Pages

Tuesday, April 24, 2012

एका प्रवासाची गोष्ट - २


वेळ वाचवण्याचा खुळा छंद कुणाला असेल का? आणि असलाच तर वेळ वाचवण्याच्या धडपडीपायी माणूस काय काय करतो? याची उत्तरे वेगवेगळी येतील. पण सुखासुखी होऊ शकणारा प्रवास टाळून आपणहून धाकधूक ओढवून घेणारा प्रवास एखादा वीर नक्की करू शकतो. मी नुकताच केलाय!

रायगडच्या नितांतसुंदर ट्रेक कम ट्रीपनंतर पुण्याला जाण्यासाठी बसमधून एकटाच महाड फाट्याला उतरलो तेव्हा सव्वापाच वाजले होते. हायवेपासून पाव किमी वरचा स्टँड गाठून पुण्याच्या गाडीत बसायचे एवढा साधा मामला होता. स्टँडवर गेल्यावर समजले, की पुणे गाडी साडेसहा वाजता आहे. मला तो उरलेला सव्वा तास दहापट मोठा होऊन दिसायला लागला. महाडहून पुण्याला येणार्‍या बर्‍याच गाड्या वरंधामार्गे येतात. 'त्यामुळे इथे वेळ घालवण्यापेक्षा मिळेल त्या वाहनाने वरंध/माझेरीपर्यंत जाऊ. तिथे भोरपर्यंत जाण्यासाठी वाहन मिळाले तर उत्तम, नाहीतर ही साडेसहाला इथून सुटणारी गाडी तिथे पकडू' असा साधा-सोपा विचार करून स्टँडबाहेर आलो.
सहा आसनी टमटमवाल्याला विचारले तर तो बिरवाडीपर्यंत सोडेन म्हणाला. बिरवाडी हे हायवेपासून आत असल्यामुळे मला चालणार नव्हते. मग चालत पुन्हा गोवा हायवेला आलो.

तिथे एक बाबाजी भेटला. 'भोरपर्यंत कसे जावे' असे विचारल्यावर त्याने 'विक्रममधून (टमटमला पेण-रायगडमध्ये 'विक्रम' म्हणतात) बिरवाडी फाट्याला जा, तिथून भोरला जायला टेम्पो मिळेल' असे सांगितल्यावर विक्रममध्ये बसलो. बिरवाडी फाट्याच्या ठिकाणावरून माझा थोडा गोंधळ झाला होता. गोवा हायवे सोडून वरंधा घाटाकडे जो रस्ता वळतो, त्या रस्त्यावर पिंपळवाडी (कांगोरीगड फाटा), ढालकाठी, बारसगाव (शिवथरघळ फाटा) ही गावे आहेत. त्याच रस्त्यावर बिरवाडीकडे जाणाराही एक फाटा आहे. टमटम मला तिकडे सोडेल अशा समजुतीतून मी विक्रममध्ये बसलो होतो. प्रत्यक्षात गोवा हायवेलाच एक बिरवाडी फाटा लागतो. टमटम तिकडून आत शिरल्यावर मी डायवरशी भोरला पोचण्याबद्दल विचारायला सुरूवात केली. मुख्य प्रश्न फक्त वेळेचा होता. मला वेळ वाचवून लवकरात लवकर पुण्याला पोचायचं होतं आणि झोपायचं होतं.

"बिरवाडीतून ढालकाठीला जा. तिथून भोरला जायला ट्याम्पो भेटतील." - डायवर.
"हो. बिरवाडीतून ढालकाठी किती लांब आहे?"
"असेल दहा-पंधरा मिनिटे. पण तुम्ही साडेसहाच्या गाडीने का नाही गेलात?"
डायवरने अचूक मुद्द्यावर बोट ठेवले होते.
"अहो, मला वाट बघायचा कंटाळा आला. ढालकाठीहून टेंपो नाही मिळाला तर ही साडेसहाची गाडी मिळेलच की!"
"कुणी सांगितलं? ती गाडी ताम्हिणीमार्गे जाते"
"!!!!!!"
"........."
"क्क्काय??"
"हो मग! वरंधामार्गे आता डायरेक्ट रात्री साडेअकराला एसटी आहे"
"हो! बरोबर आहे. मागे एकदा त्या एसटीने गेलो होतो". मला तीन वर्षांपूर्वीचा तोरणा ते रायगड ट्रेक आठवला. त्यावेळी त्या साडेअकराच्या एसटीने पार पुण्यापर्यंत उभे राहून गेलो होतो.
"मग आता कसं जाऊ? पुन्हा माघारी महाडात जाऊ का?" घड्याळात सहा वाजले होते. डोक्यात वेळेचा हिशेब सुरू होता.
"छे छे! आता उलटं कुठे जाताय? १० रूपयाची रिक्षा करा, ढालकाठीपर्यंत. ढालकाठीहून फळा-बिळांचे ट्यांपो नक्की मिळतील."
"बरं".

