Pages

Tuesday, March 27, 2012

कल्हईवाला

काय म्हणे तर तिचा एकदा नकार आला
बेघर दु:खाला मोठा आसरा मिळाला

कायम झटलो ज्यांच्यासाठी, तेही फसले!
म्हणून गेले जाताना, "नौटंकी साला!"

सौंदर्याची व्याख्या त्यांना पटली नाही!
त्यांना ठाउक होती केवळ 'ती' मधुबाला!

खरडत गेला, गर्दी जमली, टाळ्या पडल्या
हळूच त्याचा व्यासंगी साहित्यिक झाला!

मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे!
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!

कौतुक व्हावे यासाठी ही धडपड हल्ली!
ओळखही आवश्यक नसते हव्यासाला

मी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी
येइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला!

- नचिकेत जोशी (२६/३/२०१२)

Wednesday, March 21, 2012

खांदेरी-उंदेरी: सार्थकी लागलेला एक रविवार

सध्या ऊन वाढायला लागलंय. गडमाथ्यांवरचे आणि आडवाटांवरचे पाणीसाठेही आटायला लागलेत. सकाळी दहा-अकराच्या उन्हात टेकडी जरी चढायची म्हटलं तर शरीर घामेजायला लागलंय आणि घसा कोरडा पडायला लागलाय. 'जलदुर्ग' हा अशा वातावरणात हौस भागवणारा पर्याय असू शकतो.

मला स्वतःला पाण्याची भयंकर भीती वाटते. कुठल्याही पाण्याच्या साठ्यामधल्या पाण्याबद्दल विश्वासच वाटत नाही. उलट काहीतरी गूढ, अविश्वासाची भावना वाटत असते. डोंगरदर्‍या कितीही गर्द, घनदाट, लांब-रूंद-ऊंच असल्या तरी त्यांच्याबद्दल कायम उत्सुकता, जवळीक वाटते. पाण्याच्या बाबतीत माझं तसं होत नाही. तात्पर्य, गिरीदुर्ग आणि भुईकोट किल्ल्यांपेक्षा जलदुर्गांचे आकर्षण त्यामुळे कमीच!

मुंबईत आल्यापासून बांद्र्याचा किल्ला सोडला तर जलदुर्ग सोडाच, पण पाण्याजवळचाही किल्ला पाहिला नव्हता. ही कसर गेल्या रविवारी अनपेक्षितपणे भरून निघाली. हा रविवार ट्रेकचाच असं ठरवून बसलो होतो, उपलब्ध पर्याय तपासून झाले होते. तेवढ्यात 'खांदेरी-उंदेरीला येणार का' अशी एका मैत्रिणीकडून विचारणा झाली. मी आधी 'नाही' म्हटलं, पण नंतर अचानक जेव्हा रोहनशी बोलताना कळलं, की खुद्द 'सेनापती'ही जातीने या मोहिमेत असणार आहेत, तेव्हा मात्र माझ्यासारख्या मावळ्याला 'हो'च म्हणावेसे वाटले!


मोहिमेत एकूण किती जण आहेत हे वडखळ नाक्याला नाष्ट्यासाठी थांबलो तेव्हाच समजले. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यापेक्षाही महत्त्वाचे वाटणारे, आवडणारे असे काही असू शकते हे मानणारे २१ जण रविवारी चार गाड्यांमधून (३ मुंबई, १ पुणे) निघाले होते. भल्या पहाटे साडेपाचला दादरला राजीवकाकांची वाट पाहत होतो, तेव्हा क्षणभर मागचा ट्रेकमय पावसाळा अचानकच डोळ्यासमोरून सरकून गेला. नाणेघाट, आजोबा, कोथळीगड, सरसगडसाठी स्टेशनला जाताना पावसात तुडवलेला तो दादरचा हमरस्ता, हिंदमाताच्या चौकात भरलेले गुडघाभर पाणी, लोकल पकडताना भेटलेला पाऊस... ट्रेकगणिक या सगळ्या अनुभवात भर पडत जाते आणि हे असेच्या असे आपण स्वतःला तरी पुन्हा सापडू का असं वाटून जीव हुरहुरतो. नवीन पावसाळा आणि नवीन ट्रेकमध्येही हे आठवत राहिल हे नक्की! असो. विषयांतर होत आले.

