता. शनिवारच्या दुपारचं जेवण घरूनच आणायला सांगण्यात आलं होतं. जवळजवळ तासभर जेवल्यानंतर मग पलटण पुढे निघाली. या तासाभरात जेवणाव्यतिरिक्त सागरला, जो संध्याकाळी पुण्यातून निघून रात्रीच मुक्कामाला पोचणार होता, त्याला वाटेबद्दल सूचना देऊन झाल्या. जेवणाच्या ठिकाणापासून काही अंतरावर वाट थेट नाळेत शिरली. आणि इथून पुढचे तीनएक तास आम्ही अंदाजे साठ अंशात फक्त चढत होतो. दगड, कातळ, माती, फांद्या, रॉकपॅच, पाय ठेवायला जागा असू दे अथवा नसू दे, एकच ध्येय - वर जाणे! त्यात पाठीवर ओझे! सॅकच्या वरून टाकलेले रोप्स. चढताना गुडघा फोल्ड व्हायचा. त्या रोप्सची वेटोळी कधी उजव्या गुडघ्यात तर कधी डाव्या गुडघ्यात अडकत होती. गुडघा सरळ व्हायच्या आत ती दिसली तर ठीक, नाहीतर मग झटका बसणार. थोडक्यात, एकाग्रतेचा आणि मानसिक खंबीर बनवणारा लाईव्ह कोर्स करत करत ती चढण चढत होतो. अरूण सर, सूरज, संजय खडूने बाण काढत पुढे जात होते. वाट एकच आणि वरच जाणारी होती हे त्यातल्या त्यात बरे होते. खिंड साधारण दोनशे फूट राहिली असेल. आणि एका ठिकाणी अडकलो. बाणवाले डाव्या बाजूने वर गेले होते आणि आम्हालाही 'आमच्याच वाटेने या' असा दम देऊन गेले होते. चंदर आमच्यासोबत होता आणि त्याने उजवी वाट पकडली. आमच्या मनात डावे-उजवे सुरू झाले. तसा मी तरी कुठल्याच बाजूला झुकलेला नसल्यामुळे लीडरची वाट तीच आपली वाट हे ठरवून डाव्या बाजूने वर निघालो. कारवीची झाडे चिक्कार होती आणि त्यांनीच आधार देऊन मला सुखरूप वर पोचवलं असं म्हटलं तरी चालेल. इकडे उजव्यावाटेने निघालेला चंदर पंधरावीस मिनिटात खिंडीत पोचलासुद्धा. आम्ही मात्र अर्ध्यातच अडकलो होतो. 'चंदरला बाणवाल्यांसोबत न राहता मागे रहायला कुणी सांगितलं होतं?' असं मी मनातल्या मनात म्हणालो. (आम्ही कायम मनातच म्हणायचं असं हक्काचं वाक्य आहे ना आमचं!)

अखेर बरीच धडपड आणि रोप्स वगैरे लावून खिंड गाठली तेव्हा साडेचार वाजले होते. सकाळी साडेनवाला सुरूवात करून इप्सित खिंड गाठायला एवढा वेळ लागला होता. ज्या झापापासून सुरूवात केली होती, तो एका डोंगराच्या आड गेला होता, तो डोंगर चांगलाच दूर आणि खालच्या बाजूला दिसत होता, तर झाप आणखी दूर असणार! आंबेवाडी तर कैच्याकै दूरवर दिसत होती. कुलंगचा ट्रेक जनरली आंबेवाडीपासून ट्रेक सुरू होतो. तिथपासून ते कुलंगचा माथा एवढं अंतर ही चढाई मानली तर ही नि:संशय सह्याद्रीतली सर्वात दीर्घ चढाई आहे.

आंबेवाडीच्या बाजूने बघताना कुलंगच्या डाव्या हाताला एक डोंगर आहे. त्याच्या पोटात काही नैसर्गिक कपारी आहेत. ह्या कपारी हीच आमची मुक्कामाची जागा असणार होती. जागा प्रशस्त आणि हवेशीर होती. भरपूर उजेड, खेळतं वारं, समोर अप्रतिम नजारा होता आणि कामाच्या ठिकाणाहून तीन मिनिटाच्या अंतरावर होती - अजून काय हवं असतं निवार्‍यासाठी? श्वेता-रोहित-रोहन-सूरज सोडून सगळे पोचले होते. राहण्याचा प्रश्न सुटला होता. आता पुढचा प्रश्न होता पाण्याचा. पाणी आणणं मस्ट होतं. पाणी मिळण्याची एकच जागा होती - कुलंगच्या माथ्यावरची टाकी. लगेच आम्ही सहा जण तयार झालो. प्रत्येकाने पाण्याचा ५ लिटरचा एक कॅन आणि दोन-तीन बाटल्या एवढं पाणी आणायचं नक्की झालं. तेवढं सगळं मिळून पन्नासएक लिटर पाणी आणता आलं असतं, जे चौदा आणि रात्री येणारे दोघे अशा सोळा जणांना उद्यापर्यंत पुरलं असतं.

