Pages

Tuesday, August 27, 2013

... स्वप्न क्षितिजापार आहे

जाणवे आता मला की, स्वप्न क्षितिजापार आहे
भोवती काळोख दिसतो, आतही अंधार आहे

मुखवटे चढवा कितीही, दाखवा शोभा स्वतःची
एकदा नक्कीच ही आरास कोसळणार आहे

आपल्या असण्यात इथल्या फार मोठा फरक आहे - 
तू इथे नसशीलही पण मी इथे असणार आहे

वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही
जीव माझा फिरून येथे नित्य घुटमळणार आहे

मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे

यापुढे कोणासही सर्रास मी दिसणार नाही
शोधण्या येतील जे, त्यांनाच सापडणार आहे

नचिकेत जोशी (२५/८/२०१३)

Monday, August 12, 2013

निमूट माझे जिणे...

(या गझलेची प्रेरणा - सुरेश भटसाहेबांची "निमूट माझे जिणे मला सोसता न आले" ही ओळ)

मनातलेही मनामध्ये ठेवता न आले
निमूट माझे जिणे मला सोसता न आले

सुरेख होत्या छटा तरीही उदासवाण्या!
नभास वेळीच हुंदके रोखता न आले

चिकार केला प्रवास पण ना स्मरे कुणाला!
कुठेच माझे ठसे मला सोडता न आले

म्हणायची ती, "नकोस मागू, कुठून आणू?"
तिच्यात होते, तिला मुळी शोधता न आले

तिला मिळाला हळूच झोका कुठुन तरी, मग -
जमीन सुटली, हवेतही थांबता न आले

कधीच समजून घेत नाहीस ना मला तू?
म्हणा, मलाही कधीच समजावता न आले

तुला हवे जे तसे वागुनी मला बघू दे
मला हवे ते तुला कधी वागता न आले

मनात होत्या गगन भरार्‍या, समुद्र-सफरी
मनास पाऊल एकही टाकता न आले

बसून रात्री दिवसभराचा हिशेब केला
सुटे सुटे सुख खिशातले मोजता न आले

नचिकेत जोशी (२४/५/२०१३)

Thursday, August 8, 2013

तुझ्या मग्न प्रवासाला...

रंग रूप स्थायीभाव
आणि लाघवी स्वभाव
सर्वांनाच मोहविती
तुझे भाव, तुझे नाव

स्तुती कौतुक अफाट
जणू उधाणाची लाट
पदोपदी तुला तुझा
भास होतसे विराट

उंचावली तुझी मान
मन हळूच बेभान
घेता दखल जगाने
तुला खुजे आसमान

मग हवेसे वाटले
सारे कौतुकाचे झेले
क्षणोक्षणी स्वीकारावे
हार तुरे अन् शेले

कुणी नाकारूच नये
कुणी झुगारूच नये
भोवतीच्या प्रत्येकाने
कधी दुर्लक्षूही नये

आदबीनेच वागणे
शालीनता दाखवणे
खरे हेतू सारे सारे
किती खुबीने झाकणे!

सुरू जाहला प्रवास
एका फसव्या वाटेने
नाकारत खाणाखुणा
स्वतःच्याच सोबतीने

कुणी आपले नाहीच
तरी पाय रेटलेस
वेळोवेळी स्वतःचीच
समजूत काढलीस

सखे मागेच राहिले
जुने जाणते चांगले
आळ घातलेस तरी
सारे त्यांचेच चुकले!

तुझ्या मते योग्य तूच
तुझे चुकले नाहीच
कधी प्राक्तन अचूक
कधी हट्ट सहेतुक

क्षणभंगुर हे सुख
चतुराईने जगणे
असे कौतुक शोधत
जागोजाग भटकणे

भीती नकार येण्याची
भीती एकटे होण्याची
मग धडपड सारी
सोबत ती शोधण्याची

वाट अखेर थांबली
हतबल नि हताश
तुझ्या मग्न प्रवासाला
आता मोकळे आकाश

जरी जपलेस फार
जगापासुनी स्वतःला
पण जपले नाहीस
स्वतःपासुनी स्वतःला

- नचिकेत जोशी (१०/६/२०१३)