राजीवकाकांच्या गाडीतून जाताना पेणच्या पुढे एके ठिकाणी गाडी थांबवून सगळ्यांसाठी कलिंगडे घेतली. आठ वाजता वडखळ नाक्याला 'क्षुधा-शांती' केली. सवयीने मी आणि रोहनने ऑर्डर देताना फारसा विचार केलाच नाही. किल्ले भटकणे आणि मिसळ खाणे हे किती अतूट नाते आहे हे समस्त 'गडवाल्यांना' नक्की माहित असेल. वडखळ नाक्यावर पुण्याहून निघालेली गाडीही येऊन मिळाली आणि पुढे निघालो. अलिबाग रस्त्यावर कार्लेखिंड बस स्थानकासमोर (गोठेघर) थळ गावाचा फाटा आहे. त्या रस्त्याने गाव गाठले. 'थळ मच्छीमार सोसायटी'च्या कार्यालयापाशी उतरलो तेव्हा आसमंतामध्ये फक्त एकच वास भरून राहिला होता - माशांचा! ताबडतोब, उपस्थितांपैकी 'मासा'ळू तोंडे नॉन-व्हेज गप्पासाठी ('पदार्थी' अर्थाने) उघडली आणि शुद्ध शाकाहारी नाके बंद झाली! आम्हाला नेण्यासाठी ठरवलेली 'सी स्टार' काठालगत तयार होती. निघालो!


उंदेरीभोवती अनियमीत खडक असल्यामुळे बोट लावण्यासाठी दरवेळी जागा मिळतेच असे नाही. आमच्या कार्यक्रमामध्ये उंदेरी म्हणूनच हवामानावर अवलंबून होता. सुदैवाने बोटवाल्याला बोट उभी करण्यासाठी जागा सापडली आणि पहिल्यांदा उंदेरी बघायला निघालो.




आम्ही खडकांवर उतरल्यावर बोट पुन्हा थोडे अंतर मागे जाऊन समुद्रात उभी राहिली.


इतिहासकाळात अत्यंत घाईघाईत या किल्ल्याचे बांधकाम झाले आहे. किल्ला फिरता फिरता एके ठिकाणी बसून रोहनने किल्ल्याचा इतिहासही सांगितला. तिथेच ओळखपरेड झाली.






किल्ल्याचा दरवाजा -


गोड्या पाण्याचा साठा. हा सुमारे दोन वर्षे शे़कडो माणसांना पुरेल एवढा मोठा साठा आहे


दक्षिणेकडचा दरवाजा -


वरचाच दरवाजा, समुद्राच्या बाजूने -




उंदेरीमधून दिसणारा खांदेरी किल्ला-


पाऊण-एक तासात किल्ल्याला प्रदक्षिणा घालून माघारी फिरलो. आता पुढे होता - खांदेरी!


खांदेरीकडे जाताना फोटो काढायला मी मागे डायवरपाशी उभा होतो आणि बोटवाले बाबा 'बोट केवढ्याला घेतली, आज मॅचमुळे गर्दी कमी आहे, १५ मे ते १५ नोव्हेंबर सरकारी नियमानुसार बोट बंद करावी लागते, तेव्हा फक्त मासेमारी करतो' वगैरे माहिती स्वतःहून सांगायला लागले. मला अशा औटघटकेच्या गप्पा मारायला खूप मजा येते. कसलीही अपेक्षा, पूर्वग्रह न ठेवता खुलेपणाने चार घटका गप्पा माराव्यात आणि आपापल्या वाटेने निघावे! 'कुठेही संभाषणोत्सुक चेहरा दिसला की पहिला नमस्कार माझा घडे!' हे पुलंचं 'पूर्वरंग'मधलं वाक्य मनावर अगदी कोरलं गेलं आहे. असो. आज बहुधा सारखं विषयांतरच होतंय! मीही फोटो काढणे थोडावेळ थांबवून मग त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचा नंबर घेऊन ठेवला. त्यांचं नाव उत्तम बुंदके. ते दोन मुलांसह पोटासाठी बोटीच्या फेर्‍या आणि मासेमारी करतात.

उंदेरीच्या तुलनेने खांदेरी हा अधिक वेळ घेऊन विचारपूर्वक बांधलेला किल्ला आहे. अर्थात किल्ला बांधत असताना शत्रूचे हल्ले सुरू होतेच. मुरूडजवळच्या जंजिर्‍याचा सिद्दी आणि मुंबईसारखे उदयाला येत असलेले बंदर यांमध्ये असल्यामुळे शिवकाळात शिवाजी राजांनी बांधलेल्या खांदेरी-उंदेरीचे स्थानमाहात्म्य मोठे होते. आरमाराकडे महारा़जांनी किती महत्त्व दिले होते हे सागरी दुर्गांची मुंबई ते गोवा किनारपट्टीलगतच्या किल्ल्यांची ही साखळी पाहिली की लक्षात येते.