बिरवाडीत उतरलो तेव्हा सहा वाजून पाच मिनिटे झाली होती. एका रिक्षावाल्याला विचारलं तर त्याने तीस रूपये होतील असं सांगितलं. ते ऐकून तर डॉस्कंच हललं. आधीच एसटीची आशा संपली होती, त्यात हे असं! मग चालतच ढालकाठीकडे निघालो. वाटेत एक नदीचा पूल लागला. अस्ताला जाणार्‍या सूर्याचं प्रतिबिंब, संथ वाहणारं पात्र, वार्‍याची झुळूक हे सगळं अनुभवल्यावर खूप्पच फ्रेश वाटलं. आणि तसंही ते अंतर तीस रूपयांच्या मानाने फारच कमी होतं. ढालकाठीपासून थोडं पुढे पिंपळवाडीच्या फाट्यावर येऊन थांबलो.

तिथे माझेरीकडे जाणार्‍या गाडीची वाट पाहत उभे असलेले दोन गावकरी भेटले. पेहराव आणि बोलण्यावरून सरकारी कचेरीतले असावेत असे वाटून गेले. त्यांना पाहिल्या पाहिल्याच मी 'रायगडला गेलो होतो. दोस्त मुंबईचे होते, ते मुंबईला गेले. मला भोरला जायचंय' असं जाहिर करून टाकलं. मला नीट पाहून घेतल्यावर मग ते बोलायला लागले.
"आम्ही पाच वाजल्यापासून उभे आहोत. एकही वाहन आलं नाही अजून. रोज असं होत नाही. आज काय झालंय काय माहित!"
वेळ वाचवण्याच्या उरल्यासुरल्या आशाही नेस्तनाबूत करायला निघालेली ती सलामीची वाक्ये ऐकून मला धस्स झालं.
"टेंपो मिळेल ना एखादा?"
"हात करायचा. थांबला तर थांबला. आज रविवार आहे ना, त्यामुळे टेंपोंची वर्दळ कमी असते"
हे रविवार प्रकरण नवीनच होतं. त्याचा मी विचारच केला नव्हता.
"एकदा भोरला पोचलो की मग पुढे चिक्कार एस्ट्या मिळतील पुण्यासाठी" - मी.
"हो, पण भोरचा स्टँड साडेनऊला बंद होतो. त्यानंतर पोचलात तर कापूरहोळपर्यंत जावं लागेल कसंतरी"
हायला! हे अजून एक नवीन! पण ही वस्तुस्थिती असू शकत होती. कारण सहा वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना भोरला एका स्पर्धेसाठी गेलो होतो तेव्हा तिथून पुण्यात परतायला साडेनऊची शेवटची एसटी मिळाली होती. आताही तीच परिस्थिती असेल तर साडेनऊच्या आत भोरमध्ये पोचणं मस्ट होतं! हा विचार मी महाडहून निघाल्यापासून केलाच नव्हता कारण साडेनऊच्या लक्ष्मणरेषेच्या आत पुण्यातही पोहोचू असं वाटलं होतं!

