Pages

Wednesday, January 11, 2012

सह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप

आयुष्यात जपून ठेवावे असे क्षण अधूनमधूनच का येतात? सुरूवातीला वाटलेल्या 'पाच दिवसांचा एवढा मोठा ट्रेक जमेल का' या धाकधुकीचं 'मोहीम अजून एखादा दिवस सुरू राहिली तर किती छान होईल?' अशा दिलासा देणार्‍या आत्मविश्वासात रूपांतर कधी झालं? उद्या सकाळी जाग येईल तेव्हा काय वाटेल? इतके मोकळे श्वास पुन्हा कधी घ्यायला मिळतील? एंडलेस क्वेश्चन्स.... जाग आली तेव्हा बाहेरही अंधार होता, आणि आतही हिरमुसलेली सावली पडली होती. कारण काहीच नाही, रानवाटांच्या सोबतीची सवय झाली की मग पुन्हा शहरी 'विराण'वाटांत शिरताना जीव हुरहुरतो.

बल्लूने पीटीला सुटी दिलेली असूनही आम्ही न सांगता, न बोलावता आपणहून पीटीसाठी जमलो. पूर्ण दिवसाच्या भ्रमंतीकरिता शरीराला हलका व्यायाम आवश्यक असतो हे पटल्यामुळे असेल किंवा उद्यापासून हे करणार नाही, हे जाणवल्यामुळेही असेल. सकाळी विद्या'काकू' व त्यांचा भाचा जय (उर्फ यत्ता आठवी) पुण्याला निघून गेले. आता आम्ही केवळ १५ (लीडर्ससह) जण उरलो होतो.

वेळापत्रकानुसार दोनवेळा चहा, मिसळ-पावचा नाष्टा, पॅक-लंच घेऊन बरोब्बर साडेसातला निघालो. आजच्या वेळापत्रकात होते - पदरगड उर्फ कलावंतिणीचा महाल व गणेश घाटाने उतरून खांडस येथे सांगता. खांडसच्याही पुढे जिथपर्यंत रस्ता येतो, तिथे चार वाजता परतीची बस येणार होती. त्यामुळे पदरगड बघून तीन वाजता उतरायला सुरूवात केली असती तरी गणेश घाटाने वेळेत पोचलो असतो.


भीमाशंकर सोडून जंगलात घुसल्यावर सकाळचे सर्व भावनिक विचार नाहीसे झाले आणि जणू काही मोहिमेचा पहिला दिवस असल्याप्रमाणेच वाटचाल सुरू झाली. नागफणीचा डोंगर डाव्या हाताला ठेवून एक वाट वळसा घालत खाली उतरते. फार सुंदर वाट आहे ही! तास-दीड तास चालून आम्ही एका पठारावर आंब्याखाली आलो. हा आंबा खूप प्रसिद्ध आहे. कारण तिथून तीन वाटा फुटतात. उजवीकडची पदरवाडी गावात जाते. मधली शिडी घाटाकडे जाते आणि सर्वात डावीकडची पठार ओलांडून पदरगडाकडे व तशीच पुढे गणेश घाटाकडे जाते.






पदरगडाकडची वाट सुंदर आहेच. कसा निघाला माहित नाही, पण गप्पांचा विषय होता, 'मधुबाला, स्मिता पाटील आणि इतर जुन्या हिंदी अभिनेत्री'! त्यामुळे वाट अधिकच सुंदर झाली हे सांगायला नकोच! मग ओघानेच मराठी चित्रपटांबद्दलही एकमेकांत ज्ञानवितरण झाले. लांबा आणि बल्लू पुढे चालत होते. त्यांनी शेकरू (भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी उडती खार) पाहिली आणि फोटॉसाठी मला हाका मारल्या. त्या शेकरूनेही त्या हाका ऐकल्या असाव्यात आणि फोटॉच्या भीतीने धूम ठोकली असावी! माझी मात्र प्राणी टिपण्याची संधी हुकली! कारण संपूर्ण मोहिमेत माकड वगळता एकाही दोन अथवा चार पायांच्या, चालत्या अथवा सरपटत्या प्राण्याने आम्हाला दर्शन दिले नव्हते.