खांदेरीला बोट उभी करण्यासाठी जेट्टी आहे. किल्ल्यामध्ये वेतोबाचे मंदिर आहे. कोळीलोकांनी दान केलेली प्रतिकात्मक आयुधे/साधने इथे टांगलेली दिसतात.




तटबंदीच्या काठाकाठाने किल्ल्याला फेरी मारली. मी पायातले बूट काढून टाकले आणि अनवाणी पायांनी त्या खडकांचा स्पर्श अनुभवत तटबंदीवरून चालू लागलो. गुळगुळीत, झुळूकगार दगडांवरून चालताना बाजूच्या समुद्रावरून येणारं वारं विलक्षण गारवा देत होतं. सूर्य माथ्यावर आला, तसे दगड तापायला लागले. मग पुन्हा बूट घातले.








एका बुरूजावर तीन तोफा आहेत.





(त्या 'संतोष'ला आम्ही मनातल्या मनात भरपूर शिव्या घालून घेतल्या, तुम्हीही घालून घ्या. फक्त कधी कुठल्याही गडावर जाल तेव्हा आपले असे 'ठसे' तिथे सोडून येऊ नका, हे कळकळीचे आवाहन!)

खांदेरी किल्ल्यामध्ये एक दीपगृह आहे. दीपगृहामध्ये वरपर्यंत जाता येते. बाजूलाच पवनचक्कीमार्फत निर्माण होणारी वीज दिव्याला पुरवली जाते.




वर जायचा जिना -


मी आयुष्यात दीपगृह हा प्रकार आतून पहिल्यांदाच पाहिला.


पूर्ण किल्ला भटकून झाला तेव्हा फक्त पावणेदोन वाजले होते. जेट्टीवर आलो तेव्हा ओहोटी लागली होती. तिथीवरून भरती-ओहोटीच्या वेळा कशा काढाव्यात हे ज्ञान मला सकाळीच (मिसळ खाताना) प्राप्त झाले असल्यामुळे मी ते लगेच इथे पडताळून पाहिले. (सुदैवाने) ते गणित बरोबर आले. थळ किनार्‍यापासून आत समुद्रात बोट थांबली आणि दगडी बांधावरून पसरून टाकलेल्या मासेमारीच्या जाळ्यांवरून चालत पुन्हा सोसायटीपाशी आलो.
डावीकडचा खांदेरी व उजवीकडचा उंदेरी -


गावात जेवणाची सोय आयत्यावेळी रद्द झाल्यामुळे मग अलिबागमध्ये 'रविवार पाळावा' असे ठरले. (आम्हा शाकाहार्‍यांना कोण विचारतंय?) अलिबागच्या 'सन्मान' मध्ये शिरलो तेव्हा चालू टीव्हीवर पाकिस्तानच्या बिनबाद दोनशे दहा झाल्याचे या डोळ्यांना पहावे लागले. एकूण चोवीस जणांच्या आहारविषयक चर्चा व एकंदर वागण्यावरून 'बांगलादेश आणि सोमालिया या देशातून चर्चेसाठी भारतात आलेली शिष्टमंडळे आज इथे जेवून गेली' अशी डायरी हॉटेलमालक लिहील अशी कॉमेंट कुणीतरी केली आणि आम्ही ती सार्थ करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

मग विशेष काही घडलेच नाही. जेवल्यानंतर इतकी झोप येत होती की दुसरं काही सुचतंच नव्हतं. 'ट्रेकपेक्षा असल्या सुखी ट्रिपमुळे अधिक दमायला होते' हा विचार उगाचच माझ्या मनात शिरून गेला. येताना 'चहासाठी कुठे थांबायचे' या गरजेवरून 'क्षणभर विश्रांती' कर्नाळ्याच्या नंतर आहे की आधी या विषयावर मी, अर्चना, राखी, आका आणि भारत मुंबईकर (हे नाव आहे, कुठलाही आयडी नाही) यांच्यात एक प्रासंगिक परिसंवाद घडला. मी तटस्थ होतो. (मला 'क्षणभर झोप' आणि चहा महत्त्वाचा होता!) वरील उरलेल्या चारपैकी कुणी (चुकून) हा लेख वाचलाच तर त्यांना मात्र हे आठवून ज्जाम हसू येईल एवढे नक्की! चहा झाल्यावर निघताना 'एक फोटो हो जाय'ची फर्माईश झाली. पुण्याची गाडी वडखळफाट्याने आधीच गेलेली असल्यामुळे त्यांच्याविना फोटो काढला. फोटो खुद्द सेनापतींनी काढल्यामुळे त्यांचे 'हँडसम' व्यक्तिमत्त्व या फोटोत उपलब्ध नाही!


