Pages

Wednesday, January 26, 2011

सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग २

थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)

२५ डिसेंबर: सालोटा आणि मुक्काम साल्हेर

नाशिकला उतरलो तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. कडाक्याची थंडी पडली होती. अर्थात त्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये पारा ४.५ पर्यंत खाली आला होता. त्यामुळे थंडी अपेक्षितच होती. आमचा पुढचा टप्पा होता ताहराबाद! तिथे जायला नाशिक-अक्कलकुवा ही एसटी जुन्या सीबीएस (Central Bus Stand)वरून साडेपाचला होती. महामार्ग स्टॅंडवरच्या कंट्रोलरने आम्हाला जुन्या सीबीएसला जायला सांगितले तसे निघालो. वाटेत आमच्याच एसटीमधून उतरलेल्या एका मुलाला योने (गरज नसताना) पुन्हा ताहराबादची एसटी कुठून मिळेल असे काहीतरी विचारले.

त्याने नवीन सीबीएसवरून सुटेल असे सांगितले. आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. महामार्ग स्थानक-नवीन सीबीएस हे अंतर एक-दीड किमी असेल. तिथे पोचल्यावर कळले की गाडी जुन्या सीबीएसवरूनच सुटते!! अशा प्रकारे पुण्यक्षेत्र नाशिकमध्ये भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीमध्ये तिन्ही बस स्टॅंण्ड्सला अर्ध्या तासात भेट देण्याचे पुण्य पदरात घेऊन आम्ही ५.२५ ला जुन्या सीबीएसमध्ये दाखल झालो.(नवीन सीबीएस आणि जुने सीबीएस जवळजवळ आहेत म्हणून ठीक, नाहीतर योची काही खैर नव्हती :D). अक्कलकुवाची बस उभीच होती आणि बरोब्बर ५.३० ला सुटलीसुद्धा!!

उरलेली झोप मी ह्या प्रवासात पूर्ण केली. रोमा कंडक्टरशी गप्पा मारत बसला होता. (आणि नंतर दिवसभर माझी झोप झाली नाही म्हणून कुरकुरत होता. :P) अवि-ज्यो-यो झोपले असावेत कारण ट्रेकस्टाईल मस्तीचा कुठलाही आवाज मला ऐकू आला नाही. :P मला जाग आली तेव्हा एसटी बागलाण तालुक्यात शिरली होती. उजव्या-डाव्या हाताला डोंगररांगा सुरू झाल्या होत्या. सर्वात उंच किल्ला असलेला साल्हेर कुठुनही दिसेल असे वाटल्यामुळे मी दोन्ही बाजूला उंच डोंगर शोधत होतो. पण साल्हेरच्या उंचीचा किल्ला दिसला नाही. ताहराबादला पोहोचलो तेव्हा पावणेआठ वाजले होते. थंडी चिकार होती. तिथल्या स्टॅण्डवरसुद्धा गाळणी मिळते का याची चौकशी केली. ’आमच्याकडे पूर्वी होती, पण महाग असल्यामुळे कुणी घेत नाही. म्हणून नाही ठेवत आता’ हे एका दुकानदाराचे उत्तर ऐकून त्या थंडीमध्येही माझ्या तोंडातून निराशेची वेगळी वाफ बाहेर पडली!