पठार ओलांडत तासभर चालल्यावर एका विहीरीपाशी आलो. तिथून एक वाट डावीकडे पदरगडाकडे जाते. बल्लू इथे आमच्या सॅक्सवर 'पहारा' देत थांबणार होता. पदरगडाची चढाई आम्ही सुळका चढणार नसल्यामुळे खरंतर टेक्निकल नव्हती. पण सेफ्टी म्हणून सर्वांना बोलाईन बांधण्यात आली. पहिल्या दिवशी दिलेल्या स्लिंगचा अखेर बोलाईनच्या निमित्ताने सदुपयोग झाला. अहुप्याच्या कँपवर अनिकेतने बोलाईन कशी मारावी ते आपणहून दाखवून सुद्धा मला गाठी मारता येत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले! लोक कुठले दोर कुठून कुठून काढून-घालून शेवटी एक फस्क्लास न सुटणारी गाठ बांधतात याचं मला नेहमीच कौतुक वाटतं! असो. १-२ पिट्टू सॅक्स घेतल्या आणि प्रसादच्या मागून निघालो. प्रसाद म्हात्रे हा टेक्निकलसाठी खास बोलावलेला पाहुणा होता. माझी रॉकपॅचेस मधला वावर बघून 'तयार वाटतोस! एकदा ये बोरिवलीला, एकत्र क्लाईंबिग करू' असे आमंत्रण देऊन गेला. कातळ पाहिले की मला एकदम आपलं वाटायला लागतं, नसलेल्या बारीक बारीक खाचाही दिसायला लागतात आणि हा चिरंतन वृद्ध, प्रेमळ सह्याद्रीबाबा मला स्वतःच्या अंगावर मायेने खेळू देईल, असं काय काय वाटायला लागतं...

वीस एक मिनिटे चालल्यावर जिथे चढ सुरू होणार होता, तिथल्या एका मोठ्या कातळावर नारळ फोडला आणि 'ही चढाई-उतराई यशस्वी होऊ दे' असे डोंगरबाबाला साकडे घातले. सर्व भटके लोक डोंगरापुढे मान झुकवून स्तब्ध उभे होते हे दृश्य मला तरी फार भावले.




पुढचे दोन तास हे संपूर्ण मोहिमेमधले सर्वात थरारक क्षण समजायला हरकत नाही. जेवणाच्या शेवटी पेशल डिश असावी तसा हा अनुभव होता. सरळसोट चढ, एका बाजूला एक्स्पोजर, त्यात स्क्री असा मामला होता. (पण मी मागे भैरवगडावर जाऊन आल्यामुळे मला तरी चौथीची परीक्षा पास झाल्यावर बालवाडीत बसल्यासारखं झालं होतं!)

२०२० फूट उंचीच्या पदरगडाचे वैशिष्ट्य म्हणजे वाटेमध्ये एक चिमणी लागते. हा एक अरूंद घळीचा प्रकार आहे. चिमणीतून जाताना पाठ मागच्या कातळाला आणि गुडघे दुमडून पावले समोरच्या कातळाला टेकवायची आणि एकदा पाठ-एकदा पाऊल असे सरकवत वर चढायचे किंवा खाली उतरायचे.






बॅचमधल्या सर्वांचा विचार करून लीडर्सलोकांनी त्या चिमणीमध्ये एक कृत्रिम शिडी लावून टाकली आणि चिमणी त्यातल्या त्यात सोपी केली. मी चढताना शिडीवरून गेलो आणि उतरताना मात्र (लांबा जवळपास नाही हे पाहून) मागेपुढे घासटत उतरलो. अर्थात माझ्यापुढे आमच्यासोबत असलेला स्थानिक गावकरी होताच.


पदरगडावर बघायला काहीच उरलेले नाही. पण एक अतिशय मोक्याच्या जागी असलेला राखणदार म्हणून पदरगड बघता येईल. पदरगडावर एक सुंदर गुहा आहे. त्यात मुक्काम करता येऊ शकतो. जवळच पाण्याचे टाके आहे.


वर पोचलो.


