Pages

Friday, December 13, 2013

शेवटी

बोलतो कितीतरी तरी कमीच शेवटी
राहते मनातले खरे मनीच शेवटी

चांगले असूनही इथे न भागते मुळी
पाहिजे इथे इमेज चांगलीच शेवटी

साथ द्यायला कुणीच आपली न धावती
वाटती तरी उगाच आपलीच शेवटी
 
चंद्र भोवती कुठे नकोच वावरायला
स्पेस चांदण्यासही जरा हवीच शेवटी

पाहतो निमूट सर्व जे घडेल ते तसे
लागतात अर्थ सर्व नेहमीच शेवटी

काय माहिती? कुणी असेलही, नसेलही!
आसपास, अंतरात पोकळीच शेवटी

- नचिकेत जोशी (१२/१२/२०१३)

Tuesday, November 12, 2013

अंतरे

नाव नव्हते दिले, प्रेम केले खरे
आठवू लागता लोपले चेहरे

आत डोकावण्या मी उभा राहिलो
आरसे जाहले कावरे-बावरे

झगडुनी शेवटी जीव त्यांनी दिला
सोसण्याऐवजी फार केले बरे

आठवांचा तुझ्या झोत पडला तसे
ह्या मनाचे सुने उजळले कोपरे

कारणे वाढली, अर्थ शब्दाळले
भावनांवर खर्‍या खोल पडले चरे

हेलकावे किती आतल्या आत हे!
मन बिचारे किती शोधते आसरे

ज्या क्षणी सत्य स्वीकारती माणसे
त्याक्षणी काळही मिटवतो अंतरे

नचिकेत जोशी (१३/१/२०१२)
(मायबोली हितगुज दिवाळी अंक २०१३ मध्ये प्रकाशित)

Thursday, November 7, 2013

आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

इच्छा क्षणात सरता, रस्ता भकास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

फुलत्या वयात सारे भलतेच थेट वाटे
कलत्या वयात नुसता अस्वस्थ भास झाला

आली कुठुन जराशी चाहूल वादळाची
गुर्मीत वाहणारा वारा उदास झाला

सार्‍याच जाणिवा त्या आल्या वयात जेव्हा
मग भार यौवनाचा अल्लड मनास झाला

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास झाला

अर्ध्यात सोडलेल्या ओळी मला म्हणाल्या -
अव्यक्त भावनांचा निष्फळ प्रयास झाला

- नचिकेत जोशी (६/११/२०१३)

Friday, October 18, 2013

'संहिता' प्रीमिअर सोहळा

'संहिता'च्या प्रीमिअरला येण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली, चिनूक्स आणि साजिरा दोघांचे मनापासून धन्यवाद.  चित्रपटाबद्दल सर्वांनी भरभरून लिहिलंय. मी थोड्या सवडीने लिहेन. सध्या फक्त फोटो टाकतोय. सगळ्याच माबोकरांना (पौर्णिमा व हर्षल सोडून) पहिल्यांदाच भेटलो. खूप छान वाटलं.





























- नचिकेत जोशी

Wednesday, October 16, 2013

नाही विसरता येत...

नाही विसरता येत इतक्या सहज -
गुंतून राहिलेले श्वास,
अडून राहिलेलं आयुष्य
न मागताही दिलेली स्वाधीनता
आणि बदल्यात मिळालेली अगतिकता

नाही विसरता येत - 
संवाद टिकवण्यावरची भाषणं
अर्धवट सोडलेली संभाषणं,
सोयीस्करपणे बदललेल्या अपेक्षा
बेमालूमपणे झिडकारलेली नाती,
उच्च कळस बघताना खुपणारी
पायातली भुसभुशीत माती
ही संगती, ही विसंगती
ही तटस्थता, ही त्रयस्थता,
ही धुंदी, ही बेपर्वाई
आणि या सर्वांमागे लपवलेली चतुराई...