पावणेपाच वाजता कपारीपासून सुरूवात केली. सुरूवातीचा टप्पा सोपा होता. कारण खिंडीपासून सरळ कुलंगला ट्रॅवर्स मारून जायचं होतं. झाडी-कातळात लपलेली पण स्पष्ट अशी एक पायवाट पार करून जायला आम्हाला फक्त पंधरा मिनिटे लागली. लागणारच! सकाळपासून पहिल्यांदाच आमच्या खांद्यावर रिकाम्या बॅग्स होत्या, त्यामुळे सगळी एनर्जी चालण्यावर वापरता आली. ट्रॅवर्स पार केला की ती पायवाट कुलंगच्या प्रचलित वाटेला मिळते आणि मग पुढे दोन्ही पायवाटा पायर्‍या चढू लागतात. ह्या ठिकाणापासूनसुद्धा कुलंगचा माथा बराच उंच दिसतो. असं वाटतं की आपण काहीच चढून आलेलो नाही. अजून एवढं उंच जायचंय हे बघितल्यावर माझा जागीच डॉबरमॅन झाला. (डॉबरमॅन होणे - दम लागल्यामुळे जीभ बाहेर येणे). हे कमी होतं म्हणून की काय, कुलंगच्या पायर्‍या एक एक फूट उंच आहेत. आणि ज्या एक फुटापेक्षा कमी उंच आहेत, त्यांच्या एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला exposure आणि फॉल आहे. 'उतरताना कसं होणार' हाच विचार करत मी एकदाचा वर पोचलो. आणि काय सांगू महाराजा! सगळा शिणवटा निघून गेला. जोरदार पश्चिमेचं वारं आणि डोळे सुखावणारा आसमंत! कळसूबाईच्या रांगेतला कुलंग हा शेवटचा डोंगर असल्यामुळे कळसूबाई-अलंग बाजू सोडली तर इतर सर्व दिशांना दूरदूरपर्यंत नजारच नजारा आहे! कुलंगवरून बघताना रतनगड तर 'तासाभरात संपवण्यासारखा' डोंगर वाटतो. लांबवरचा आजोबा, घोटी-इगतपुरी बाजू, पट्टा-औंढ्याकडच्या पवनचक्क्या, खुद्द कुलंगचं पठार आणि दिवसभराची ड्यूटी संपवून मावळतीला निघालेले भास्करशेठ! (ड्यूटी आणि शेठ हे जरा ऑड काँम्बो आहे, मान्य आहे!)

'दिवसभराचा घामेजलेला चेहरा, हातपाय सगळं अर्धी-अंघोळ करून धुवून टाकावं' ह्या प्रेरणेमुळे मी कुलंगच्या पायर्‍या चढून वर आलो होतो. तो विचार टाक्यातलं पाणी ओंजळीत घेतल्याबरोब्बर गारठला. पाणी एवढं थंड होतं की विचारता सोय नाही! त्यात सूर्यदेवांनी जाता जाता सुस्कारे म्हणून गार वारे धाडायला सुरूवात केली होती. मला क्षणभर कळेच ना की मार्च आहे की डिसेंबर? पण कुठलाही महिना असला तरी हेच पाणी भरून घ्यायचं होतं आणि खाली उतरायचं होतं. श्वेताला सुखरूप पोचवून रोहित आणि रोहन लगेचच पाणी आणायला कुलंगवर आले. (काय स्टॅमिना बाप रे!) तासभर तिथे घालवल्यावर मग सगळेच उतरायला लागलो. माझा एक विचित्र प्रॉब्लेम आहे - तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांगू नका. दरी किंवा exposure डाव्या हाताला असलं की मी निर्धास्त असतो. ते उजव्या हाताला आलं की माझी जाम तंतरते. आता उतरताना ते उजव्या हाताला होतं. म्हणून मग मी मागे रूपेशला थांबवून ठेवलं. आणि प्रत्येक पायरीवर स्वामींचं नामस्मरण करत शेवटी त्या पायर्‍या उतरून आलो. ट्रॅवर्स सुरू झाला तेव्हा अंधार पडला होता. शुद्ध पक्षातल्या चतुर्दशीचा चंद्र मोठ्या आत्मविश्वासाने आकाशातली वाट चालायला सज्ज झाला होता. कपारींपाशी आलो तेव्हा पूर्ण काळोख झाला होता. मी चंद्राकडे खूप निरखून पाहिलं पण 'चौदहवी का चांद'ची एक्स्ट्रा खूबसूरती काही मला दिसली नाही. मग मी त्याच्याकडे टक लावून पाहणं थांबवलं. आम्ही पाणी आणायला गेलो तेवढ्या वेळात किचन डिपार्टमेंटच्या लोकांनी पाण्याच्या शोधासाठी सगळ्यांच्या बॅगा उघडल्या होत्या. तेव्हा त्यांना माझ्या बॅगमध्ये सव्वा लिटरची (इमर्जन्सीसाठी लपवून ठेवलेली) बाटली सापडली होती. और उसकी बदौलत हम सबको शेव बटाटा पुरी नसीब हुई. त्यावर ताव मारला आणि मग बॅग आणि झोपण्याची व्यवस्था लावायला गेलो. मास्टरशेफ मंदारने अप्रतिम चवीचा मसालेभात, आणि फ्लॉवर-बटाटा भाजी बनवली. जेवत असताना सागरचा वॉकीवर कॉल आला. तो आणि मालतेश झापापाशी आले होते. त्यांना अरूणसर आणि सूरजने वाट समजावून दिली. फक्त प्रॉब्लेम असा झाला की एकाने झापापासून आणि दुसर्‍याने कपारीपासून सांगितली. त्यामुळे सगळे उजवे-डावे संदर्भ उलट सुलट झाले. शेवटी संजय मध्ये पडला आणि त्याने (सूरजला) थांबवले. वॉकी ऑन ठेवायचे वायदे झाले. 'ओव्हर अँड आऊट' करून सगळे आपापल्या स्लिपिंग बॅग्जमध्ये शिरले. चिक्क्कार थंडी होती. उन्हाळा असेल या समजूतीने फार काही कपडे आणले नव्हते. पण काय ऑप्शन नव्हता. तरी अरूण सरांनी त्यांच्याकडचा एक्स्ट्रा टी-शर्ट मला दिला म्हणून थोडीफार थंडी कमी झाली.