त्या सुळक्याच्या डावीकडून -


गुहेकडे जाणारी वाट -


गुहेमध्ये शंतनु आणि सचिन - (समोर खाली दिसणार्‍या झाडीत शिडी घाट आहे)


पदरगडावरून दिसणारा शिडी घाट -


भीमाशंकर-नागफणीचे डोंगर -


अतिशय सुंदर, रांगडी वाट येंजॉय करत पदरगड उतरलो तेव्हा फक्त पावणेदोन वाजले होते. म्हणजे आम्ही वेळापत्रकाच्या पुढेच होतो. (आता जेवायला निवांत वेळ मिळाला असता!) विहीरीपाशी पंगत मांडली.


ताक विकायला आलेला एक गावकरी भेटला आणि काही क्षणांत त्याची ताकाची कळशी रिकामी झाली! इथे लीडर बल्लूने आमचा निरोप घेतला. आमचा बॅच लीडर आता पुढचे चार दिवस भीमाशंकरचा कँपलीडर म्हणून काम करणार होता. स्लिंग्स 'चक्रम'च्या आयोजकांना परत दिल्या आणि अडीच वाजता आम्ही 'सह्यांकन २०११' मधला शेवटचा उतार उतरायला सुरूवात केली.

गणेश घाटाची वाट आजच्या आतापर्यंतच्या वाटांच्या तुलनेत प्रशस्त होती. पदरगडाच्या पठारावरून गडाला मागे ठेऊन वळणं घेत वाट उतरते.


वाटेत डोंगरांच्या कुशीत गणपतीचे एक मंदिर आहे. तिथे थोडावेळ थांबलो.


तिथून उतरताना डबल बोअर बंदुका घेऊन जंगलात प्राणी मारायला चाललेले पाच-सहा जण दिसले. त्यांना पाहून मला गणेश घाटामध्ये संध्याकाळच्या वेळी घडलेल्या लूटमारीच्या ऐकलेल्या कहाण्या आठवल्या. लांबाला त्याबद्दल विचारल्यावर 'ट्रेकर म्हणवणार्‍या माणसाला सूर्य मावळल्यावर या वाटेने उतरू नये हे कळण्याइतकी अक्कल पाहिजे ' असं लांबाष्टाईल उत्तर देऊन सगळेच प्रश्न संपवून टाकले.

मग अर्धा पाऊण तास उतरलो असू. बसपर्यंत पोहोचण्यासाठी अजून किती चालावे लागेल असा विचार करत असतानाच पुढ्यातली वाट अचानक उघडली आणि ध्यानीमनी नसताना समोर रस्ता आणि बस दिसली! संपूर्ण मोहिमेमधला तो सर्वात सुखद धक्का होता! अगदी अगदी खरं सांगायचं, तर गेले पाच दिवस इतके फिरलो, भटकलो, दरवेळी पुढे जायची ओढ असायची. पण ती बस दिसल्यावर मात्र तिथपर्यंतची पन्नास पावले अजिबात टाकू नयेत, असं फार फार वाटून गेलं...यथावकाश सर्व १३ लोक्स व लांबा बशीपाशी पोचले व एक लास्ट ग्रुप फोटोसाठी सर्वांना उभे केले.




मग खांडसमध्ये चहा-वडापाव, तिथून निघाल्यावर बसमध्ये एकमेकांचे इमेलपत्ते घेणे, घरी पोचल्यावर तासभर आंघोळ करण्याच्या गप्पा, फोटो पाठवण्याचे, गटग करण्याचे वायदे, आणि क्षणाक्षणाने निरोप घ्यायची जवळ येणारी वेळ...... बाकी काहीच नाही!

डोंगरदर्‍यांमधला क्षणिक मुक्कामानंतर बिनपंखांच्या पक्ष्यांचा प्रवास आता पुन्हा आपापल्या घरट्यांच्या दिशेने सुरू झाला होता...

आजचा हिशेबः
२४ डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे ८ ते ९ किमी
वैशिष्ट्ये - सलग तिसर्‍या वर्षी योगायोगाने तोच दिनांक (२४ डिसेंबर) ट्रेकमध्ये घालवल्याचं एक समाधान वगैरे! पदरगडाची सुंदर चिमणी, रॉकपॅच. तेवढा चढ सोडला, तर नुसता उतारायचा प्रवास. 'सह्यांकन' संपताना मनात केलेल्या हिशेबात उरलेली केवळ - 'जमा'! 'खर्च' नगण्यच!