प्रश्नांच्या भोवर्‍यात प्राण घुसमटतानाही
धडपडत तिथेच घट्टपणे फिरत राहण्याचा हट्ट
आणि कुठल्याशा भव्य, उदात्त स्वप्नाचा हव्यास
मला खेचत नेतोय अनिश्चिततेच्या खोल गर्तेत...

एकटेपणाची सार्वत्रिक खंत आठवून देते
सक्तीने अंधारात बसून बघावी लागलेली रोषणाई
मधूनच बेसावध क्षणी कुणीतरी झगमग आवेशात
अंधारात मारलेला दिव्याचा झोत,
त्यातून आलेलं क्षणिक आंधळेपण
आणि मग
पूर्वीपेक्षा अधिक जवळ करावासा वाटलेला अंधार...

नाही विसरता येत...

- नचिकेत जोशी (१४/१०/२०१३)

Wednesday, October 9, 2013

मांजरसुंभा गड - एक अगदीच short but sweet भटकंती

अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम-उत्तर सीमा सोडल्या, तर बहुतांश जिल्हा सपाटच आहे. पण तरी जिल्ह्यात आडवाटेवर काही परिचित नसलेले डोंगर आहेत. त्यांची उंची इतकी छोटी आहे की, त्यांना डोंगर म्हणणेही धाडसाचेच ठरावे. अशाच एका अपरिचित डोंगर कम किल्ल्याला भेट द्यायचा योग नुकताच आला. सोबतीला होता - 'ट्रेकक्षितीज' संस्थेचा संस्थापक अमित बोरोले व त्याची चारचाकी.

पुण्यातून भल्या पहाटे सहाला निघालो आणि नगर हायवेवर एका ठिकाणी (हट्टाने) मिसळ मागवून तोंडाचा जाळ करून घेतला. कितीतरी महिन्यांनी ट्रेकला निघालो असल्यामुळे सवयी मोडल्याची खात्री पटत चालली होती. अखेर अहमदनगर सोडून औरंगाबादच्या दिशेने जायला लागल्यावर दहा-एक किमीवर वांबोरी फाट्यावरून गाडी डाव्या हाताला आत मारली. मांजरसुंबा गड विचारत विचारत जात होतो, तेवढ्यात गड दिसला.


खूप दिवसात हा प्रवास घडला नाहीये, हे जाणवलंच -


या कमानीपाशी येऊन पोचलो.


पायथ्यापासून गडाचा छोटेखानी आवाका सहज जाणवतो -




पंधरा मिनिटात चढून ऐसपैस अशा मुख्य दरवाजापाशी आलो -




निजामपूर्व काळातील हे बांधकाम असावे (इति अमित) इतकी विस्तृत बांधणी आहे -








गडावर फिरायला फारसे काहीच नाही. गडाचा इतिहास, महत्त्व यांचा शोध सुरू आहे. तो पूर्ण झाला की इथे भर घालेनच. या गडाला स्थानिक लोक दावलमलिक या नावानेही ओळखतात. (गडावर पीरस्थान आहे म्हणून हे नाव).




गडावरील काही अवशेष.




अतिविशाल टाके - (हे पाहून मुल्हेरगडावरील अशाच टाक्याची आठवण ताजी झाली)


गडाच्या एका टोकावरचा हा 'हवामहाल' (हा महालच असावा. कड्याच्या अगदीच टोकाला असल्याने हवामहाल वाटतोय)




गडाच्या पश्चिम दिशेकडे अजून एक दरवाजा आहे.




त्यातून खाली डोकावून पाहिले असता पडक्या पण ठीकठाक पायर्‍या दिसल्या. ट्रेक केल्याचे जराही समाधान वाटत नसल्याने, या पायर्‍यांनी खाली उतरून तेवढेच समाधान मिळवू असा विचार करून खाली उतरू लागलो. थोड्याच वेळात एक पायवाट गडाला चिकटून गेलेली दिसली. त्या वाटेने गेले असता, गडाच्या पोटात एका रांगेत लेणी-टाकी सापडली.






पाणी चवीला उत्तम होते.


सरते शेवटी ती वाट गडाला अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करून जुन्या वाटेला येऊन मिळाली. जेमतेम दीड तासात सर्व भटकंती संपवून गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालीही..