मोहीम सोमवारपर्यंत चालणार असली तरी मला रविवारीच निघणं गरजेचं होतं. माझ्यासोबत श्वेता आणि रोहितही निघणार होते. श्वेताचा पाय चांगलाच ठणकत होता. हा असाच राहिला तर आलो त्याच्यापेक्षा जास्त वेळ उद्या उतरायला लागणार होता. आजच्या दिवसभरात फक्त बेसकॅंप लागला होता. चढाईचा पहिला बोल्टसुद्धा अजून ठोकायचा बाकी होता. सगळी परिस्थिती बघता मला क्लाईंब करायला मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. ध्यानीमनी नसताना कुलंग किल्ला चढून झाला होता. त्यामुळे या मोहिमेतून क्लाईंब नाही तरी 'टेक अवे' मिळालंच होतं. पहिल्यांदाच टीममध्ये सिलेक्ट झालेल्या खेळाडूला मैदानावर फिल्डींग करायचीही संधी मिळण्यासारखंच हे होतं. आणि त्या घडीला दोनच गोष्टी प्राधान्यावर होत्या - उद्या रात्री कितीही उशीर झाला तरी पुण्यात पोचणे आणि श्वेताला सुखरूप खाली पोचवणे. उद्याचं उद्या बघू असं म्हणून जेवण झाल्यावर कॉम्बिफ्लॅम घेऊन टाकली. आणि देवाचं नाव घेऊन स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी



Thursday, March 16, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....

काही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळा (कारच्या चाकांखाली) तुडवलाय, त्यातल्या फक्त एकदाच तो दिवसाउजेडी केलाय. बाकी सगळ्या वेळी रात्री एक ते तीन हीच वेळ ह्या प्रवासाबद्दल नियतीने माझ्यासाठी राखून ठेवली आहे. बोटा सोडलं की धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याशेजारून जाणारा रस्ता, मग ब्राह्मणवाड्यानंतरचा पाडाळणे आणि भोजदरी गावांना जोडणारा घाट, कोतूळ गावातले एकेकाळचे जगात वाईट आणि आता कमालीचे तुळतुळीत रस्ते, मग राजूरच्या अलिकडचा आणखी एक घाट, घाट संपल्यानंतर एका मंदिराला ऑलमोस्ट खेटून वळणारा अरूंद रस्ता हे सगळं आता पाठ झालंय. दरवर्षी जायंट स्विंगला नेणारा आणि आणणारा हाच तो रस्ता. मागच्या आठवड्यात गेलो तेव्हा मात्र यापैकी बराच रस्ता खूप सुधारल्याचं जाणवलं. राजूर गेलं आणि घोटी रस्त्याने बारी गाव पार केलं. उतार उतरून वासळी फाट्यावरून गाडी आंबेवाडीकडे वळवली तेव्हा आसमंत थंडगार पडला होता. तशी थंडी बोटापासूनच सुरू झाली होती. कारमध्ये होतो म्हणून आम्ही सुरक्षित होतो. संजय आणि रोहित बाईकवरून येत होते, त्यांची मात्र हालत खराब झाली होती. त्यात रोहित एक दिवस आधी तापाने आजारी होता हेही कळलं. संजयने 'मी बाईकवर येणार नाही' हा निश्चय याहीवेळी मोडला होता. (ट्रेकरलोक्स इतके उपद्व्याप का करतात हा तुमच्या मनातला प्रश्न! - पोचला मला. पण त्याला उत्तर नाही. )

आंबेवाडीच्या पुढे तीन किमीवर पांडुरंगच्या झापापाशी पोचलो तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. शुद्ध पक्षातल्या त्रयोदशीचा चंद्र आकाशात केव्हाच आला होता. त्याच्या प्रकाशात कुलंग-मदन-अलंगच्या रांगेची किनार दिसत होती. अरूण सरांच्या प्लॅननुसार आम्ही झापापाशी पोचल्या पोचल्याच सामान घेऊन कुलंगच्या दिशेने चढायला सुरूवात करणार होतो. ह्यामुळे दुसर्‍या दिवशीची चढाई कमी झाली असती. पण पुण्याहून आधीच २०० किमी ड्राईव्ह करून आलो होतो, आणि मुंबईहून आलेले सगळे ताडपत्री अंथरून त्यावर केव्हाच स्लीपींग बॅगमध्ये विलीन झाले होते. त्यामुळे अरूण सरांनीही मग 'दोन-एकतास झोपून सहा वाजता उठून चालायला लागू' असं सांगितल्यावर आम्हीही झोपेच्या वाटेने निघालो. मार्चमध्येही हवेत गारठा होता. त्यात मला थंडी हे प्रकरण मुळीच झेपत नसल्यामुळे माझी थडथड सुरू व्हायच्या बेतात होती. बाहेर झोपण्यापेक्षा मी गाडीतच झोपणं पसंत केलं.  जी काही दोन-तीन तास झोप झाली, त्यात रात्रभर 'इन्ना सोणा रब ने बनाया' हीच एक ओळ सारखी मनात वाजत होती. त्याचं कारण आजपर्यंत कळलेलं नाहीये. मीच मग त्या ओळीतलं 'सोणा' हे 'सोना-झोपणे' या अर्थी असेल, म्हणजे एवढीच झोप रबने नशिबात ठेवली असेल अशी समजूत करून घेतली.