**************

एक आनंदयात्रा संपली. हा शब्दशः ट्रेक नव्हता. उत्कृष्ट संयोजनामुळे सुसह्य ठरलेली ही एक मोहिम होती. हाही अनुभव मोलाचाच! शिखराकडे पोचण्याची घाई करण्यापेक्षाही वाटेवर मिळणारी अनुभवांची शिदोरी बांधून घेण्याचे हे दिवस आहेत! 'मी'ला मान मिळण्याआधी त्याचा दर्जा वाढावा यासाठी सुरू असलेली ही प्रामाणिक मेहनत आहे. सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं जे जे होतं, ते सांगून झालंय. तुम्ही इतक्या चिकाटीने हे सगळं वाचलंत, त्याबद्दल, प्रिय वाचकहो, मनापासून आभार! दरवेळी तुमचा "पुढचा भाग कधी?" हा प्रश्न दडपण आणणारा असला तरी हवाहवासा असाच होता. 'सह्यांकन २०११' मध्ये जितकं फिरलो, जगलो, ते वाचकाच्या डोळ्यापुढे उभं राहिल इतपत तरी लिहावं हा एकमेव प्रयत्न यामागे होता. संपूर्ण मोहिमेमध्ये आम्ही एकमेकांची व संयोजकांचीही जी यथेच्छ थट्टा केली, त्यातला काहीकाही भाग इथे प्रसंगोचित वाटला आणि मोहिमेइतकंच जड आणि दीर्घ लिखाण हलकंफुलकं व्हावं म्हणून लिहीला गेला. एखादा शब्द भरीचा झाला असल्यास क्षमा! गांभीर्याचं वातावरण असेल तर अशा लांबलचक मोहिमा कंटाळवाण्या होतात. 'सह्यांकन २०११' त्याला पूर्ण अपवाद होती!

साडेतीन हातांच्या मर्यादेमध्येही अमर्याद शक्ती लपलेली असते आणि ती सोबत्यांना देत-घेत पुढे जाण्यात प्रवासाची खरी मजा असते हे पुन्हा उमजलं. मिळालेला वेळ (सोप्या शब्दात त्याला 'आयुष्य' म्हणतात) सार्थकी घालवणं म्हणजे काय करणं, याची नवी उत्तरे मिळाली. 'कुठलीही वाट चुकीची नसते, ध्येयाकडे जाणार्‍या वाटेला जाऊन मिळणं हे सगळ्यात महत्वाचं' हे डोंगरातल्या चुकलेल्या वाटांनीच किती सहजपणे शिकवलंय! हे सारं संचित आता मनाच्या असंख्य वाटांनी बाहेर यायला उत्सुक असलं तरी माझ्या शब्दांमध्ये मावणारं नाही! भरभरून सांगावं, उलगडून दाखवावं आणि दरवेळी नवीन शिकत राहावं असं बरंच काही या प्रेमळ सह्याद्रीबाबाच्या घाटा-वाटांमध्ये लपलंय. ते अनुभवण्यासाठी पुढच्या वेळी अशाच कुठल्यातरी कड्या-कातळावर, सांदी-कपारीखाली, ओढ्या-नाल्यांमध्ये भेटू!

तोपर्यंत... शुभास्ते पन्थानः सन्तु |

(समाप्त)
- नचिकेत जोशी


14 comments:

Rajan Mahajan said...

हि सहयनारायणाची कथा संपूच नये असे वाटतेय. जशी भावना मोहीम संपताना असते तीच भावना तुझी लेख-मालिका संपताना होत आहे. उद्यापासून काय वाचायचे ??

ट्रेक संपताना प्रत्येकाच्या मनात येणारे विचार अतिशय अचूक मांडले आहेस. धन्यवाद !!

लेख मालिका वाचताना मी मोहीम आयोजक, ट्रेकर, साधारण वाचक असा सर्व होतो.......सर्वांना लेख-मालिका आवडली. पुन:श्च धन्यवाद !!