स्टँडवर अजून एक ट्रेकर्सचा ग्रुप भेटला. ते मुल्हेर-मोरा करून शेवटी साल्हेरला जाणार होते. आम्ही सुरूवात साल्हेरहून करणार होतो. साल्हेरसारखा सर्वात उंच आणि सालोटासारखा अवघड असे दोन किल्ले ट्रेकच्या सुरूवातीलाच करण्यामागे कारण होते. ७ किल्ल्यांच्या या दीर्घ ट्रेकमध्ये सुरूवातीला असणारी एनर्जी अवघड किल्ल्यांसाठी उपयोगी पडेल असा साधा विचार त्यामागे होता. (हा निर्णय अगदी बरोबर होता हे नंतर आम्हाला जाणवले.) ताहराबादहून मानूरची एसटी साडेआठला सुटते. ती मुल्हेर-वाघांबे-साल्हेरमार्गे जाते. पुण्याहूनसुद्धा थेट ताहराबादसाठी एसटी आहे. पुणे-कळवण एसटी मिळाल्यास थेट मुल्हेर अथवा वाघांबे/साल्हेरपर्यंत जाता येते. मानूरची एसटी येईपर्यंत नाश्ता करून घेतला. रोमा आणि योने किल्ल्यांचे नकाशे प्रिंट करून आणले होते. ही पद्धत मला खूपच आवडली. हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. त्या नकाशांमुळे वाटा चुकण्याचे प्रकार एक अपवाद वगळता(ते वर्णन पुढे येईलच) घडलेच नाहीत. ते नकाशे एकदा नजरेखालून घातले. एसटीमध्ये मुल्हेरला बोरे आणि पेरू विकायला जाणारा एक बाबाजी भेटला. त्याच्याकडून बोरे विकत घेतली. आम्ही वाघांबेहून सालोटा-साल्हेर चढणार होतो आणि उद्या पलिकडच्या बाजूने साल्हेरवाडीमध्ये उतरणार होतो. वाघांबेला उतरलो तेव्हा साडेनऊ झाले असावेत. गावातून दोन पोरांना वाटाड्या म्हणून घेतले(बाळू आणि रामू ही त्यांची नावे.) आणि लगेच निघालो. समोर सालोटा आणि साल्हेर दिमाखात उभे होते.


साल्हेर किल्ला गुजरात सीमेच्या अगदीच जवळ आहे. कारण चढतांना उजवीकडच्या एका सुळक्याकडे बोट दाखवून बाळू म्हणाला ’ते गुजरात आहे’. त्यामुळे त्या प्रदेशातल्या गावकऱ्यांची भाषा सुद्धा गुजरातीमिक्स असते. आमचे वाटाडेही त्याला अपवाद नव्हते. त्यांना मराठी फारच कमी समजत असावे. अर्थात मराठी शाळेत जात असल्यामुळे रामूला बऱ्यापैकी मराठी समजत होते. पण तो प्रत्येक प्रश्नाला होहो असेच उत्तर देत असल्यामुळे सुरूवातीला थोडी पंचाईत झाली. पण नंतर ज्यो आणि योने त्यांच्याशी बोलण्याचे कसब दाखवले! मी त्यांना प्रश्न विचारण्याचे अनेक प्रयत्न करून पाहिले पण व्यर्थ! शेवटी शेवटी मी जास्तीत जास्त तीन शब्दांचे प्रश्न करून पाहिले.. पण छे! या पुण्यनगरीच्या सारस्वताची भाषाच त्याला कळत नव्हती! असा सर्व टाईमपास करत चढत होतो. मध्येच रोहितला पित्ताचा त्रास होऊ लागला. आणि त्याच्या पोटामधल्या जिन्नसाने आतमधली घुसमट असह्य झाल्यामुळे तोंडावाटे बाहेर उडी घेतली! सुरूवातीच्या २-३ ओव्हर्स खेळताना अडखळणे हे जसे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूचे लक्षण असते तसे ट्रेकच्या सुरूवातीला त्रास होणे हे जातिवंत अट्टल ट्रेकरचे मुख्य लक्षण असते हे मी कुठेतरी वाचल्याचे आठवले आणि आपण कसलेल्या लोकांबरोबर ट्रेक करायला आलो आहोत या आनंदात समोरची वाट सोडून मी थेट चढण स्वीकारली.

