Pages

Monday, January 20, 2025

मागे वळून पाहताना - भाग २ : NJ Training ची सहा वर्षे

NJ Training उर्फ स्वत:चं काही चालू केल्याला १ सप्टेंबर २०२४ ला सहा वर्षे झाली. त्यानिमित्ताने एकूणच माझ्या ट्रेनिंग करिअरचा मीच घेतलेला हा धांडोळा.

*****
आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की निर्णय घ्यावाच लागतो. परिस्थितीचा रेटाच इतका जबरदस्त असतो की आवड, हिंमत, इच्छा ह्यांपैकी कशाचीही गरज उरत नाही – निर्णय हा घ्यावाच लागतो. माझ्या बाबतीतही असंच झालं.

त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच होती की आमच्या दोघांकडे आपापल्या क्षेत्रांतला अनुभव होता आणि थोडीफार saving असल्यामुळे हाताशी काही वेळ होता. अर्थात सप्टेंबर २०१८ पासून आजवर एकही महिना बिनकामाचा गेला नाही (कोविडचे २ महिने सोडून), ही गोष्ट वेगळी.

Freelancing ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नव्हती. सारंगच्या जन्माआधीचं एक वर्ष मी freelancing करून पाहिलं होतं. पण त्यावेळी काही ते नीट फलदायी झालं नव्हतं. पण ‘आपण इमानदारीने मेहनत करूनही केवळ इतरांनी न केलेल्या कामामुळे कंपनीला फायदा झाला नाही की आपलीही पगारवाढ बोंबलते’ ह्या टिपिकल corporate रडारडीला एकूणच कंटाळलो होतो. ‘मला पैसे मिळण्याचं आणि न मिळण्याचंही कारण माझाच performance असायला हवा – इतर कुणाचा नव्हे’ अशी माझी धारणा झाली होती आणि ’त्यामुळे freelancing च्या दुसऱ्या इंनिंगसाठी मनाची तयारी झालेली होती. १ सप्टेंबर २०१८ च्या सकाळी ‘चला आता काम शोधायला हवं’ असं वाटण्यापासून हा लेख लिहीत असताना ‘आता कायमचं freelancingच करायचं’ इथपर्यंत झालेला बदल हा केवळ विचारातला बदल नसून एकूण व्यक्तिमत्त्वातला बदल आहे हे नक्की.

माझं काम मुख्यत्वे कॉलेजमध्ये असतं. इंजिनीअरिंग, MCA, MBA कॉलेजेसच्या मुलांना प्लेसमेंटसाठी aptitude training देणे हे मुख्य काम. मग ते कधीकधी NJ Training ला थेट मिळालेलं असतं तर कधी इतर institute कडून मी फक्त सेशन घेण्यापुरतं जातो. ह्याव्यतिरिक्त Content/Courseware Development, Testsसाठी प्रश्न तयार करून देणं हीसुद्धा कामं असतात.

२०१८ चं उरलेलं वर्षं तर असं-तसंच गेलं. Freelancing मध्ये काम हातात असणं महत्त्वाचं एवढंच कळलं होतं त्यामुळे मिळेल ती ट्रेनिंग घेत गेलो. परिणामी काही ठिकाणांहून पेमेंटमध्ये गडबड झाली – एकतर बुडाली किंवा मिळवताना खूप मनस्ताप झाला. २०१९ तुलनेने अधिक बरं गेलं. खूप प्रवास झाला, थोडी स्थिरता यायला लागली. ‘आता हेच कायम करत राहू, मार्केटिंगसाठी थोडं बजेट काढून ठेवू’ अशा विचारांपर्यंत येत होतो तोच कोविडचा मोठा फटका बसला. पण त्याचाही एक मोठा फायदा असा झाला की माझी स्वत:ची वेबसाईट सुरू झाली. कोविडच्या काळात रोज तास-दोन तास धडपड करून, नेटवर शोधाशोध करून मीच वेबसाईट बनवली. लोगो पद्मजाने करून दिला. आणि १३ जून २०२० ह्या दिवशी nachiketjoshi.in ही वेबसाईट सुरू झाली. त्याच्याच आसपास online training सुरू झाली (करावीच लागली). ऑनलाइन ट्रेनिंगचे फीडबॅक उत्साह वाढवणारे होते. ‘सर, तुमच्या सेशनमध्ये insta-fb open करायची इच्छाही होत नाही’ हा फीडबॅक जग जिंकल्याचं फीलिंग देणारा होता. प्रामाणिकपणे सांगायचं तर, कोविड आला म्हणून वेबसाईट आणि ‘आपण ऑनलाइन ट्रेनिंगही तितक्याच प्रभावीपणे घेऊ शकतो’ ही खात्री ह्या दोन गोष्टी होऊ शकल्या.