दोन ट्रक आले, पण न थांबताच निघून गेले. बाकी सगळ्या प्रायवेट गाड्या. त्यांची अलिशानता पाहूनच मला त्यांना हात करायची हिम्मत होईना! मग दोन टेंपो आले. त्यांना हात करणार तेवढ्यात ते उजवा इंडीकेटर दाखवून पिंपळवाडीत वळले. आत लग्नाचं वर्‍हाड बसलं होतं. लांबवरून येताना दिसलेले १ ट्रक आणि २ टेंपो ट्रक लांबूनच बिरवाडीकडे वळले. निराशा! तात्पर्य, भोरच्या दिशेने निघण्याच्या निर्णय अत्यंत चुकीचा ठरण्याची चिन्हे दिसू लागली होती. आणि वर पुण्यात केव्हा पोचेन हेही बेभरवशाचे होत चालले होते.

सहा पंचवीस!
अजून पाचच मिनिटांनी ती पुणे गाडी महाडमधून सुटली असती आणि ताम्हिणीमार्गे निघालीही असती. आणि मी अनिश्चित काळासाठी पिंपळवाडी फाट्यावर अडकून पडलो होतो. 'कॅप्टनना महाडऐवजी माणगावात सोडायला सांगितलं असतं तर कदाचित ती गाडी मिळालीही असती' - उशीरा सुचलेले निरर्थक विचार मनात सुरू झाले होते! अखेर कंटाळून पुन्हा आल्या मार्गे ढालकाठी-बिरवाडी-'विक्रम' करून महाडात जायचा विचार त्यांना बोलून दाखवला. तेही सहमत झाले.

"इथे सध्या चोर्‍यामार्‍यांमुळे वातावरण टेन्शनमध्ये आहे. त्यात तुम्ही पडलात बाहेरगावचे. उगाच काही व्हायला नको. त्यापेक्षा महाडमध्ये सुरक्षित असाल. आणि तो स्टँड रात्रभर सुरू असतो"
"हो ना!"

साडेसहा वाजता मी एवढा वेळ रस्त्यावर ठेवलेली नवी कोरी प्रिय ट्रेकिंगसॅक उचलली आणि स्वतःच्या एका फसलेल्या प्लॅनला (अतिउत्साही, घाई-गडबड वगैरे) दोष देत ढालकाठीकडे निघणार तेवढ्यात एक ट्रक आला. सातारा पासिंगचा तो ट्रक पाहिल्यावर आशा-उमेद वगैरे जे काही असेल ते एकदम आकाशात पोचलं आणि त्याला हात केला. त्यानेही 'कुठे' असे खुणेनेच विचारले. भोर म्हटल्यावर ट्रक थांबला. मी आणि ते माझेरीचे दोघे ट्रकमध्ये चढलो. त्याचा चालवण्याचा वेग पाहिल्यावर पहिल्याच मिनिटाला ते गावकरी "आता पोचाल वेळेत भोरला" असं म्हणू लागले आणि मी जरा निवांत झालो.

वाटेत अजून एक "डोलकर" ट्रकमध्ये चढला. त्याला वाघजाईला जायचे होते. आता आमची चौघांची कंपनी झाली होती. माझेरीमध्ये ते दोघे उतरले. मग मी थोडा ऐसपैस बसलो आणि ट्रकची केबीन निरखू लागलो. गडी नेहमी ट्रकवर असणारा असावा. झोपायला चादर-उशी, एक्स्ट्रा शर्ट-प्यांटचा जोड, उदबत्त्या, दोन पाण्याच्या बाटल्या, एक डबा. बोर्डवर देवीचा फोटो, शेजारी टेप. फक्त क्लिनर दिसत नव्हता. (नसेल क्लिनर, मला काय?)

डायवर मुकाट ट्रक चालवत होता आणि मला गप्प बसून झोप येऊ लागली होती. मग 'रिकामे मन सैतानाचे घर' प्रमाणे मनात भोर-वरंधा मार्गावर अंधारात झालेल्या लुटीचे आणि मारहाणीचे किस्से आठवले. अनोळखी ट्रक डायवर आणि त्यात बरोब्बर अंधार पडताना आम्ही त्या मार्गावर असणार होतो. या विचारांना ट्रक जेव्हा कावळ्याच्या पायथ्याशी थांबला तेव्हा ब्रेक लागला. डायवरसाहेब उदबत्ती घेऊन उतरले आणि वरंधामाथ्यावरच्या वाघजाईच्या मंदिरात जाऊन पूजा वगैरे करून आले. तेवढी पाचएक मिनिटे मीही बाहेर उतरून दरीत पसरणारा अंधार बघून घेतला. वातावरण सुंदरच होते ते!