आम्ही तिघे रामूला घेऊन थोडे पुढे आलो होतो आणि रोमा आणि योला घेऊन बाळू मागून येत होता. इतक्यात एका कातळाजवळ ज्यो आणि अविला एक साप दिसला. "धामणी अहे" - इति रामू. म्हणजे विषारी की बिनविषारी हे मी रामूला विचारेपर्यंत (आणि त्याला प्रश्न समजून तो उत्तर देईपर्यंत) हे दोन बहाद्दर तिच्या दिशेने पळाले सुद्धा. अर्थात त्यांची चाहूल लागल्यामुळे ती धामण केव्हाच कातळाखालच्या बिळात घुसली आणि पुढचा scene हुकला.

थोडे पुढे आलो आणि सालोट्याच्या पोटामध्ये एका गुहेजवळ पाण्याचे टाके दिसले. अवि आणि बाळूने तिथून पाण्याच्या बाटल्या भरून आणल्या. येथपर्यंत रोमा एकदम ठीक झाला होता आणि संध्याकाळी साल्हेरवर मुक्कामाला जाईपर्यंतची मोठी इनिंग खेळायला सज्ज झाला होता!
नवीन बाजीराव अविचा तिथल्याच कातळावरचा हा एक फोटॉ -

साल्हेर आणि सालोटा हे एका खिंडीने जोडले गेले आहेत. आमचा पहिला टप्पा होता ती खिंड गाठणे, तिथे सामान टाकणे आणि सालोट्याकडे निघणे. त्या खिंडीत पोचेपर्यंत बारा वाजले!(घड्याळात). खिंडीत सॅक्स ठेवल्या. रामू तिथेच बसणार होता आणि बाळू आम्हाला वाट दाखवत सालोट्यावर येणार होता.

४९८६ फ़ूट (१४९६ मी) उंचीचा सालोटा किल्ला जबरदस्त आहे. आणि खरं सांगायचं तर चढायला (आणि अर्थातच उतरायलाही) साल्हेरपेक्षा अवघड आहे. त्या खिंडीतून सालोट्याला पायथ्याशी वळसा मारून बाळू आम्हाला नेऊ लागला. ह्याला स्वत:लाही वाट नीटशी माहित नाही हे लवकरच आमच्या लक्षात आले! अर्थात वाट म्हणजे मान वर केल्यावर अंगावर येणाऱ्या सालोट्याला बिलगून डोंगराला समांतर आडवी पाऊलवाट होय! रॉकपॅचेस पार करत स्वत:च वाट शोधत (नेतृत्व - रोमा आणि यो) आम्ही वर चढू लागलो. अशा प्रकारे तासभर त्या डोंगराशी खेळल्यानंतर रोमा , अवि आणि ज्यो पायऱ्यांशी जाऊन पोहोचले. मी आणि यो बाळूच्याचा वाटेने लांबचा वळसा मारून पोहोचलो! सालोट्याच्या पायऱ्या म्हणजे सह्याद्रीतल्या बांधकामाचा एक सुंदर नमुना आहे. एकाच शब्दात वर्णन करायचं झालं तर "रांगडा" यामध्ये ते संपेल.पटाईत आणि अनुभवी ट्रेकरसुद्धा साल्हेर-सालोट्यावर अतिशय काळजीपूर्वक चढतात हे मी खूप आधी कुठेतरी वाचलं होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज घेत होतो. अतिशय मोकळ्या पायऱ्या (म्हणजे धरायला फारसं काहिच नाही, पाय सटकला तर खाली घसरगुंडी थेट द री त...) ती सगळी कसरत करून रोमा, ज्यो, अवि पटापट वर पोहोचले सुद्धा! मी (जीवाला जपत इ.) सर्वात शेवटी वर गेलो. आणि मागे वळून पहिले तर हा सुंदर view दिसला--


समोर साल्हेरचा बुलंद किल्ला मान ताठ करून उभा होता! beautiful!! त्याच्या पहाडामधल्या पायर्‍या केवळ Class!!!