कोविडच्या लॉकडाऊनमध्ये माझ्या स्वत:च्या online batches सुरू केल्या होत्या. ज्यांनी कोर्स जॉइन केला, त्यांना ते ट्रेनिंग आवडलंच. पण त्या batchesला म्हणाव्या तितक्या enrolments मिळाल्या नाहीत. आत्तापर्यंत सात-आठ batches घेतल्या पण admissions कायम अपेक्षेपेक्षा कमी (बहुतेकवेळा एक अंकी) झाल्या. त्यानिमित्ताने सुरुवातीला instagram आणि फेसबुकवर जाहिराती पोस्ट करून पाहिल्या. पण त्यातून काहीच फायदा झाला नाही असं वाटतं. नंतर नंतर तो नाद सोडून दिला. इतकंच नाही, तर आता batches ही कमीत कमी १० admissions असतील तरच घ्यायच्या असं ठरवलं आहे. पण ह्या माझ्या batches चालायला हव्या होत्या असं आजही वाटतं खरं. मी मुलांपर्यंत पोचायला कमी पडलो हेच सत्य असणार.

२०२० संपताना एक जुनी इच्छा डोकं वर काढायला लागली. मी freelancing सुरू केल्यापासूनच असं वाटायचं की - मुलांना प्रॅक्टिस साठी भरपूर मटेरियल देता यावं आणि त्यांच्या भरपूर tests घेता याव्यात. प्रिंट्स काढून मटेरियल देणं हे खूप खर्चीक आणि ओझ्याचं काम आहे त्यामुळे त्याला मर्यादा येतात. दीर्घ पल्ल्याचा विचार केला तर आपली स्वत:ची Questions Bank  हवी. ही इच्छा पूर्ण करायची असेल तर एकच मार्ग होता – इंटरनेटवर वेबसाईटच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देणे. २०२१च्या मार्चमध्ये माझी स्वत:ची LMS (Learning Management System) सुरू झाली आणि ही इच्छा प्रत्यक्षात उतरली. यवतमाळ जिल्ह्यातील किनवट ह्या आदिवासीबहुल भागातल्या प्रोफेशनल मुलांनी ती तयार केली आहे – हे विशेष. ती बनवणाऱ्या कंपनीचं नाव सेटट्राईब. गेल्या वर्षी त्यांना महाराष्ट्र सरकारचा स्टार्टअपसाठीचा पुरस्कारही मिळाला आहे.

ह्या प्रवासातली एक विशेष उल्लेखनीय आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ‘आपल्या placement प्रोसेसमधल्या aptitude roundसाठी test design करून देण्यासाठी’ काही कॉर्पोरेट कंपन्यांनी केलेली विचारणा. नंतर त्यांना प्रत्यक्ष test design करून दिल्या आणि कॉलेज आणि कॉर्पोरेट ह्यांना खऱ्या अर्थाने जोडणाऱ्या ब्रिजच्या भूमिकेत गेलो. त्यानिमित्ताने कंपन्या aptitude round मध्ये candidates कडून कशाची अपेक्षा ठेवतात, ह्या राऊंडमध्ये काय टेस्ट करतात हे नक्की समजलं.

ह्या काळात आणखी एका गोष्टीवर विश्वास बसत गेला. ती म्हणजे आपण आपलं हातात आलेलं काम नीट करायचं, पुढील कामाची काळजी युनिवर्सकडे सोपवायची. ‘युनिव्हर्स’ नावाची एक जागा अशी आहे जिथे जे मागाल ते मिळतं. आणि खरोखर ह्याचे अनेक अनुभव - दोन्ही अर्थांनी ह्या पांच वर्षांत घेतलेत. ध्यानीमनी नसताना ट्रेनिंगची संधी मिळाली आणि मनात इच्छा असूनही ट्रेनिंग मिळाली नाहीत हे ते दोन अर्थ. एक दोन ट्रेनिंग अशी होती की ती मला करायचीच होती पण काही कारणांनी ती मला मिळाली नाहीत आणि नंतर बाहेरून काही असं कळलं की ‘ती आपल्याला नाही मिळाली तेच बरं झालं’ असं वाटलं. तेव्हापासून मला अमुक एकच दे असं न मागता युनिवर्सकडे ‘माझ्यासाठी जे उत्तम असेल ते दे’ असं मागणं सुरू झालं.

त्यामुळे सुरुवातीला ‘पुढच्या महिन्यात काम मिळेल की नाही’ ही धाकधूक सतत असायची ती आता कमी झाली आहे. कारण आपली सोय ‘तो’ करणार आहे ही नकळत खात्री झाली आहे. एकतर जवळजवळ सर्व ट्रेनिंग ही मागील फीडबॅक वरुन मिळत गेली. आपलं आधीचं ट्रेनिंग आवडलं म्हणून कधी मुलांनी तर कधी कॉलेजनेच (अगदी कॉलेज डायरेक्टरने सुद्धा) दुसऱ्या client हा माझं ट्रेनिंग सुचवलं – बहुतेकवेळी हेच झालं आहे.

सुरुवातीला Fb-insta वर जाहिरातीचा प्रयोग करून पाहिला पण त्यात काहीच यश मिळालं नाही. ह्याचं उत्तर बहुधा माझ्या स्वभावात असावं. स्वत:ची जाहिरात स्वत: करताना ‘आपण किती भारी’ हे स्वत:च्या तोंडाने सांगण्याची कला जमायला हवी – ती माझ्याकडे जवळजवळ नाहीच हे मला गेल्या पाच वर्षांत नक्की कळलं आहे. (इथून पुढे जमली तर भविष्य वेगळं होईल)

(क्रमश:)

नचिकेत जोशी

www.nachiketjoshi.in

No comments: