Pages

Friday, June 29, 2012

सरसगड – चोरवाटेने !


 (केवळ 'आडवाटांचे देणे' मध्येच प्रकाशित झालेला 'सरसगड' वरील लेख)

अष्टविनायकातील सुप्रसिद्ध बल्लाळेश्वर गणपतीचे पाली हे सरसगडाच्या पायथ्याचे गाव. २८ ऑगस्टला भल्या सकाळी भर पावसात इर्शाळगडाच्या दिशेने निघालेल्या आम्हा ६ जणांच्या नशिबी सरसगडाचा अनपेक्षित ट्रेक आणि तोही चोरवाटेने व्हावा ही त्या बल्लाळेश्वराचीच इच्छा असणार!

चौकफाट्याला इर्शाळगडाकडे जायचा रस्ता विचारायला एका हॉटेलमालकाकडे गेलो आणि त्याने "यवड्या पावसात काय गड चडणार तुमी, वाटच सापडायची न्हाई" असं म्हणून गडाखालीच मात दिली. मग पुन्हा एकदा मृगगड, सोनगिरी, पेठचा किल्ला, सुधागड, अगदी ड्युक्सनोज असं करत करत शेवटी सरसगडच "करून" येऊ असा ठराव सर्वानुमते पास झाला! नशिबाने आदल्या दिवशी का कुणास ठाऊक पण सरसगडाचीही माहिती चाळून ठेवली होती. त्यात गणेशमंदिराच्या मागून सरळ, सोपी वाट आहे असे दिले होते. त्यानुसार पालीमध्ये गाडीतळावरील चौकीदाराला "गडावर जायचे आहे, गाडी कुठे लावू" असे विचारल्यावर त्याने "गडाची वाट PWD/MSEB ऑफिसशेजारून आहे" असे उत्तर दिले! पुन्हा गाडी मागे आणली आणि MSEB कार्यालयाच्या शेजारच्या बोळात घुसवली! तिथे शेवटच्या घरापर्यंत जाऊन गाडी लावली तेव्हा सरसगडाच्या पालीतून दिसणार्‍या भिंतीच्या डाव्या टोकाच्या खाली आलो होतो आणि मंदीर पार उजव्या टोकाखाली होते. पण तरीही, पहिल्यांदाच जात असल्यामुळे स्थानिक गावकर्‍यांचे म्हणणे प्रमाण मानून त्या खडबडीत रस्त्यावरून आम्ही पायी चालायला सुरूवात केली. सरसगडाच्या कातळभिंतीच्या आम्ही पूर्ण डाव्याबाजूला होतो. त्याच वाटेने पुढे गेल्यावर एक वस्ती लागते. त्या वस्तीच्या बरंच अलिकडे एक पायवाट सरसगडाकडे निघते. ही वाट एकच आणि अत्यंत छोटीशी आहे. त्या वाटेने चढू लागलो. मधला चढ पार करून एका छोट्याशा पठारावर थोडावेळ थांबलो. पावसामुळे अंबा नदी दुथडी भरून वाहत होती. हिरव्यागार प्रदेशामधून नदीचे मातकट लालसर पात्र वळणे घेत लांबवर पसरले होते.

तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला आणि क्षणात सगळा परिसर ढगांमध्ये अदृश्य झाला! वाटेत एके ठिकाणी कातळात कोरलेल्या सुबक पायर्‍या लागल्या आणि आता या पायर्‍या आपल्याला (गडा) वर घेऊन जाणार अशा खात्रीने वर चढू लागलो. तो आनंद फार कमी वेळ टिकला कारण त्या पायर्‍यांवरून झरे वाहत होते आणि कातळ कमालीचे घसरडे झाले होते. पुढे सुबक पायर्‍याच दिसेनाशा झाल्या. शोधाशोध केल्यावर कातळात जेमतेम पाऊल ठेवता येईल एवढ्या खाचेच्या पायर्‍या दिसल्या. आणि पुढचा अर्धा-पाऊण तास आम्ही केवळ त्या निसरड्या पायर्‍या, अधूनमधून आडवे जाणारे धबधबे, जोरात पाऊस, आणि गच्च झुडुपे यांच्याशी झगडत होतो. ती तशा प्रकारची वाट पाहून सोप्या सरसगडाबद्दलची कल्पना केव्हाच नाहीशी झाली होती आणि आम्ही खूप सावधपणे पाऊल टाकू लागलो होतो. ही वाट नक्कीच राजवाट नाही आणि आपण नक्कीच एखाद्या चोरदरवाजातून आत जाणार हे एव्हाना कळलेच होते! सारेच अनपेक्षित आणि हवेहवेसे घडले होते! चोरदरवाज्यातून आत शिरलो आणि अजून एक अवघड, घसरडा रॉकपॅच चढून बालेकिल्ल्यावर गेलो. 