सालोट्याचा दरवाजा छोटाच पण देखणा आहे. पहिल्या दरवाज्याच्या मागे असंख्य शिळा आडव्यातिडव्या पडल्या आहेत. एखादी दरड ढासळल्यामुळे असेल कदाचित.


तिथून सरळ पायवाट बालेकिल्ल्याकडे जाते. वाटेत अजून एक दरवाजा आणि कातळामधल्या ३-४ गुहा लागतात. पावसाळ्यात त्यांत पाणी झिरपत असणार. सालोट्याचा हा दुसरा दरवाजा-


तोच दरवाजा पण आतून -
आम्ही तिथे जेवणाच्या पुड्या सोडल्या. तुझ्या घरी कोण कोण असतं? आणि शेतामध्ये काय लावलं आहे? हे दोन प्रश्न मी बाळूला विचारून पाहिले आणि (हताश वगैरे होऊन) उत्तरे घेण्याची जबाबदारी रोमा आणि योवर सोपवली. तेच प्रश्न, तसेच, त्यांनी विचारल्यावर पठ्ठ्याला बरोबर कळले!! (यावर मी मनात काहीतरी म्हटलं, पण ते आठवत नाही आता! :D)

जेवण संपवून आम्ही गड फिरायला निघालो. गडावर बघण्यासारखं असं विशेष काही नाहीये. एक मारूती आणि २-३ टाके एवढंच आहे ही आमची समजूत एका नागाने दर्शन दिल्यावर लगेच दूर झाली! गवतातून चालताना तो (बिचारा) नाग रोहितच्या पायाखाली येता येता वाचला.


तीन तासाच्या आत दुसऱ्यांदा अहिकुलातील एका सदस्याने बराच वेळ दर्शन दिले होते! नागाचा वेग ६ सेकंदात १०० मी असतो असली (ऐकीव) माहिती पुरवून अविने कुठेही जा, नाग पायाखाली येऊ शकतो असा गर्भित इशाराच दिला! कुठल्याशा वाघांच्या अभयरण्यामधल्या फलकावर वाघाच्या तोंडी लिहिलेला "तुम्ही मला पाहिलं नसेल पण मी तुम्हाला पाहिलं आहे" हा संदेश आठवला! तो बालेकिल्ला उतरेपर्यंत मग मी शक्य तितक्या जोरात पाय़ आपटत पावले टाकीत होतो!

बालेकिल्ला १५ मिनिटात बघितला, आणि रात्रीच्या जेवणासाठी आणि शेकोटीसाठी लाकडे गोळा करत सालोटा उतरलो. उतरतांना तर आणखी थरार होता. कारण चढतांना जी दरी पाठीमागे होती ती आता समोर "आ" करून पसरली होती. वरून पाहताना हे असे दिसते - फोटोत रामू दिसतोय-


हा अजून एक -


पायऱ्यांचा पॅच फक्त जरासा अवघड आहे. बाकी सर्व क्षेम!


येताना रोमाच्या वाटेने खाली आलो. आणि पाहतो तर काय! आमचा दुसरा वाटाड्या रामू त्या अडिचच्या उन्हात एका कातळावर तोंडावर फडके घेऊन स्वस्थ झोपला होता!! लाकडांची मोळी बांधली, थोडी विश्रांती घेतली आणि बरोब्बर तीन वाजता साल्हेरकडे निघालो.

पाचपर्यंत वर पोचायचे ध्येय ठेवले होते, पण अवघ्या चाळीस मिनिटात मी साल्हेरच्या पहिल्या दरवाजामध्ये थंड हवा खात बसलो होतो! पाठोपाठ १५-२० मिनिटात उरलेले चार + दोन ’गडवाले’सुद्धा आले. तिथून सालोट्याचे फोटू घेतले -