- नचिकेत जोशी

Tuesday, August 27, 2013

... स्वप्न क्षितिजापार आहे

जाणवे आता मला की, स्वप्न क्षितिजापार आहे
भोवती काळोख दिसतो, आतही अंधार आहे

मुखवटे चढवा कितीही, दाखवा शोभा स्वतःची
एकदा नक्कीच ही आरास कोसळणार आहे

आपल्या असण्यात इथल्या फार मोठा फरक आहे - 
तू इथे नसशीलही पण मी इथे असणार आहे

वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही
जीव माझा फिरून येथे नित्य घुटमळणार आहे

मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे

यापुढे कोणासही सर्रास मी दिसणार नाही
शोधण्या येतील जे, त्यांनाच सापडणार आहे

नचिकेत जोशी (२५/८/२०१३)

Monday, August 12, 2013

निमूट माझे जिणे...

(या गझलेची प्रेरणा - सुरेश भटसाहेबांची "निमूट माझे जिणे मला सोसता न आले" ही ओळ)

मनातलेही मनामध्ये ठेवता न आले
निमूट माझे जिणे मला सोसता न आले

सुरेख होत्या छटा तरीही उदासवाण्या!
नभास वेळीच हुंदके रोखता न आले

चिकार केला प्रवास पण ना स्मरे कुणाला!
कुठेच माझे ठसे मला सोडता न आले

म्हणायची ती, "नकोस मागू, कुठून आणू?"
तिच्यात होते, तिला मुळी शोधता न आले

तिला मिळाला हळूच झोका कुठुन तरी, मग -
जमीन सुटली, हवेतही थांबता न आले

कधीच समजून घेत नाहीस ना मला तू?
म्हणा, मलाही कधीच समजावता न आले

तुला हवे जे तसे वागुनी मला बघू दे
मला हवे ते तुला कधी वागता न आले

मनात होत्या गगन भरार्‍या, समुद्र-सफरी
मनास पाऊल एकही टाकता न आले

बसून रात्री दिवसभराचा हिशेब केला
सुटे सुटे सुख खिशातले मोजता न आले

नचिकेत जोशी (२४/५/२०१३)

Thursday, August 8, 2013

तुझ्या मग्न प्रवासाला...

रंग रूप स्थायीभाव
आणि लाघवी स्वभाव
सर्वांनाच मोहविती
तुझे भाव, तुझे नाव

स्तुती कौतुक अफाट
जणू उधाणाची लाट
पदोपदी तुला तुझा
भास होतसे विराट

उंचावली तुझी मान
मन हळूच बेभान
घेता दखल जगाने
तुला खुजे आसमान

मग हवेसे वाटले
सारे कौतुकाचे झेले
क्षणोक्षणी स्वीकारावे
हार तुरे अन् शेले

कुणी नाकारूच नये
कुणी झुगारूच नये
भोवतीच्या प्रत्येकाने
कधी दुर्लक्षूही नये

आदबीनेच वागणे
शालीनता दाखवणे
खरे हेतू सारे सारे
किती खुबीने झाकणे!

सुरू जाहला प्रवास
एका फसव्या वाटेने
नाकारत खाणाखुणा
स्वतःच्याच सोबतीने

कुणी आपले नाहीच
तरी पाय रेटलेस
वेळोवेळी स्वतःचीच
समजूत काढलीस

सखे मागेच राहिले
जुने जाणते चांगले
आळ घातलेस तरी
सारे त्यांचेच चुकले!

तुझ्या मते योग्य तूच
तुझे चुकले नाहीच
कधी प्राक्तन अचूक
कधी हट्ट सहेतुक

क्षणभंगुर हे सुख
चतुराईने जगणे
असे कौतुक शोधत
जागोजाग भटकणे

भीती नकार येण्याची
भीती एकटे होण्याची
मग धडपड सारी
सोबत ती शोधण्याची

वाट अखेर थांबली
हतबल नि हताश
तुझ्या मग्न प्रवासाला
आता मोकळे आकाश

जरी जपलेस फार
जगापासुनी स्वतःला
पण जपले नाहीस
स्वतःपासुनी स्वतःला

- नचिकेत जोशी (१०/६/२०१३)

Saturday, July 13, 2013

सारे जुनेच आहे...