राजीवकाकांनी दादरला सोडले तेव्हा साडेसात वाजले होते. यावेळी दोघे-तिघे सोडले तर अख्खा ग्रुप माझ्यासाठी नवीन होता. त्यामुळे दिवसाचा 'खेळ' थांबला तेव्हा 'धावसंख्या' जुने मित्रमैत्रीणी अधिक २० नवीन अशी झाली होती.

- नचिकेत जोशी

Tuesday, March 20, 2012

समीकरण

समीकरणाच्या दोन्ही बाजू समान झाल्या
की त्याला 'इक्वेशन सॅटीस्फाय' होणं म्हणतात...
कुठलीही एक बाजू वरचढ झाली की
समीकरण संपतंच!
समीकरण अस्तित्वात आल्या दिवसापासून
ते 'सॅटीस्फाय' व्हावं म्हणून माणूस
त्या 'क्ष' ला शोधतोय - अजूनही सापडत नाहीये!

नात्याचंही समीकरणासारखंच की!
नात्यामधला 'क्ष' तरी कुठं सापडलाय अजून?

फरक फक्त एवढाच आहे -
समीकरणामधल्या 'क्ष'चा शोध येणार्‍या पिढ्या
तितक्याच आतुरतेने घेत राहतील जगाच्या अंतापर्यंत!
नात्यामधल्या 'क्ष'चा शोध कुणाच्याही
इच्छा-अनिच्छांना न जुमानता थांबेल - प्रत्येकाच्या अंतापाशी!

नचिकेत जोशी (१२/३/२०१२)

Tuesday, March 6, 2012

गजलोत्सव २०१२ (काही प्रकाशचित्रे)

रविवार, ४ मार्च रोजी 'बांधण जनप्रतिष्ठान' आयोजित पुण्यात झालेल्या चौथ्या 'गजलोत्सवा'तील ही काही प्रकाशचित्रे (जागेवरून अजिबात न उठता (कंटाळा!) कॅमेर्‍यातील उपजत झूमची देणगी वापरून सर्व फोटो घेतले गेले आहेत). मी उद्घाटन व पहिल्या मुशायर्‍यापर्यंत होतो, त्यामुळे तेवढेच फोटो माझ्याकडे आहेत. (सुटकेचा नि:श्वास अनुल्लेखित! ;))

प्रचि१: सुंदर, आकर्षक आणि नेत्रसुखद नेपथ्य -


प्रचि २: उद्घाटनाच्या वेळी पारंपारिक दीपप्रज्ज्वलनाबरोबरच गजल-पारंपारिक 'शमा'प्रज्ज्वलनही करण्यात आले


प्रचि ३: व्यासपीठावरील मान्यवर


प्रचि ४: डॉ. राम पंडित यांच्या 'सुरेश भटांनंतरची कविता' या पुस्तकाचे प्रकाशन


प्रचि ५: राजेश उमाळे यांच्या 'गझलेची स्वरलिपी' या पुस्तकाचे प्रकाशन




प्रचि ६:शायर ए.के. शेख यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला


प्रचि ७: राजेश उमाळे यांना 'युवा गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला

(प्रकाशचित्रे - नचिकेत जोशी)

यानंतर पहिला मुशायरा सुरू झाला -
प्रचि ८: उपस्थित गझलकार


प्रचि ९: (मी, हबा आणि मिल्या तसेच निशिकांतजी व ममता सपकाळ)


प्रचि १०: मी


प्रचि ११: हबा (हबा हलला की फोटो हलला ते माहित नाही)


प्रचि १२: सुप्रिया जाधव


प्रचि १३: निशिकांत देशपांडे


प्रचि १४: ममता सपकाळ


प्रचि १५: वैभव जोशी

(प्रकाशचित्रे - डॉ. ज्ञानेश पाटील)


- नचिकेत जोशी

Monday, March 5, 2012

हमी

(बांधण जनप्रतिष्ठान आयोजित काल (४ मार्च) पुण्यात झालेल्या "गजलोत्सव २०१२" अंतर्गत मुशायर्‍यामध्ये सादर केलेली गझल - )


जुने नाते अजुनही रेशमी आहे
तरीही बघ तुला परकाच मी आहे!

जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!

तुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू!
तुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)

म्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर!
तुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे

भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!

कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी
तसा वरवर पुरेसा संयमी आहे

तसे नाही कुणी जे नाव मी घ्यावे!
तरी 'ती' सोबतीला नेहमी आहे

- नचिकेत जोशी (२७/१/२०१२)