बालेकिल्ल्यावर एक महादेवाचे मंदिर, पाठीमागे कोनाड्यात "बाप्पा", मंदिराजवळच एक तळे आणि  दर्गासदृश बांधकाम आणि माचीवर अत्यंत प्रशस्त गुहा आहेत. उतरताना राजवाटेवरच्या दरवाजाच्या बाहेरच्या उंच घसरड्या पायर्‍यांवरून सावकाश उतरत पायवाटेने गावात उतरलो.

ध्यानीमनी नसताना सरसगडाची सफर झाली आणि तीही फारशा माहित नसलेल्या - चोरवाटेने! ट्रेकला निघताना संपूर्ण माहिती गोळा करूनच निघावं हे जरी खरं असलं तरी पूर्ण खबरदारी घेतली तर सह्याद्रीचं प्रेमळ रूप अशा आडवाटांवर पाऊल टाकल्यावरच बघायला मिळतं, हेही तितकंच खरं!

 - नचिकेत जोशी

... पुन्हा भेटूच!


('प्रहार' वृत्तपत्रामध्ये मागील वर्षभर लिहिलेल्या 'आडवाटांचे देणे' या स्तंभातील शेवटचा लेख - )
 

दर्‍याखोर्‍यांतली भटकंती हे एक व्यसन आहे. जुने आवडते चित्रपट पुन्हा पुन्हा पाहणे, जुन्या डायर्‍या पुन्हा पुन्हा चाळणे आणि जुने किल्ले पुन्हा पुन्हा भटकणे यामधली मजा काही औरच आहे. गंधाळलेल्या वार्‍याचं, कोसळणार्‍या पावसाचं आणि भिरभिरणार्‍या वयाचं एक बरं असतं - जिथं जातील तिथे चैतन्य फुलवतात.. आणि हे तिघेही हमखास एकत्र भेटण्याची जागा म्हणजे या सह्याद्रीच्या राकट पण राजस अंगाखांद्यावरचे किल्ले! आणि सोबतीला असणारी अत्यंत अभिमानास्पद इतिहासाची अदृश्य सावली!

जुन्या ट्रेकच्या आठवणी जागवताना, 'आपण किती वेळा वाटा चुकलो होतो' हे आठवून आता हसूही येतं आणि उगाच वाटा चुकलो, असंही वाटतं. खरंतर भटकतांना मानसिकतेचा कस पाहणारी, नवीन शिकवणारी अशी ही एक विशिष्ट वेळ असते. ती तेवढ्यापुरती येते आणि निघूनही जाते.

भटकंती करताना वाट चुकल्यामुळे बरेचदा वेळ वाढतो, शक्ती अधिक खर्च होते, प्लॅनिंग कोलमडतं, लवकरात लवकर योग्य वाट न सापडल्यास मनोधैर्यावरही परिणाम होऊ शकतो. कुठल्याही भटकंतीला निघाल्यावर वाटा माहित असणे हे उत्तम प्लॅनिंगचं लक्षण आहे. पण तरीही, वाट चुकण्यातही मजा असते आणि ती आपली आपण शोधण्यात त्याहून अधिक मजा असते. वाटा शोधणे हा भटकंतीचा खराखुरा प्राण आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

भटकंती सुरू केल्यापासून माझं आणि वाट चुकण्याचं एक अतूट नातं जुळलंय. अगदी पहिल्या ट्रेकमध्येही विचित्र प्रकारे वाट चुकल्याचं स्पष्ट आठवतंय. २००० सालच्या एप्रिल महिन्यात राजगडला निघालो होतो. वाजेघर एसटीत बसूनही मित्राच्या सांगण्यावरून मार्गासनी फाट्यानंतरच्या पहिल्या आंब्याजवळ उतरलो आणि तिथून समोर दिसणार्‍या राजगडाकडे चार टेकड्या ओलांडून गेलो होतो. उतरतांनाही, चोर दरवाजातून उतरूनही वाजेघर गावात पोचलो होतो...

एके वर्षी तोरणा ते रायगड भटकंती करत असतांना निवीहून मोहरीकडे जाणारी वाट मध्येच हरवली (म्हणजे आम्ही हरवलो) आणि हारपूडमध्ये शिरण्याऐवजी डोंगरमाथ्यावरच्या धनगरवाडीत पोचलो. मग एक रात्र गोठ्यामध्ये घालवली आणि धनगरबाबांचा उत्तम पाहुणचार घेऊन दुसर्‍या दिवशी मोहरीकडे निघालो.

बागलाण प्रांतातल्या भटकंतीदरम्यानची मुल्हेरगडावरची संध्याकाळ स्वच्छपणे आठवते. मुल्हेर बालेकिल्ल्यावरून मोरागडाकडे जाणारी पायर्‍यांची वाट सापडलीच नाही आणि कातरवेळी, सूर्य जवळजवळ बुडाला असतांना पूर्ण मुल्हेर बालेकिल्ला ओलांडून माचीवरच्या अंधारातून सोमेश्वर मंदिर गाठले होते.