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
नुसताच बहर वरती, खाली जमीन नाही

विस्तारली घराणी, झाली नवीन भरती
कुठलाच देव येथे, आता कुलीन नाही

शिरतात रोज भुरटे, भु़ंगे तरी अजुनही -
बागेतल्या फुलांची कीर्ती मलीन नाही

एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही

 - नचिकेत जोशी (१२/७/२०१३)

Tuesday, June 25, 2013

'फेफे' कवी उर्फ फेसबुक फेमस कवी होताना...

भाग पहिला - 'आत्म'लक्षण

एखादा छानसा फोटो, प्रोफाईल पिक म्हणून लावा!
वार्‍यावर भिरभिरणारी मुलगी (मुलगीच!)
डोंगराच्या कड्यावर लोळणारा मुलगा तिथे दिसायला हवा!
पावसात तरारणारं पान, निळ्या छटांचं आभाळ
नुसतंच एखादं घड्याळ, प्रगल्भ सचिंत काळ
एखादी दीपमाळ, एखादी तलवार
एखादा सूर्यास्त, ढगांची रूपेरी किनार!
अधूनमधून प्रोफाईल पिक बदलत रहा.
तुमची रसिकता सगळ्यांना दाखवत रहा!

*************

भाग दुसरा - 'सामुहिक'लक्षण

आता पुढची गोष्ट म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये शिरा
तुमच्यासाठी तशाही सगळ्याच अभेद्य चिरा
निवडा, त्यातल्या त्यात एखादा गजबजलेला
मुखवटा ओढा जत्रेमधला, खूप काळापासून हरवलेला

इतरांच्या कविता पोस्ट व्हायला सुरूवात झालीये
शब्दांची बासुंदी आटवायला घ्या
प्रतिसादात घालता येईल
इतपत साठवायला घ्या

मराठीत कौतुक करण्यासाठी शब्द कमी नाहीयेत!
'दमदार, लाघवी, आर्त, सशक्त, हृदयस्पर्शी, मोहक शब्दकळा,
सुगंधित, अफ्फाट, अच्चाट, देखणं, जीवघेणी, अवकळा'
असे जन्मात न कळलेले आणि लिहिलेले शब्द........
......... वापरा!
अरे हो... 'अप्रतिम', 'क्लास', 'सुपर्ब' हे राहिलेच की!
'हॅट्स ऑफ', 'दंडवत', 'साष्टांग' हे देखील उरलेच की!
.......हेही वापरा!

'आवडली नाही' हेही आठवणीने लिहा कधीतरी.
रूचिपालटच... पण मुद्दामहून... करा कधीतरी
पण नकारात्मक प्रतिसादही चतुराईने द्या,
नाहीतर लिहिणार्‍याचा इगो दुखावला जायचा!
तुम्हालाही कविता पोस्टायच्या आहेत म्हटलं!
आधीच मक्षिकापात व्हायचा!
आता असा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमा आठवणीने मागा!
मिळेल समोरच्या नजरेत तुम्हाला अगदी हक्काची जागा!
आपलं व्यक्तिमत्त्व सालस, डाऊन टू अर्थ वगैरे वाटतं!
तुमच्या इमेज बिल्डींगला मजबूत स्ट्रक्चर लाभतं!

*************

भाग तिसरा - 'प्रस्थापित'लक्षण

आता लिखाण पोस्ट करा.

गद्य-बिद्य असलं तरी एंटर मारून अलग करा,
अर्थापासून शब्दांना नक्की विलग करा!
(आधुनिक कविता अशीच असते असं ऐकलं आहे तुम्ही!)
विरामचिन्हंही अधून मधून पेरत चला.
(अहो म्हणजे किमान तीन चार डॉट्स देत चला)
गझल-बिझल लिहायची असेल तर मग
सर्वात आधी गुरूचं नाव आठवा!
आणि गझलेपेक्षाही 'गझलियत'चा
जयघोष मुखात बसवा!

