Pages

Sunday, May 22, 2011

अजून काही वर्षांनी...

आता आपण मोठे झालो, नाही का?
आज आपल्या मैत्रीला काही कोवळी वर्षे पूर्ण झाली!
एकत्र घालवलेल्या जेमतेम दहा-वीस संध्याकाळ , तेवढ्याच चर्चा,
त्यातही कधीतरी मौनातल्या गप्पा,
मोजून पाच-पन्नास भांडणे,
हजारो विनवण्या, कोट्यवधी मिलिसेकंदांचा अबोला
आणि कायमचा पसेसिव्हनेस...
हा आत्तापर्यंतचा ढोबळ हिशेब!
आतली उलथापालथ आपली आपल्यालाच माहित!
अजून काही वर्षांनी
आपल्या मैत्रीला काही जाणती वर्षं पूर्ण होतील...
संध्याकाळी आकाश भरलेलं असलं, तरी दोघांचं वेगळं असेल...
चंद्र घेऊ वाटून तेव्हाही..
भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!
विनवण्या, अबोला यांची मला
आतापासूनच भीती वाटायला लागली आहे...
पसेसिव्हनेसचा अर्थ आपण लावलेल्या
झाडांची खोल गाभ्यापर्यंत गेलेली मुळं
तेव्हा सांगतील आपल्याला...
मैत्रीचं व्यापलेपण कदाचित तेव्हा समजेल दोघांनाही..
आपण आत्ता कुठे मोठे होऊ लागलो आहोत...
- नचिकेत जोशी (२३/५/२०११)

Monday, May 16, 2011

मजकूर

विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही

तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही

जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही

नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही

मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही

तुझीही वेगळी आहे कहाणी
हवे जे तुज, तुझ्या नशिबात नाही

तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही

- नचिकेत जोशी (१३/५/२०११)

Wednesday, May 11, 2011

परीघ

एकटेपणाच्या कैदेत कुढत असताना
पहिल्यांदाच जाणवला स्वत:च्या दु:खांचा काळागर्द परीघ -
दिवसांमागून दिवस गिळत
तुझ्यासोबत चक्रामध्ये मी फिरत असताना,
जो लाटेसारखा पायापाशी येऊन फुटायचा अधूनमधून!
पण त्यावेळी हे जाणवलं नाही की-
कधी ना कधी ह्या लाटा
आपल्याला एकट्यालाच पार करायच्या आहेत,
कारण -
शेवटी त्या आपल्या स्वत:च्या आहेत!

इतके दिवस तुझी सोबत होती मला
म्हणून कदाचित ते जाणवलं नसेल!
पण हे खरं नाहीये...
खरं हे आहे की, केंद्राशी इमान राखून
त्या चक्रात फिरतांना तळहातावर जपलेली दु:खं -
तुझी होती!

आणि तुझ्या दु:खांपुढे माझी दु:खं छोटी ठरली,
हे सत्य त्या परिघात शिरण्यापूर्वी
कोठडीच्या भिंतींवर कोरून आलोय मी..

- नचिकेत जोशी (११/५/२०११)

Sunday, May 8, 2011

कवीला कधीच विचारू नये...

कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?
त्यालाही हे माहित नसतं की कुठली वेदना कधी प्रसवली?
नेमकी कुठली शिवण उसवली?
असा कुठला धागा कातरला गेला आणि
ओळ विणून तयार झाली?

बाकीचे जे बोलून मोकळे करून टाकतात
ते हा शब्दात बांधत बसतो..
जुनी कहाणी जुन्या दुखण्यासारखी
पुन्हा उगाळत बसतो...
तेव्हा वाटतं, की जावं आणि हलवावं त्याला.
अशा वेळी एखादा कोरा कागद त्याच्यापुढे द्यावा
आणि समजून घ्यावं आता इथून पुढे त्याची आणि आपली वाट वेगळी...
पण कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?

कवितेवरून कवीच्या भूतकाळाची चिकित्सा वगैरे अजिबात करू नये,
कारण तोही तेच करतोय...
गतकाळातील एकेका क्षणाला त्याने वाहिलेली
श्रद्धांजली केव्हातरी आपल्या हातात पडलीच
तर त्यातील अजरामर भावनांना फक्त दाद मात्र द्यावी...
कारण आपल्यासाठी जरी त्या कवितेच्या ओळी असल्या तरी
त्याच्यासाठी ते असतं जाणिवांच्या प्रसवांतून जन्माला आलेलं
एक शाश्वत सत्य!
ते सत्य स्वीकारण्या अथवा नाकारण्याआधी -
त्याच्याकडे फक्त पाहावं हसून,
जमलंच तर डोलवावी मान बिन...
तेवढ्यानेही नेहमीसारखीच पुन्हा बसेल
त्याच्या त्या चिरंतन जखमेवर खपली
पण...
तरीही कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?

- नचिकेत जोशी (३/३/२०११)