बरोब्बर सहा वाजता अरूण सरांनी काचेवर टकटक करायला सुरूवात केली. (देवा! जरा झोपू देत नाहीत). जायंट स्विंगच्या वेळी तर बरोब्बर साडेपाचला हाका मारायला सुरूवात करतात. कुणी उठलं नाही, तर मग टेंटच्या झिप उघडून ठेवतात. (घ्या, डिसेंबरातल्या पहाटेचा वारा खात झोपा!) पण हा माणूस सह्याद्रीत आडवाटांचे ट्रेक करण्यासाठीच जन्माला आला आहे. त्यांच्यासाठी हे थंडी-पाऊस वगैरे निसर्गाचे खेळ किरकोळ आहेत. तर ते असो. मी तरी पंधरा मिनिटे झोपून घेतलं. माझी सरांबरोबरची आयुष्यातली ही पहिलीच expedition होती. त्यामुळे मी काय क्रिकेट टीममध्ये पहिल्यांदाच सिलेक्शन झालेल्या होतकरू खेळाडूसारखा होतो. बाकीचे बरेच जण सरावलेले होते.

उजाडलं तेव्हा कुलंगचा माथा काळसर ढगात बुडाला होता. ते बघून माझ्याही मनावर शंकेचे काळे ढग जमा झाले. थंडी झेपत नाही, त्यात आता पाऊसही! वेधशाळेने दोनच दिवसांपूर्वी 'पुण्यात येत्या तीन-चार दिवसात गडगडाटी पाऊस पडेल' असा अंदाज दिला होता. पण पावसाचे ढग कुलंगच्या प्रदेशातून येतील हे काही सांगितलं नव्हतं! 'वेधशाळेची कार्यपद्धत अजून आधुनिक करायची गरज आहे' असा एक प्रातःस्मरणीय विचार डोक्यात शिरताच मग प्रसन्न वाटून गेलं. मीही पावसाची शंका बोलून दाखवताच रोहितने "बाबा! ('बाबा' हे 'येड्या भो***' अशा अर्थी घ्यायचं) इथल्या भागातल्या गारा खाल्यात! पावसाचं नाव काढू नकोस!" असं सुनावलं. घ्या! आता थंडी-पाऊस पुरेसे नव्हते की काय, म्हणून गारा! मी शेवटी तो विचारच झटकून टाकला. मग गरमागरम चहा तयार झाला. त्यासोबत कुणी कुणी काय काय आणलं होतं, ते खाऊन झालं. मी उकडलेली अंडी नेली होती, ती वाटून टाकली. (तेवढंच ५०-१०० ग्रॅम वजन कमी झालं आणि सकाळी सकाळी प्रोटिन्सही मिळाली).

मग सॅक भरायला सुरूवात झाली. क्लाईंबिंगसाठी आणलेलं सगळं हार्डवेअर, equipment, बेसकँपचं सगळं सामान ताडपत्रीवर अंथरण्यात आलं. ते इतकं जास्त दिसत होतं, की हे एवढं वर न्यायचं आहे हे मला आधी खरंच वाटलं नाही. मग सूरजने परिस्थितीचा ताबा घेतला. त्याचे सॅक भरण्याचे बेसिक-अ‍ॅडव्हान्स सगळे कोर्सेस झालेले असावेत. त्याने हुकूम सोडला - "प्रत्येकाने आपापल्या सॅक दाखवा. त्यात हे सामान कसं बसवायचं ते मी सांगतो". मी 'हीच ती वेळ, हाच तो क्षण' साधून माझी सॅ़क त्याच्याकडून भरून घेतली. हा आनंद क्षणभरच टिकला. कारण आता सॅकच्या वरच्या भागात बरीच जागा रिकामी झाली होती. त्यामध्ये सूरजने बरंच काय काय भरलं. सॅकची extended जागाही वापरून झाली. माझी सॅक पूर्ण भरल्यावर जमिनीपासून माझ्या कंबरेपर्यंत येते ह्याचा साक्षात्कार त्या दिवशी मला झाला. असेच काही साक्षात्कार इतरांनाही झाले असावेत. पूर्ण भरून झालेली सॅक मोठ्या डौलात मातीत उभी होती. ही आपल्याला पाठीवर घेऊन चालायचं आहे, हे जाणवताच माझा डौल मावळला. आंबेवाडी सोडलं तर थेट कुलंगच्या माथ्यावर पाणी आहे. ही चढाई 'सह्याद्रीतली सर्वात मोठी चढाई' आहे असं घाबरवणारं काहीतरी मी नेटवर वाचलं होतं. त्यामुळे तब्बल साडेचार लिटर पाणी घेऊन निघालो होतो. एवढं ओझं मी आजपर्यंत क्वचित घेतलं असेल. त्यात कारमधून ट्रेकला जाणे सुरू झाल्यापासून तर सॅक भरण्याचं कौशल्य तर विसरूनच गेलो होतो आणि आळशीपणाच वाढला होता.