'सांभाळून घ्या, नुकत्याच कविता लिहायला लागलोय' हे म्हणाच!
अहो तुमच्या कवितेसाठी एवढं तरी कराच!
तुम्हीच तिला कविता म्हटलं नाही तर
बाकीचे म्हणतील का?
इतकं कमावलेलं पुण्य मग
फळाला कधी येईल का?

प्रतिसादांमध्ये तुमच्या ओळखीचेच सगळे शब्द असतील.
दरवेळी एकदोन नवीनही कळतील!
प्रतिसाद कळो अथवा न कळो, तरी लाईक कराच.
प्रतिसादांचं गवत फोफावताना बघाच!
तुमचं मन तुम्हाला खाईल, पण ती शक्यता कमीच!
एवढी फिल्डींग लावल्यावर कौतुकाची हमीच!
पण जरी नापसंती आलीच, तरी, तिलाही लाईक करा.
तुमचा खिलाडूपणा थोडा सादर करा!
मनात भले कितीही त्यांचा अनुल्लेख करा,
पण आभार मानताना त्यांचा खास उल्लेख करा!
गझल असेल तर तंत्राच्या चुका वगैरे विचारा
काफिया सुचवा एखादा, जसे किनारा, निखारा...

दर दोन प्रतिसादांनंतर तुमचा प्रतिसाद दिसला पाहिजे!
टीआरपीचा जिम्मा हा ज्याचा त्यानेच घेतला पाहिजे
लिखाण नुसतं पोस्ट करून भागणार नाही पुढे!
ग्रुपमध्येही ग्रुप जमवा, भेटी घडवा, गिरवा पुढचे धडे!
'सादरीकरणात ही कविता अजून थेट पोचते'
असं म्हटल्यावर संमेलनामध्ये जागा पक्की होते!

*********

भाग चार - 'विलक्षण'

आता खरं तर विचार करायलाही अवधी नाही
लाटेमध्ये वाहत जाण्याखेरीज कुठे उरलंय काही?
एका फसव्या दिशेचा प्रवास आता सुरू होतो आहे
येणारा प्रत्येक दिवस कवितेपासून तुम्हाला दूर नेतो आहे...
तर ते जाऊ द्या...
आपण बदलू सगळ्याच व्याख्या...
मी तुला लाइक करतो, तू मला कर लाईक
आपण दोघे मिळून मग तिला करू लाईक!
लाँग टर्मचा विचार थोडा केला पाहिजे ना?
एकमेकांसोबत हा करार केला पाहिजे ना?
कवी व्हायचं आहे? मग फेमस होऊ आधी!
कविता जमेल नंतर, 'लाईक' करू आधी!

******

आता ही कविता मी पोस्टेन तेव्हा सगळं लक्षात असू द्या बरं!
वेगळीच कविता आहे, जरा सांभाळून घ्या बरं!

नचिकेत जोशी (१०/६/२०१३)

Wednesday, May 1, 2013

शहर नकोसे झाले!


बंध स्वत:शी जुळता कोणी जवळ नकोसे झाले
इतके आवडले की शेवट शहर नकोसे झाले!

रस्तोरस्ती फुलली होती गर्दी चिरकाळाची
तरी चांगली ओळख होती रस्त्याशी रस्त्याची!
भटकत होतो गर्दीमध्ये एकटाच आनंदे
तर्‍हा वेगळी होती माझी इवल्याशा जगण्याची
जगण्यावरच्या प्रेमापायी मरण नकोसे झाले १

निसटुन जाती थेंब टपोरे अलगद टिपता टिपता
वार्‍यासंगे उडून जाती सुगंध बघता बघता
एक दिलासा हवाहवासा अवचित कुठून आला?
भास वाटला खरा, ओंजळीमध्ये जपता जपता
मोहक, मोघम वाक्यांमधले वचन नकोसे झाले २