अर्चना said...

नचिकेत...तुझे सह्यांकन चे सहाही भाग अगदी उत्कृष्ट झाले आहेत. आणि तुझे एक वाक्य पटले 'रानवाटांच्या सोबतीची सवय झाली कि मग पुन्हा शहरी 'विराण' वाटांत शिरताना जीव हुरहुरतो.'
सह्याद्रीच्या कुशीतली मोकळी हवा, कडे, कातळं आणि अनवट रानवाटांवरून केलेली चढाई आणि शिखरापर्यंत पोहचण्यासाठी केलेली धडपड याची तुलना कशाशीच होवू शकत नाही. सह्यांकन चे शिस्तबद्ध आयोजन आवडले आणि खास करून तुमचे टीम लीडर लांबा :). ह्या रानवाटा कधी संपूच नये असे वाटते, असाच सह्याद्रीच्या कुशीत फिरत राहा...आणि कुठल्यातरी घाटा-वाटांवर, कड्या-कपारीवर, शिखरावर पुन्हा भेट नक्कीच होईल.

Neelima G said...

Pudhachya varshi mee hi yenaar yaa mohime var :)
One of the best reads in recent times.. Utkrushta zaalet saare lekh. Ata tula compulsory roj kahi tari lihun upload karaavach laagel.. Savay zaalie na :)

PARAG said...

Excellent Nachiket - I remembered reading Sherlok Holmes or Dan Brown (in recent times) - Reading Anandyatra was an exceptionally great experiance. Just like Rajan said, everyday eager to read further parts & now felt like it should have never stopped. Once again superb & keep it up.

sachin said...

aaishappth; je zale, jase zale te sahih sahi lihiles, aniket solid yaar
tula manto!

sachin said...

nachiket! fantastic.

u r simply superb, frankly speaking i have already forgotten the names of those small villages en route. If I need them infurute I will once again go thru this entire episodes again

thanks again , just too good !

sachin k

नचिकेत जोशी said...

thanks all...
:)

लिहितांना तुम्हा वाचकांचा आधार खूप मोठा होता...
लोभ असू द्यावात!

- नचिकेत

VRangers-Ananda said...

Khupach Sunder Mahiti Dilyabaddal Dhanyavad ..........

VRangers-Ananda said...

Mahiti And Lekhan Farach Sunder Aahee...

सिद्धेश घाडगे said...

apratim,apratim aani apratim tumhi lihilat ani mi te dolyasamor anubhavla..apali lihinyachi shaili khup chaan ahe sir..apna sobat trek karnyas utsuk ahe ani krupaya apan tumchya sahyamohimechya pravas varnanche ekhade pustak kadhach.
dhanyawaad.

वैभव आलीम said...

नचिकेत दादा .. डोंगरात रस्ता चुकावा तसाच चुकून तुझ्या या ब्लोग वर आलो .. आणि वाटले "धन्य झालो "
तुझ्या सह्यांकन २०११ चे सहाही भाग .. तसेच अन्य प्रवास वर्णने वाचताना अक्षरश: खिळून गेलो मी ... जबरदस्त लिहिलेस .. कसे काय लिहू शकतोस ? इतके अप्रतिम !! शब्दच नाहीत रे ... खरेच धन्य झालो मी ..

नचिकेत जोशी said...

thanks all.. :)

Vaibhav, m touched by ur comment...
lobh asu de, evadhach mhanen..

Aarya Marathe said...

Dear Nachiket,

Reading your blogs is akin to walking through the dense foliage in the sahyadri's. It is soothing yet exciting, superbly written.I am myself a regular trekker and also have done Sahyankan 2017 and hence appreciated it even more.

Would love to trek with you some day.

cheers

Amit Marathe

नचिकेत जोशी said...

@Amit Marathe,
मनापासून धन्यवाद. नक्की सोबत ट्रेक करू या. माझी ट्रेकची frequency बरीच कमी झाली आहे. तरीही, सोबत ट्रेक केल्यावर धमाल येतेच. खास त्यासाठी एकदा plan करू.

नचिकेत