सगळ्यांच्या सॅक भरेपर्यंत साडेआठ केव्हाच वाजून गेले. इकडे ताडपत्रीवर अंथरलेलं सगळं सामान कुणाच्या ना कुणाच्या सॅकमध्ये गुडूप झालं होतं. हे सगळं करण्यात वेळ चालला होता. एरवी जायंट स्विंगच्या वेळी वेळेबाबत कमालीचे दक्ष असणारे अरूण सर ह्यावेळी काहीच बोलत नव्हते. मला कळेना की आजच्या दिवसाचा प्लॅन नक्की काय आहे? मी तसं एकदोनदा विचारूनही पाहिलं. पण कुणी काय खबर लागू दिली नाही. (त्यांनाही प्लॅन माहित नसेल, दुसरं काय!) आणि मुख्य म्हणजे ही मोहीम होती, कमर्शिअल ट्रेक नव्हता. आजपर्यंत कुणीही सर न केलेली कुलंगच्या पूर्वेकडची सहाशे फूट उंच भिंत (कडा) चढून जाण्याचं ध्येय होतं. त्याला क्लाईंबर्सच्या भाषेत virgin wall किंवा cliff म्हणतात. (काय परफेक्ट शब्द आहे ना!) पूर्ण जमली नाही तर जितकी जमेल तितकी चढून सुरक्षितपणे खाली येण्याला प्राधान्य होतं. 'मला विजयाचा हट्ट धरण्यापेक्षा वेळ बघून माघार घेण्यातलं समाधानही तितकंच आवडतं' - इति अरूण सर. ह्यातले सगळे सहभागी लोक्स चांगले ट्रेकर्स आणि उत्तम दमाचे होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत थोडेफार पुढेमागे चालणारच होते. अखेर, आंबेवाडीतल्या चंदरला - आमच्या वाटाड्याला, घेऊन सगळी पलटण निघाली तेव्हा साडेनऊ वाजले होते. रात्रीच चढून जाणारे आम्ही 'निघू निघू' म्हणता म्हणता अखेर सकाळी उन्हात चढणार होतो. पण झापापासून निघून पुन्हा झापापर्यंत येण्याच्या पुढच्या एकोणचाळीस तासामध्ये जे काही भाग्यात अनुभवायला मिळालं त्याचं वर्णन 'अवर्णनीय' या एकाच शब्दात करता येईल. जी वॉल चढायची होती, त्या वॉलच्या खाली एक खिंड होती, त्या खिंडीपासून चढाईला सुरूवात होणार होती. पण आपण चढून नेमकं कुठे जायचं आहे आणि आज रात्रीचा मुक्काम कुठे करायचा आहे, हे अरूण सर सोडून कोणालाच माहित नव्हतं.


(क्रमशः)
- नचिकेत जोशी



Friday, July 17, 2015

सह्यमेळावा २०१५ - भाग ३ (अंतिम): किल्ले पिंपळा उर्फ कंडाळा

मुक्कामाची सोय सुरेखच होती. शांत गाव, ऐसपैस मंदिर, आणि ट्रेकमध्ये असल्याची जाणीव! अजून काय हवं? डावीकडे शाळा आणि उजवीकडे मंदिर -



रविवारच्या सकाळच्या नाष्ट्याचा जिम्मा आम्हीच उचलला होता. बर्‍याच घमासान चर्चेनंतर नाष्ट्याला मिसळपाव फायनल झाले होते. प्लॅननुसार सकाळी साडेसातला पिंपळ्याकडे निघायचे होते. म्हणजे मिसळपाव टीमला त्याआधी नाष्टा तयार ठेवावा लागणार होता. पण सकाळच्या 'मुख्य' कामांमध्येच इतका वेळ गेला की सुरूवातीपासूनच उशीर होत गेला. एकतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत पिके नसलेली रिकामी शेते पसरली होती. पुढचं लिहित नाही आता. सूज्ञास सांगणे न लगे.

मिसळ तयार होईपर्यंत मी हेमकडून RAAM (Race Across America) बद्दलच्या माझ्या शंका निरसून घेतल्या. हेम काय, आशिश काय (आशुचँप), सायकलमधले दिग्गज! एवढा स्टॅमिना, एवढी धडपड पाहिली की आपणही असं काहीतरी करावं याची सुरसुरी येते (जशी येते तशी जातेही हेच तर दु:ख आहे!). RAAM जिंकून नुकत्याच भारतात परतलेल्या नाशिकवासी डॉ. महाजन बंधूंना भेटण्याचा उपकार्यक्रम या मेळाव्यामध्ये होता.

मिसळ फक्कड झाली होती. ते अवघड काम अनिरुद्ध केळकर आणि सवंगड्यांनी पार पाडले. तेव्हाचा एक किस्सा आठवला. मिसळची उसळ आणि तर्री घेण्यासाठी विनय भिडेंनी पसरट डिश पुढे केली. त्यावर अनिरुद्धने 'काय भिडे? रस्सा घ्यायला पसरट प्लेट काय कामाची?' असा सवाल केला. त्यावर सिनिअर भिडेंनी आपल्या उपजत हजरजबाबी शैलीने 'अरे! नाष्ट्याला मिसळ होती?? मला माहितच नाही' असे उत्तर दिले. हातातली मिसळप्लेट घेऊन भिडे पितापुत्र बाहेर व्हरांड्यात येऊन बसले. तेव्हा श्रेयस उर्फ ज्युनिअर भिडेंनी बाबांना विचारले, 'बाबा, जर तुला माहित नव्हतं नाष्ट्याला मिसळ आहे तर मग तू सॅकमधून फरसाणाची पॅकेट्स का आणलीस?' सबंध व्हरांड्याने हे वाक्य ऐकलं आणि पुन्हा हास्यकल्लोळ! सीनिअर भिडेंना मी क्वचितच चूप झालेलं पाहिलंय, अँड दॅट वॉज वन ऑफ दोज रेअर मॉमेंट्स! अ‍ॅक्च्युअली, बच्चेकंपनीतील कोणी बाबाशी बोलायला लागला की आम्ही हळूच शांत बसायचो कारण काहीतरी 'वस्त्रहरण' ऐकायला मिळणार याची खात्री असायची. (माझ्या डोक्यात मात्र सारंग ट्रेकला यायला लागल्यावर आपलंही हेच होणार आहे वगैरे विचार यायचे)

