आज आहे नेमका शुद्धीत मी
आज कळले! ना तिच्या गणतीत मी!
जाच होऊ लागला माझा तुला
आणि रेटत राहिलो ही प्रीत मी!
आपलीशी वाटली दु:खे तिची
कोणत्या होतो अशा धुंदीत मी?
वाट स्वीकारून ती गेली पुढे
अन् तिच्यासाठी उभा खिडकीत मी!
मोडल्या चाली, बदलले शब्दही!
गात गेलो फक्त माझे गीत मी
ही तुझी पुरते नशा गझले, मला!
वेगळी नाही अजुन मग 'पीत' मी!
नचिकेत जोशी (१०/१/२०१३)