रायगडाचा वाघ दरवाजाचंही असंच! होळीच्या माळावरून निघालं की न चुकता वाघ दरवाजापर्यंत जाऊन पोचलो, असं दरवेळी माझ्यासोबत होत नाही! गडाच्या कुशीत दरीच्या मुखाशी असलेला वाघ दरवाजा हा खरोखर एक चोर दरवाजा असल्याची ग्वाही देतो.

ढाकच्या बहिरीवरून जवळच्या वाटेने सांडशी गावामध्ये उतरण्यासाठी असंच एकदा अर्धा-पाऊण तास खुणेचा आंबा शोधत फिरत होतो. अखेर दिशांचा अंदाज घेऊन, स्टॅमिनाची पुरेशी परीक्षा पाहून झाल्यावर 'त्या' आंब्याने दर्शन दिले आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.

वार्‍यावर स्वार होऊन कुठेही भरकटत जाणार्‍या वयामध्येच डोंगरदर्‍यांत रमायची सवय लागली हे फार बरं झालं असं आता वाटतं! पाठीवर सॅक टाकून एकदा का पाऊलभर आडवाटांमध्ये पाय ठेवला की पुढचं सगळं त्या सह्याद्रीच्या हवाली! कितीही वाट चुकलो, हरवलो, पाणी संपलं तरी "तो" आहे ही सह्याद्रीबद्दलची खात्री उत्तरोत्तर वाढत गेली. अनेक धोपटवाटा हरवत गेल्या, आडवाटा गवसत गेल्या.

प्रिय वाचकहो, हा स्तंभ म्हणजे, गेल्या दहा-अकरा वर्षांत आडवाटांनी दिलेलं हे देणं आपल्यासोबत वाटून घेण्याचा हा एक प्रयत्न होता! कधी वाट चुकल्यामुळे अडचणीत आलो, तर कधी वाट चुकल्यामुळेच धु्क्यातील, पावसातील अनुपम निसर्गाचे साक्षीदार झालो. चुकलेल्या वाटांनी प्रत्येक पावलाला अनुभव दिला, आत्मविश्वास दिला. तो वाचकापर्यंत शेअर करावा एवढाच हेतू होता! यात कसलाही दावा नव्हता, सो कॉल्ड फंडे नव्हते, प्रासंगिक सूचना-सल्ले कदाचित असतीलही पण ते सारे एका भटक्या मित्राचे पक्के सल्ले म्हणूनच स्वीकारले असतील अशी खात्री वाटते! हा स्तंभ सुरू झाल्यापासून अनेक वाचकांनी इमेल, फेसबुकवर प्रतिक्रीया दिल्या, त्यांचे मनापासून आभार! या सह्याद्रीच्या आडवाटांवर कधीतरी नक्की भेटू आणि एकमेकांना मिळालेलं हे "आडवाटांचं देणं" एकमेकांसोबत वाटून घेऊ!
 
तोपर्यंत, शुभास्ते पन्थान: सन्तु |

 - नचिकेत जोशी

(http://www.prahaar.in/madhyantar/madventure/65187.html)

Wednesday, June 27, 2012

... कानावरती!

प्रेम तुझे मग नक्की आहे कोणावरती?
त्याच्यावर की तुझ्या मनातिल प्रेमावरती?

विश्वासाने पाय टाकता खचली धरती
काळ कोसळू आला अवघ्या जन्मावरती

"शंका घेऊ नकोस माझ्या चारित्र्यावर!
डाग नव्हे हा, तीट असे ही ओठावरती!"

केवळ शपथेखातर कायम शांत राहिलो
(तुझी वदंता आली होती कानावरती!)

बघता बघता अनोळखीही झालो आपण
वारा धरुनी शिडे निघाली पाण्यावरती

- नचिकेत जोशी (२२/६/२०१२)

Friday, June 15, 2012

वंचना

येत जा देऊन थोडी कल्पना
सावरावे लागते हल्ली मना!

एकटा सोडून नाही जात मी
एकटी झुरते बिचारी वेदना

मी खुशीने भीकही घेईन पण -
दार थोडेसे तरी तू उघड ना!

ती म्हणे मी आजही आहे तुझी
(मी मुक्याने सोसतो ही वंचना!)

फक्त दु:खांचा जसा मी लाडका
ती सुखावर भाळलेली याचना!

मीच आडोसे तरी कितिदा करू?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!
- नचिकेत जोशी (१५/६/२०१२)

Monday, June 4, 2012

उंबर्‍याबाहेरचा

मी भले आहे कितीही जवळचा
शेवटी मी उंबर्‍याबाहेरचा!

चालताना वाट मागे सोडतो
सोबतीला गंध नेतो कालचा

शेत माझे! कष्ट माझे! पीक पण -
चोरुनी उपभोगतो शेजारचा

रडत असतो मामुली गोष्टीतही!
छंद हा तर पाळण्यापासूनचा!

नेमका गाफील होतो क्षणभरी
डाव मग निसटून गेला हातचा

- नचिकेत जोशी (१२/४/२०१२)