तर मिसळप्रकरण संपवून आम्ही सॅक्स भरल्या आणि पिंपळ्याकडे निघालो. पिंपळ्यावर अजिबात पाणी नाही हे माहित असल्यामुळे प्रत्येकाला एक्ट्रा पाणी घेऊन ठेवायला सांगण्यात आले होते. हा किल्ला साधारण वीसएक वर्षांपूर्वी नाशिकच्या गिरीश टकले यांनी कागदपत्रांतील माहितीच्या आधाराने शोधला.  पिंपळा हा प्रत्यक्षात किल्ला नाही. माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. एक गुहा आहे. पण माची, तटबंदी, दरवाजा यापैकी काहीच नाही. पण याचे भौगोलिक स्थान पाहता 'वॉचटॉवर' म्हणून याचे महत्त्व असावे. या किल्ल्याचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, किल्ल्यावर असलेले नेढे. हे नेढे बहुधा सह्याद्रीतील सर्वात मोठे नेढे असावे. एकावेळी सव्वाशे ते दीडशे माणसे आरामात बसू शकतील एवढे हे मोठे आहे.

सावरपाड्याहूनच पिंपळ्याकडे पायवाट निघते. रात्रभराच्या वार्‍यानंतर सकाळ झाली तीच मुळी काळ्याशार ढगांची तलम शाल नभावर घेऊन! आज(तरी) पाऊस पडणार काय असा विचार करत करत पिंपळ्याकडे निघालो. पिंपळ्याचे पहिले दर्शन -





या वरच्या फोटोत पिंपळ्याचे नेढे दिसले ना? :)

ही वाट सुरेखच आहे. त्यात आल्हाददायक हवा सतत सोबत होतीच. ऊन्ह, उकाडा असा प्रकार सुदैवाने नव्हताच. पहिलं पठार येईपर्यंत पिंपळा नवनवीन रूपे दाखवत होता.



बरेच चालून/चढून आलो की!



ही वाट अंदाजे दोन तासांची आहे. सुरूवातीला सपाटी, मग अंगावर येणारा चढ, मग विस्तीर्ण स्वर्गीय पठार आणि पुन्हा शेवटच्या टप्प्यातला सुमारे पासष्ट-सत्तर अंशातला चढ अशी थोडक्यात वाट आहे. वाटेत स्थानिक वाटाड्याने कोशिंब नावाची फळे काढून दिली. चवीला कोकमासारखी ही फळे असतात. 'व्हिटॅमिन सी' भरपूर! एकदा तोंडात टाकली की बराच वेळ तोंडात घोळवत ठेवावीत अशी ही फळे. हा अचानक मिळालेला रानमेवा दिलखूश करून गेला.





प्रत्यक्ष पिंपळा डोंगराचा चढ अंगावर येणारा आहे. पण त्याच्या पायथ्याचं पठार म्हणजे या ऋतूतला स्वर्ग आहे. पिंपळ्याकडे यायला मळेगावातूनही एक वाट येते. आपण तिथून का नाही आलो हे ओंकारला विचारल्यावर त्याने 'तिथे मुक्कामाची सोय झाली नाही' इत्यादी किरकोळ कारणे दिल्यावर सांगितले, 'त्या वाटेने आलो असतो तर हे पठार miss झालं असतं. तू पठारावर गेल्यावर बघशील काय वाटतं ते!'. खरंच होतं ते! तिथे जो वारा वाहत होता, त्याला सोसाट्याचा, भणाणता वगैरे विशेषणे कमी पडतील. केवळ सुख! त्यात सूर्य ढगाआड! मग अजून काय हवं?
तिथून दिसणारा व्ह्यू तर नजरबंदी करणारा! पठारावरून घेतलेला पिंपळा -



पिंपळ्यावरून घेतलेला पठाराचा फोटो -



पिंपळ्यावरील नेढं हे बहुधा सह्याद्रीतील सर्वात मोठं नेढं आहे. एकावेळी शंभर-सव्वाशे माणसे आरामात बसतील अशी ही जागा आहे. तिथे इतका वारा होता की कुणीतरी 'मल्लीला धरून ठेवा रे' अशी कॉमेंटही केली. हॅट तर सर्रास उडत होत्या. नेढ्यापुढील झुडुपात जाऊन पडत होत्या. नेढ्याशेजारीच एक गुहासदृश खिंडार आहे. त्याच्या दुसर्‍या बाजूला कातळाला भेगा पडल्या असून त्यातून वारा वाहणे सुरू झाले आहे. वार्‍याबरोबर धूळ आणि मातीही उडू लागली आहे. यावरून अजून चार-पाचशे वर्षांनी इथे दुसरे नेढे तयार होईल आणि जुळी नेढी असलेला महाराष्ट्रातला (भारतातला?) एकमेव किल्ला (?) म्हणून पिंपळा प्रसिद्ध होईल असे भा़कीत मनोजने मांडून टाकले.