साल्हेरचा पहिला दरवाजा -


तो पार करून आम्ही साल्हेरच्या कड्याच्या पोटातली वाट चालू लागलो.
महाराष्ट्रातील सर्वात उंच असा हा साल्हेर किल्ला (उंची ५१४० फूट, १५४३ मी) मनोरम, सुंदर, देखणा आहे. या किल्ल्याला शिवरायांचा इतिहास आहेच, पण त्याही ५-६ शतके आधीचा वारसा आहे. शिवरायांच्या इतिहासातली मराठ्यांनी मुघलांना मैदानात समोरासमोर पहिल्यांदा मात दिलेली लढाई झाली, ती इथेच साल्हेरच्या मैदानात! किल्ल्याला वेढा दिलेल्या ६० हजार मुघलांवर हल्ला करण्यासाठी राजांनी मोरोपंत पिंगळे आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या हाताखालचे ४० हजार मराठी सैन्य फत्ते झाले तेव्हा मराठे केवळ गनिमी काव्यातच नाही तर समोरासमोरसुद्धा वजिरे-आझम औरंगजेबाच्या सैन्याला हरवू शकतात हा आत्मविश्वास संपूर्ण दख्खनभर पसरला होता. त्या इतिहासाच्या नुसत्या स्मरणानेच जिथे अंगावर रोमांच उभे राहते, ती जागा केवळ अंदाजानेच आज आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो! ती लढाई नक्की कुठे झाली असेल हा विचार दुसऱ्या दिवशी साल्हेर उतरतानाही आमच्या डोक्यात होता. कारण साल्हेरचा घेरा इतका मोठा आहे, की याला वेढा दिलेल्या मुघलांवर कसा आणि कुठून हल्ला झाला असेल याचा विस्मय वाटत होता.


कड्याच्या पोटातली देखणी वाट चालून आम्ही माचीवर गेलो. तिथला विस्तीर्ण माळ बघून हरिश्चंद्रगडाची आठवण झाली. त्यातून चालत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना ओलांडून गुहेमध्ये गेलो. सकाळी ताहराबादला भेटलेला ग्रुप आमच्या आधीच तिथे पोचला होता. एका गुहेमध्ये सॅक्स ठेवून ते परशुराम मंदिर बघायला गेले होते. बाजूच्या गुहेत आम्ही आमचा संसार थाटला.


गुहेसमोर खालच्या अंगाला असलेले हे तळे - (पिण्याच्या पाण्याचे नव्हे)


रामू-बाळूला आता निरोप द्यायची वेळ झाली होती. गरम चहा आणि मानधन घेऊन ते सव्वापाचला निघून गेले आणि आम्ही रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. सूर्यास्त बघायला कोण कोण जाणार यावरुन बराच खल झाला. मी उद्या मुल्हेरवरून सूर्यास्त बघणार आहे हे आधीच जाहीर करून टाकले आणि स्वयंपाकाच्या दिशेने वळलो. शेवटी बरीच चर्चा होऊन ज्यो आणि रोमा सूर्यास्त बघायला गेले आणि आम्ही तिघे खिचडीच्या उद्योगाला लागलो. आणि सर्वात पहिल्यांदा माझ्या असं लक्षात आले की फोडणीसाठी गोडे तेल आपण आणलेलेच नाही! पण कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगण्याच्या ट्रेकरच्या गुणधर्माला जागून सॅकमधली खोबरेल तेलाची बाटली काढली आणि त्या तेलामध्ये (लज्जतदार, चविष्ट इ.) खिचडी बनवली. ऐनवेळी गुडघा दुखला तर मालीश करायला आणखी एक औषधी तेलही माझ्याकडे होते. पण खिचडीसाठी खोबरेल तेलाला पहिली पसंती मिळाली. पण चूल पेटवतांना झालेल्या गुहाभर धूराने ५ सेकंदात मला सर्दी झाली आणि दुर्दैवाने पुढच्या २ दिवसांच्या सर्व स्वयंपाककामामधून मी वगळलो गेलो. ती सर्दी फारच भयानक होती.

