कशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव
उत्तर बदलत नाही, तरिही, करते मन आशाळू आर्जव
या काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव
पत्राचा मायना तसाही बदलावा लागणार तुजला
(फक्त बदललेल्या पत्त्यावर आता सारी पत्रे पाठव)
इथून वाटा वेगवेग़ळ्या - तुझे चांदणे सोबत नेतो
माझ्या नशिबातील पोकळी भाळी चंद्रामागे गोंदव
अवचित स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली
जीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव
जगता ते लिहिलेच पाहिजे असली काही सक्ती आहे?
सोडुन जावे काळापाशी दुखलेल्याही श्वासाचे शव
वाट एकही कधीच बहुधा मुक्कामाला पोचत नाही
प्राण थांबती अर्ध्यावरती, पुढे भटकती नुसते अवयव
कविता म्हणते - "ऐक जरासे! पाठलाग शब्दांचा थांबव!
माझ्यामध्ये उतरत नाही हल्ली अपुल्या नात्याची चव!"
- नचिकेत जोशी (२३/९/२०११)
2 comments:
Wah Wah! Surekh!
एक एक शेर म्हणजे शुद्ध सोन्याची लड !
Post a Comment