सह्याद्रीतला सर्वात उंच किल्ला साल्हेर (डावीकडे) आणि सालोटा (उजवीकडे) -




नेढ्याच्या बाजूने कातळखाचेतून माथ्यावर वाट आहे. बिचार्‍या श्रेयसला (ज्युनिअर भिडे) ती दिसली नाही आणि त्या कातळावरूनच वर जायचे असावे अशी समजूत त्याने करून घेतली. त्यावर 'Oh Baba! is this way to go up? this is so insane!!' या त्याच्या निरागस कॉमेंटवर हसून हसून माझे हृदय शतशः विदीर्ण झाले.

कातळखाचेवर बच्चेकंपनीचा उत्साह अपूर्व होता. दर्शनने तर (ज्युनिअर आशुचँप) वर चढताना 'सरका, सरका' चा घोष लावला होता आणि एके ठिकाणी हात टेकायला जागा मिळाली नाही म्हणून पुढे असलेल्या विनयच्या गळ्याभोवती हात गुंफून विनयचा उभ्या जागी पुतळा करून टाकला. माथ्यावर बघण्यासारखे काहीच नाही. तीनशेसाठ अंशातल्या डोंगररांगा, चढून आलो ती वाट, दूरवर सावरपाड्याचा रस्ता मात्र प्रेक्षणीय!



पुन्हा नेढ्यात आलो आणि काल रात्री झालेल्या चर्चेचा गोषवारा आणि घेतलेले निर्णय सर्वांना कळवण्यात आले. त्यानुसार या मेळाव्याला जे येऊ शकले नाहीत ते वगळता सह्यमेळाव्याच्या सदस्यसंख्येत यापुढे कोणाचीही भर पडणार नाही असे ठरले. हाच एक मुख्य निर्णय होता. उतरताना कसरत होती. सत्तर अंशाचा उतार उतरून जाण्यापेक्षा डोंगराला वळसा घालून उतरूया असा प्रस्ताव ओंकार सीएमने मांडला आणि इथे पहिल्यांदाच विरोधात मते पडली. मी (अर्थातच) विरोधाला पाठिंबा दिला. शेवटी आम्ही दहा-बारा जण त्या उताराची फुल्ल मजा घेत आलो आणि बाकीचे वळसा घालून आले.

पठारावर आल्यावर डोळे मिटले आणि पंधरा मिनिटे शांततेशी गप्पा मारत बसलो. चौफेर वाहणारा वारा, आजूबाजूचा दंगा यातून हळूहळू मन शांत, अलिप्त होत गेलं आणि पुढे उरली फक्त वाहती शांतता. तो वारा जर नसता तर अजून सुखी शांतता ऐकायला मिळाली असती. पुढे कधी काळी आयुष्यातल्या काही अविस्मरणीय वेळा आठवायची वेळ आली तर त्यात ही पंधरा मिनिटे नक्की लक्षात येतील. असो. सगळे पठारावर आल्यावर गृप फोटोसेशन झाले. एव्हाना एक वाजून गेला होता.


(फोटो क्रेडिट - सुनिल पाटील)

आता पुन्हा तिरकस उतार, पठार आणि गाव! उतरताना तनिष्कला (ज्युनिअर संतोष काशिद) सुसाटत उतरताना पाहून काळजीने मी त्याचा हात पकडला आणि माझ्याबरोबर उतरायला लावलं. बिचार्‍याने निमूटपणे काही अंतर ती आज्ञा पाळली. पण मी मुळात माझ्या तब्येतीला जपत उतरत असल्यामुळे त्याची अडचण व्हायला लागली. मग ते माझ्याही लक्षात आल्यामुळे मी त्याचा हात सोडून दिला. तत्क्षणी ज्युनिअरसाहेब पुन्हा गती पकडून दिसेनासे झाले. आणि उतरताना 'पाय कुठे टाकावा, कुठे टाकू नये, वेग बॅलन्स कसा करावा' याचं इतकं सुंदर प्रात्यक्षिक देऊन गेले की काही वर्षांनी ही मुलं नक्कीच उत्तम क्लाईंबर/ट्रेकर होतील अशी खात्रीच वाटायला लागली. मी त्याचा हात पकडून उगाच एका उडत्या पक्ष्याचं आकाश बांधून ठेवत होतो असं वाटून गेलं.

येताना एका वेगळ्या वाटेने उतरण्याचा आनंद घेत गावात आलो तेव्हा अडीच वाजून गेले होते. जेवायला मिसळीची उरलेली उसळ अ‍ॅड करून फक्कड उसळ-भाकरी बेत होता. चिकनही होतेच. बरेच दिवसांपासून लिस्ट वर असलेला सह्यमेळावा संपत आला होता असं वाटत होतं. तिथून निघायला चार वाजले.

नांदुरी मार्गे सप्तशृंगीगडाला वळसा घालून येताना अचला-अहिवंतपासून चांदवडपर्यंत पसरलेल्या सातमाळ रांगेतले बरेचसे किल्ले एकाच ठिकाणाहून दिसले. सोबत माहिती पुरवायला तत्पर तल्लख ओंकीपिडीआ उर्फ ओंकार होताच.
सप्तशृंगीगड -


सप्तशृंगीगडाच्या समोरचा मोहनदरी किल्ला, यालाही नेढं आहे. या नेढ्याची एक आख्यायिका आहे. देवी आणि एका दैत्याचं युद्ध झालं. देवीपुढे निष्प्रभ होत चाललेल्या त्या दैत्याने रणांगणातून पळ काढला. तो दैत्य या डोंगराआड गेला असताना पाठलाग करता करता देवीने या डोंगरावर प्रहार केला, त्यातून हे नेढं तयार झालं. मूळ नाव - मोहिंद्री, अपभ्रंश - मोहनदरी. (संदर्भ - स्थानिक गावकरी आणि ओंकार ओक)





विस्तीर्ण अहिवंतगड -


सप्तशृंगीगडाच्या शेजारचा मार्कंडेय डोंगर -


सप्तशृंगी, मार्कंडेय आणि रवळ्या-जावळ्या -


नाशकात आलो तेव्हा साडेसहा वाजले होते. नाईलाजाने डॉ. महाजनबंधूंना भेटण्याचा कार्यक्रम रद्द केला आणि बस पुण्याकडे निघाली. रविवार संध्याकाळ, त्यात पालखीनिमित्त वारकर्‍यांना घेऊन निघालेले ट्रक आणि दुपदरी रस्ता यामुळे प्रवास खूप वेळखाऊ झाला.

