Pages

Tuesday, February 23, 2016

किती लांबचे रोज घ्यावेत वळसे...

'सुमंदारमाले'तला हा प्रयत्नच, स्वतःला तपासून बघतो जरा!
अशा दीर्घ वृत्तामध्ये व्यक्त होणे, जमावे मला, हेच परमेश्वरा!

**************

किती लांबचे रोज घ्यावेत वळसे...

कधी आठवावे, कधी विस्मरावे, असे हेलकावे - भिती वाटते!
जरी बंद केली कवाडे घराची, झरोक्यातुनी ऊन डोकावते

नको वाटते ही जखम पावसाची, जुन्या वेदना फक्त हिरवाळती
उन्हाच्या झळा आत शिरतात तेव्हा मनाची भुई खोल भेगाळते

मनाचे रकाने भरावेत असले विषय सापडू देत देवा मला
(तिची बातमी वाचती रोज डोळे, छबी मन तिची सारखी छापते!)

कुणी भाळतो क्षणभरी फूल पाहत, खुळे फूलही आत गंधाळते
प्रवासी स्वत:च्याच धुंदीत निघतो, बिचारे मुके फूल कोमेजते

तुझ्या मैफली गाजती रोज आता, शहरही तुला आपलेसे करी
जुने खास कोणी, तुझ्या ओळखीचे, तुला ऐकण्या कान टवकारते

पुन्हा त्याच कविता, पुन्हा तीच हुरहुर, पुन्हा तेच छळणे, स्वतःला स्वतः!
किती लांबचे रोज घ्यावेत वळसे, पुन्हा वाट तेथेच रेंगाळते

'नको दु:ख वाटून घेऊस काही, मुक्यानेच हे भोग भोगायचे'
दया फार माझीच येता मला मग, कुणी आतले छान समजावते!

नचिकेत जोशी (३१/५/२०१३)

Friday, February 12, 2016

दुबळेपण

मी चाचपडत असतो
आजूबाजूचा उजेड अधीरतेने.
टिपू पाहतो माझ्या बोटांनी
त्याचा कण अन् कण
पण तो हाती येतच नाही कधी,
फक्त व्यापून असतो माझा भवताल
त्याच्या उजळपणाने.
मी स्वत:भोवती फिरतो,
उजेड कवेत घेऊ पाहतो
तर त्याचं नितळ तेजोमय अस्तित्त्व
जाऊ देतं मला आरपार
पण हाती गवसतच नाही काही.

मी चिडतो, चरफडतो, असहाय होऊ लागतो
तेवढ्यात उजेडालाच येऊ लागतो एक सुगंध -
अस्सल, शुद्ध आणि दर्पहीन.
माझ्या श्वासात भिनू लागतो त्याचा परिमळ
इतका, की हलके हलके
माझे श्वासही सुगंधी
आजूबाजूला भासही सुगंधी.
आणि मनाला ध्यासही सुगंधीच!

उजेड आणि सुगंध - एकजीव होतात
दोघेही मनभर बागडतात,
पण माझ्या स्पर्शात गवसत नाहीत ,
माझ्या ओंजळीत मावत नाहीत.
मी थकतो, निराश होतो,
असाह्यपणे माझं दुबळेपण कबूल करतो.

मग मला एकदम तू आठवतेस.
या उजेडासारखीच तू, या सुगंधासारखीच तू,
हा उजेडही तुझाच, हा सुगंधही तुझाच.

- नचिकेत जोशी (१०/२/२०१६)

Wednesday, February 3, 2016

धबधबा

जेमतेम चार महिने वाहणारा तो झरा
हल्ली अविरत कोसळतोय, अखंड धारांनी
भयचकित करणाऱ्या वेगात, आवेशात,
धबधब्याच्या रूपात.

कुणालाही सहज आकर्षून घेण्याची क्षमता
अन् वारंवार खेचून घेण्याचं वशीकरण तंत्र
असं बरंच काही आहे त्याच्यात,
ज्याच्या ओढीनं मावळतात विरोध,
आपसुक विरून जातात मनसुबे
स्वखुशीनं अलगद चार-दोन तुषार झेलायचे.
चकाकत्या कातळावर जमत जातं शेवाळ अन्
होत जातात ते निसरडे.
तरीही हवीहवीशी वाटत राहते वृष्टी
डोळ्यातही शिरतो धबधबा,
आणि फिक्कट होत जाते अवघी सृष्टी...

आमुलाग्र बदलत जातो
धबधब्यातून बाहेर येणारा प्रत्येक जण.
देहावरून ओसंडणारे समाधानाचे, कौतुकाचे टपोरे थेंब
धबधब्याच्या जलझोताने भारून गेलेली पंचेंद्रिये
पुन्हापुन्हा हवंहवंसं सारं!
सहाव्या इंद्रियावर मात्र गारठ्याने येते बधीरता
पार हाडापर्यंत पोचते शहार्‍याची ओल
लकवा भरायला लागतो अवयवांना
अन्
देहाबरोबरच मनालाही
दिशाहीन थकवा येऊ लागतो.....
तरीही
विरह अनावर होतो, मग

सगळेच पुन्हा निघतात - धबधब्याकडे!
आणि
नखशिखांत आसक्त भिजलो तरी
आतून विरक्त कोरडाच राहण्याचे
बळ मिळवायला
मी निघतो धबधब्यापासून दूर...

- नचिकेत जोशी (१५/१२/२०१३)

[या रचनेच्या फिनिशिंग टच साठी क्रांतीताईंचे (क्रांती साडेकर) आभार..]