वेळ उपाशी अखेर दारी याचक बनुनी आली
भासांमधले हिशेब सारे चुकते करून गेली
खर्चातुनही जमेस उरली निव्वळ काळिजमाया
जगण्यासाठी पुन्हा एकदा कारण देऊन गेली
पाउल निघता थांबवणारे प्रहर नकोसे झाले ३

नचिकेत जोशी (३१/७/२०१२)

Wednesday, April 17, 2013

आजही

नको वाटतो उंबरा आजही
हवासा तरी आसरा आजही

जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही

तुझ्या आठवांचे धुके दाटते
इथे जीव मग घाबरा आजही

कुठे वेस नाहीच गगनास या
अडवतो मला पिंजरा आजही

अशाने नदी पार होणार का?
दिसे कालचा भोवरा आजही

सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!

तुझी मोहमायाच छळते अशी -
तुझा शोधतो चेहरा आजही

नचिकेत जोशी (१७/४/२०१३)

Tuesday, March 26, 2013

कदाचित

मनी तिच्याही भाव कदाचित
तिला पाहिजे नाव कदाचित

ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!

चाल नेमकी अचूक झाली
हरेन आता डाव कदाचित

मिळाले तरी टिकले नाही
अखेर नडली हाव कदाचित

इथेच उरली आहे माती
इथेच होते गाव कदाचित

नचिकेत जोशी (२४/३/२०१३)

Monday, March 11, 2013

तुझ्यामाझ्यातले नाते


सुरू राहो अशी आनंदयात्रा, हात हाती दे
नव्याने भेटतो मजला तुझ्यासोबत निघाल्यावर

**************

तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर

असे जगतो - जणू सोडून द्यावे पान पाण्यावर
दिशांच्या सोबतीने पोचतो भलत्या किनार्‍यावर

कधी निष्पर्ण माळावर कुठुन नकळत झुळुक यावी
तसे आपण अचानक भेटलो ओसाड जगल्यावर

मनाच्या कागदावरती तुझे अस्तित्व जपलेले
तसे राहील का कायम तिथे अक्षर उमटल्यावर?

तुझ्या हसण्यातुनी बरसे मुका पाऊस ओढीने
तरी अतृप्त ओंजळ मी, तृषाही पूर्ण शमल्यावर

अचानक पावले निघती नव्या कुठल्या उमेदीने?
तुझ्यामाझ्या प्रवासाचे पहाटे स्वप्न पडल्यावर!

किती सोसेल ही माती? तिचाही जीव इवलासा!
कुणाशी मोकळे व्हावे तिने आभाळ रुसल्यावर?

बरसण्याची तुझ्या आहे प्रतीक्षा या धरेलाही
सरी येणार केव्हा? तू रित्या मेघांत रमल्यावर!

खुळे आभास जपण्याची कधी थांबेल ही धडपड?
पुन्हा येती मला ऐकू, तुझे आवाज विरल्यावर

कुणासाठी? जगासाठी? तुझ्यासाठी? स्वतःसाठी!!
तुझा हमखास होतो स्पर्श, कायम ओळ लिहिल्यावर!

उन्हाच्या आडवाटेवर तुला चोरून बघणारे
खुळे हे रान ओशाळे, धुके अलगद सरकल्यावर

स्वतःवरची उधारी मी कशीही फेडली असती
इथे जगणेच तारण हे कुणाच्या फक्त असण्यावर!

जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट या गर्दीत शिरल्यावर?

तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया लागले आहे
हवेपासूनही लपवूच! ते बहरून आल्यावर

- नचिकेत जोशी

Wednesday, February 27, 2013

ड्युक्सनोज वरून रॅपलिंग : एक शब्दातीत थ्रिल!