ज्यो आणि रोमा जवळजवळ धावतच सूर्यास्त बघून आले आणि जेवणाची पंगत मांडली. खिचडी-लोणचे-पापड असा लज्जतदार मेनू होता. जेवून यो-रोमा-ज्यो भांडी घासायला टाक्यावर निघून गेले. अवि चुलीची शेकोटी करून बसला आणि मी मोकळ्या हवेसाठी गुहेबाहेर आलो. बाजूच्या गुहेत मुक्कामाला असणाऱ्यांमध्ये एकाला आकाशातल्या ताऱ्यांचे ज्ञान असावे. कारण त्याने आकाशात धनुष्य-बाण घेतलेल्या शिकाऱ्याचा आकार दाखवला. बैलाच्या शिंगांच्या आकाराची वृषभ रास दाखवली. मी मात्र एक आकाशगंगा नुसत्या डोळ्यांनी बघायला मिळाल्यामुळे ज्जाम खूष झालो. बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या ट्रेकमध्ये राजगडावर पहाटे आय़ुष्यात पहिल्यांदा आकाशगंगा पहिली होती. साल्हेरवरून रात्री सव्वाआठच्या सुमारासही आकाश ताऱ्यांनी नुसते झगमगत होते. हजारो चांदण्या नुसत्या डोळ्यांनी दिसत होत्या. ट्रेकमध्ये काय पहायला आवडते असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचे ’साहित्यामध्ये नुसताच वाचलेला आणि इथे नुसत्या डोळ्यांनी पाहता येणारा नक्षत्रांचा सडा’ हे एक उत्तर असेल. बाकी मला फुलां-पानां-पक्ष्यांइतकेच ताऱ्यांमधले कळते. जसं गडाच्या उंचीवरून उडणारा प्रत्येक पक्षी मला ससाणा किंवा गरूडच वाटतो, तसं मृग रास आणि सप्तर्षी मला सारखेच वाटतात. म्हणूनच मी अशावेळी केवळ अबोल रसिकाची भूमिका घेतो. आकाशात डोळ्यांना दिसणारे "नक्षत्रांचे देणे" किंवा आभाळात पंख पसरवून उडणाऱ्या पक्ष्याचा डौल हे केवळ अनुभवण्यासाठी असते.. अर्थात माहितगार माणूस सोबत असेल तर हा अनुभव अधिक समृद्ध होतो. त्याअर्थाने या ट्रेकमध्ये मायबोलीच्या दिनेशदांना आम्ही miss केलं. त्यांच्याइतकी पाना-फुला-वनस्पतींची माहिती असणारा कुणी बरोबर असता तर कदाचित आम्ही लाकडांऐवजी विशिष्ट पानांवरच चूल पेटवली असती असा गमतीदार विचार मनाला चाटून गेला :)

यो-ज्यो-रोमा भांडी घासून आले आणि आम्ही पथाऱ्या पसरल्या. हद्द म्हणजे ज्योचे एक आणि माझे दोन carry-matsएवढंच अंगाखाली घ्यायला होते. त्यांची कशीतरी arrangement करून आम्ही साडेआठाला झोपलो. रात्रभर गुहेमध्ये उंदरांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मी जवळजवळ १-२ पर्यंत जागाच होतो. जशीजशी बाहेर थंडी वाढू लागली तसतसा उंदरांचा आवाज कमी होत गेला. त्याच आसपास केव्हातरी मला अखेर झोप लागली.

आजचा हिशेब: एक अवघड किल्ला बघून महाराष्ट्रातल्या सर्वात उंच किल्ल्यामध्ये आम्ही मुक्कामाला पोहोचलो होतो. We were running as per the schedule. उद्याच्या लिस्टवर होती-महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या शिखराची - परशुराम मंदिराची भेट आणि मुल्हेरकडे प्रस्थान!


(क्रमश:)

नचिकेत जोशी

सर्व फोटो - यो रॉक्स आणि रोहित-एक मावळा

1 comment:

Dilip said...

Very Neat description... great photos