Pages

Wednesday, February 27, 2013

ड्युक्सनोज वरून रॅपलिंग : एक शब्दातीत थ्रिल!

खंडाळ्याशेजारी घाटाखालून वर आकाशात घुसलेला हजारभर फूट सुळका म्हणजेच ड्युक्स नोज. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून, लोहमार्गावरून, अगदी खोपोली स्टेशनवरूनही सहज दिसणारा आणि ओळखू येणारा हा ट्रेकर्स लोकांचा लाडका कडा! गेल्या रविवारी 'ऑफबीटसह्याद्री'तर्फे त्या कड्यावर रॅपलिंग आणि ड्युक्स नोज ते  डचेस नोजपर्यंत व्हॅली क्रॉसिंग चे आयोजन करण्यात आले होते. एकूण रॅपलिंग अंदाजे ३०० फूट (थोडेसे जास्तच) होते. मी आतापर्यंत केलेले हे सर्वाधिक उंचीचे रॅपलिंग! एकाच शब्दात वर्णन करायचे झाल्यास - "फाडू!!!" एवढंच म्हणेन!

त्याची ही काही प्रकाशचित्रे -

मोठा कडा ड्युक्स नोज आणि शेजारचा तुलनेने छोटा डचेस नोज -
(ड्युक वेलिंग्टनच्या नाकासारखा दिसतो म्हणून ड्युक्स नोज हे नाव. डचेस नोजचा उगम माहित नाही.)


कड्याच्या उजव्या किनारीवरून (फोटोत) रॅपलिंगचा रूट होता -


माथ्यावर एक मंदिर आहे. त्या मंदिरालाच अँकर करण्यात आले होते. (३००+ फुटांमुळे रॅपलिंग रोपवर येणारा ग्रॅव्हिटॅशनल फोर्स खूप जास्त असतो) -


टेक्निकल चढाईमधले जिव्हाळ्याचे आणि जिवाभावाचे साथीदार  -


(फक्त) ११ सहभागी असल्यामुळे रॅपलिंग निवांत पार पडले. रॅपलिंगला सुरूवात (अस्मादिक) -








ड्युक्स नोजवर बाहेरच्या बाजूने ओव्हरहँग आहे. पहिल्या तीस एक फुटांपर्यंत पाय कड्याला टेकवता येतात. नंतर कडा आतल्या बाजूला वळतो आणि आपण आधारहीन होतो. पुढचा जवळजवळ दोनशे फुटांचा पॅच ओव्हरहँग आहे. ओव्हरहँगवर फक्त आणि फक्त रोप एवढाच आधार! वार्‍यामुळे किंवा कशामुळेही रोप गरगर फिरतो. हा पॅच खरोखर थरारक आहे.


दुसर्‍या एका पार्टिसिपंटचा हा फोटो. यावरून नेमका अंदाज येईल -


या फोटोमध्ये कड्याच्या जवळजवळ तळाशी उतरून आलेला मुंगीच्या आकाराचा माणूस दिसेल.


हुश्श्श!!! उतरलो एकदाचे!


जेमतेम दहा-बारा मिनिटांची गम्मत! पण एक अत्यंत जब्बर्दस्त अनुभव! खाली उतरलो तेव्हा दोन्ही पंजे आणि फोरआर्म्स बधीर झाले होते. ओव्हरहँगवर तर दोनतीनदा रोप वार्‍याने कड्यापासून उजव्या हाताला हेलकावला, फिरला. त्या सगळ्यात माझ्या स्वतःभोवती दोनतीन प्रदक्षिणा झाल्या. कड्याकडे पाठ आली की मी डोळे मिटून घेतले होते. उघड्या डोळ्यांनी हजार फूट खाली, अधांतरी, हवेत बघण्याची हिंमत होईना! (ट्रेकपासून काही काळ दूर गेल्याचा परिणाम! बाकी काही नाही!)


थरार इथे संपत नाही!!

उतरल्यावर कड्याच्या पोटातून एक अरूंद खाचवाट आहे. त्या वाटेने वळसा घालून वर चढायचे. ही वाट डचेस नोजच्या बाजूने वर येते.




मदतीसाठी ऑर्गनायझर्सनी क्रॅब अडकवायला दोर लावले होतेच -


खूप दिवसांनंतर लाडक्या सह्याद्रीबाबाच्या अंगाखांद्यावर खेळायला मिळालं. दिल खुश हो गया!






- नचिकेत जोशी
(फोटो: नचिकेत जोशी आणि नितीन जाधव)

Monday, February 18, 2013

नक्की

दूर असु दे, पण तिथे असणार नक्की

एवढा पुरतो मला आधार नक्की

शब्द अपुरे वाटती आहेत आता
काय हलले आत हे हळुवार नक्की?

कवडसे जपलेत दु:खाचे मनाशी
नेहमी सुख त्यात लखलखणार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की

तू जलाशय, मी तुला थेंबाप्रमाणे!
हा फरक केव्हा मला पटणार नक्की?

पावलांना चालण्याची ओढ नाही
वेस ओलांडूनही थकणार नक्की!

भार नात्यांचा भले पेलेनही मी!
पण स्वतःपासून मग तुटणार नक्की!

वाट मी पाहीन कायम, वेळ घे तू!
आज नाही तर उद्या सुचणार नक्की!

एकदा केव्हातरी जन्मास आलो
एकदा केव्हातरी मरणार नक्की!

- नचिकेत जोशी (१७/२/२०१३)