वाघजाईला ते 'डोलणारं' पावणं उतरलं आणि ट्रकमध्ये आम्ही दोघेच उरलो. ट्रक रिकामाच चालला होता. माल पोचवून आला असावा. भोर-वरंधा हा पस्तीसएक किमी चा रस्ता मला दिवसाही विलक्षण कंटाळवाणा वाटतो. रस्ता वळणं घेत घेत जात राहतो. चालवणार्‍याच्या हातांना चांगलाच व्यायाम! तिन्हीसांजेला डायवरबाबांनी भजनांची कॅसेट लावली आणि झोप-बिप सगळी उडून गेली. बर्‍याच महिन्यात न ऐकलेली सुंदर भक्तिगीते ऐकायला मिळाली. ते लूट वगैरेचे विचार केव्हा दूर पळाले ते कळलेही नाही.

बरोब्बर आठ वाजून चाळीस मिनिटांनी भोरमध्ये चौपाटीला उतरलो. (छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा असलेल्या चौकाला भोरमध्ये चौपाटी म्हणतात) डायवरला धन्यवाद दिले (धनही दिले). दहा मिनिटे चालत स्टँड गाठला. परंतु पुण्यासाठी एसटी थेट साडेनऊलाच असल्याचे कळले आणि इतकी धावाधाव निष्फळ ठरल्याचे जाणवले. अर्थात माझेरी-ढालकाठी-महाड अशा दूर दूर ठिकाणी अडकण्यापेक्षा हा पाऊण तास अधिक सुसह्य होता. एक स्व-आयोजित, दगदगीचा पण अतिशय सुंदर असा प्रवास संपवून स्वारगेटला उतरलो तेव्हा सव्वा अकरा झाले होते. डोळे झोपेमुळे बंद होत होते आणि मन टक्क जागे!

नुकतीच एक बातमी वाचली - मी जेव्हा बिरवाडी-ढालकाठीमध्ये फिरत होतो आणि टेंपोची वाट पाहत होतो, योगायोगाने त्याच दिवशी, आणि कदाचित एक-दोन तास आधी चांभारगडावर एकटाच चाललेल्या एका ट्रेकरला स्थानिक गावकर्‍यांनी चोर समजून पोलिस ठाण्यात नेले होते. माझेरीचे ते दोन गावकरीसुद्धा चोरीबिरीबद्दल बोलले होतेच. ती बातमी वाचून मला फक्त हसू फुटले एवढंच!

आता ठरवलं आहे, महाडमधून पुन्हा कधी यावेळेला आलोच तर मुकाट साडेसहाच्या एसटीने यायचे.....नाही! नको नको! कारण त्याशिवाय असा विचित्र तरीही भरपूर आनंद-अनुभव देऊन गेलेला प्रवास कसा घडणार? या अनुभवामुळे पुढच्या वेळी धोपटमार्गाने प्रवास करावा की निश्चिंतपणे असे ऑफरूट ट्राय करावेत या दुहेरी शंकांमध्ये सध्या अडकलो आहे, एवढे मात्र निश्चित!

- नचिकेत जोशी (१९/४/२०१२)

4 comments:

Rajan Mahajan said...

राव,

हे म्हंजे, स्वताच्या हाताने पायावर धोंडा घालून, नेम चुकला म्हणून नाचण्यासारखे आहे.

राजन

अनिकेत वैद्य said...

अश्या ऑफबिट वाटेने प्रवास करायला मला पण आवडत, पण दमलेला नसेन आणि पोहोचायची घाई नसेल तरच. नाहीतर पोहोचेपर्यंत उगाच जीवाची घालमेल होत राहते.

rutuved said...

chaaaaaaan...Khup diwsane actully vachala...felt like joining your ride..miss it totally!!

vaishali kelkar said...

a se anubhav ayushyatil tech tech pan ghalvun taktat. so jeva vel milel teva te try karavet. :)