राजगुरूनगरच्या टोलनाक्यावर आलो तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. फिर वही रात! फिर वही बात! टोलवाल्यांशी सह्यमेळाव्याच्या शिलेदारांची बाचाबाची! "टोल भरावाच लागेल" ही त्यांची सक्ती आणि १. गाडी MH14 ची आहे. २. इथून जाताना परवा रात्री टोल नाही घेतलात मग आत्ताच का? ही आमची दोन बिनतोड पण निष्फळ उत्तरे यात अर्धा तास मोठा मजेत गेला. मग तिथल्या आयआरबीच्या अधिकार्‍याचे तिथे अवतरणे (बहुधा झोपमोड झाल्यामुळे तो चिडलेला असणे), 'एकवेळ टोल न घेऊन तुम्हाला सहकार्य केले ही बकवास' 'तुम्ही टोल न भरून महाराष्ट्राची शान घालवता आहात' वगैरे त्याचे बरळणे (हे ऐकून तर माझी सटकलीच होती, कैच्याकै!) मग नाईलाजाने त्याच्या हातावर सत्तेचाळीस रुपये टेकवणे हे प्रकार यथासांग पार पडले. मला तरी नाशिक हायवेवरच्या या टोलनाक्यांची भानगड समजतच नाही. पुढच्या वर्षी याच मार्गाने यायची वेळ आली तर सगळी माहिती आधीच काढून या टोलवाल्यांची दादागिरी उतरवायचं फार मनात आहे! असो.

अपरात्र झाली असल्यामुळे प्रत्येकाला ऑलमोस्ट होमड्रॉप मिळाला. मला घरी पोचायला पहाटेचे साडेतीन वाजले. डोळ्यावर झोपही होती आणि मनात गेले दोन दिवस सह्याद्रीत स्वच्छंदपणे हुंदडलेल्या क्षणांची स्मृतिचित्रेही!

सह्यमेळावाच्या आयोजनात ओंकारने प्रचंड मेहनत घेतली. तसंच हेम, राहूल यांनी पायलट ट्रेक करून लेटेस्ट माहिती आमच्यापर्यंत पोचवली. हॅट बनवण्याची जबाबदारी हिम्याने एकहाती पेलली. यो, विन्या, इंद्रा, आशुचँप, गिरी, सूनटून्या, मनोज आणि सगळेच (कुणाचं नाव राहिलं असल्यास क्षमस्व!) घरचं कार्य असल्यासारखे वावरत होते. (आणि रिलॅक्स व्हायला वॉट्सअ‍ॅपवर पडीक होते!) मेळाव्याला आलेला प्रत्येक जण सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारा होता. हल्ली बाजार आणि बिझनेस बनत चाललेल्या या ट्रेकिंगमध्ये नकारात्मक बातम्या सातत्याने येत चालल्या आहेत. निरनिराळ्या प्रकारचे धोके नव्याने उभे राहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या 'कंपनी'मध्ये निर्धास्त भटकावं अशी माणसं या सह्यमेळाव्यामध्ये एकत्र भेटली. निसर्गाचा आदर करून, स्वत:च्या मर्यादा ओळखून सह्याद्रीच्या हवाली होणारे हे सह्यपंढरीचे वारकरी! इतिश्री सह्यमेळावा २०१५!

*******************

दरवेळी ट्रेकने मला काय मिळतं हे प्रश्न आता हळूहळू पुसट होत चालले आहेत. पूर्वी ट्रेकहून आल्यावर वृत्तांत लिखाणाची जितकी आवड आणि हौस असायची तितकी आता उरलेली नाही. आता फक्त सॅक पाठीवर टाकावी, जुने-जाणते निवडक दोस्त सोबत असावेत आणि डोंगरदर्‍या-घाटवाटा तुडवाव्यात, कुठेतरी मंदिरात-गुहेत राहावं, कातळझर्‍याचं थंड पाणी प्यावं आणि कुठल्याशा हिरव्यागार आसनावर डोळे मिटून शांत बसावं आणि हा सह्याद्री, त्याच्या अंगाखांद्यावर खेळण्याचं लाभलेलं भाग्य अबोलपणे अनुभवावं, ही जाणीव अधिकाधिक वाढू लागली आहे. कधी वाटलंच तर रायगड प्रदक्षिणेतला पाऊस कागदावर उतरवावा, नाही वाटलं तर केवळ मनात झिरपू द्यावा, एवढंच! कागदावर उमटतील आणि फोटोतून दिसतील ते केवळ तिथे जाऊन आल्याचे पुरावे! शेवटी, या पायवाटांच्या सोबत येणार्‍या समृद्धतेला शब्दांत मांडण्याची ताकद कुठून आणायची? इति लेखनसीमा!

(समाप्त)
- नचिकेत जोशी