खंडाळ्याशेजारी घाटाखालून वर आकाशात घुसलेला हजारभर फूट सुळका म्हणजेच ड्युक्स नोज. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून, लोहमार्गावरून, अगदी खोपोली स्टेशनवरूनही सहज दिसणारा आणि ओळखू येणारा हा ट्रेकर्स लोकांचा लाडका कडा! गेल्या रविवारी 'ऑफबीटसह्याद्री'तर्फे त्या कड्यावर रॅपलिंग आणि ड्युक्स नोज ते  डचेस नोजपर्यंत व्हॅली क्रॉसिंग चे आयोजन करण्यात आले होते. एकूण रॅपलिंग अंदाजे ३०० फूट (थोडेसे जास्तच) होते. मी आतापर्यंत केलेले हे सर्वाधिक उंचीचे रॅपलिंग! एकाच शब्दात वर्णन करायचे झाल्यास - "फाडू!!!" एवढंच म्हणेन!

त्याची ही काही प्रकाशचित्रे -

मोठा कडा ड्युक्स नोज आणि शेजारचा तुलनेने छोटा डचेस नोज -
(ड्युक वेलिंग्टनच्या नाकासारखा दिसतो म्हणून ड्युक्स नोज हे नाव. डचेस नोजचा उगम माहित नाही.)


कड्याच्या उजव्या किनारीवरून (फोटोत) रॅपलिंगचा रूट होता -


माथ्यावर एक मंदिर आहे. त्या मंदिरालाच अँकर करण्यात आले होते. (३००+ फुटांमुळे रॅपलिंग रोपवर येणारा ग्रॅव्हिटॅशनल फोर्स खूप जास्त असतो) -


टेक्निकल चढाईमधले जिव्हाळ्याचे आणि जिवाभावाचे साथीदार  -


(फक्त) ११ सहभागी असल्यामुळे रॅपलिंग निवांत पार पडले. रॅपलिंगला सुरूवात (अस्मादिक) -








ड्युक्स नोजवर बाहेरच्या बाजूने ओव्हरहँग आहे. पहिल्या तीस एक फुटांपर्यंत पाय कड्याला टेकवता येतात. नंतर कडा आतल्या बाजूला वळतो आणि आपण आधारहीन होतो. पुढचा जवळजवळ दोनशे फुटांचा पॅच ओव्हरहँग आहे. ओव्हरहँगवर फक्त आणि फक्त रोप एवढाच आधार! वार्‍यामुळे किंवा कशामुळेही रोप गरगर फिरतो. हा पॅच खरोखर थरारक आहे.


दुसर्‍या एका पार्टिसिपंटचा हा फोटो. यावरून नेमका अंदाज येईल -


या फोटोमध्ये कड्याच्या जवळजवळ तळाशी उतरून आलेला मुंगीच्या आकाराचा माणूस दिसेल.


हुश्श्श!!! उतरलो एकदाचे!


जेमतेम दहा-बारा मिनिटांची गम्मत! पण एक अत्यंत जब्बर्दस्त अनुभव! खाली उतरलो तेव्हा दोन्ही पंजे आणि फोरआर्म्स बधीर झाले होते. ओव्हरहँगवर तर दोनतीनदा रोप वार्‍याने कड्यापासून उजव्या हाताला हेलकावला, फिरला. त्या सगळ्यात माझ्या स्वतःभोवती दोनतीन प्रदक्षिणा झाल्या. कड्याकडे पाठ आली की मी डोळे मिटून घेतले होते. उघड्या डोळ्यांनी हजार फूट खाली, अधांतरी, हवेत बघण्याची हिंमत होईना! (ट्रेकपासून काही काळ दूर गेल्याचा परिणाम! बाकी काही नाही!)


थरार इथे संपत नाही!!

उतरल्यावर कड्याच्या पोटातून एक अरूंद खाचवाट आहे. त्या वाटेने वळसा घालून वर चढायचे. ही वाट डचेस नोजच्या बाजूने वर येते.




मदतीसाठी ऑर्गनायझर्सनी क्रॅब अडकवायला दोर लावले होतेच -


खूप दिवसांनंतर लाडक्या सह्याद्रीबाबाच्या अंगाखांद्यावर खेळायला मिळालं. दिल खुश हो गया!






- नचिकेत जोशी
(फोटो: नचिकेत जोशी आणि नितीन जाधव)