Pages

Wednesday, January 10, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग ३

महाबळेश्वरात यायला आणि महाबळेश्वरातून जायला संध्याकाळी सातनंतर एसटी नाही. पसरणी आणि आंबेनळी-पोलादपूर घाटातून रात्री एसटी जात नाहीत. साडेआठला आर्थरसीटला पोचल्यामुळे महाबळेश्वरातून मेटतळ्यात जायचे सर्व शासकीय वाहनांचे पर्याय बंद झाले होते. मग टेंपोवाल्यालाच मेटतळ्यात सोडायला विनवलं. तोही तयार झाला, हे नशिब. जाता जाता सचिनला महाबळेश्वर एसटी स्टँडला सोडलं. त्याला दुसर्‍या दिवशी एका फ्यामिली फंक्शनला जायचं होतं. त्याला बरेचदा सांगून पाहिलं, की 'सांग एसटी नाही मिळणार एवढ्या रात्री आणि म्हणून नाही येवू शकणार. किंवा फोन बंद करून टाक' वगैरे वगैरे. पण तो बधला नाही. (पुढच्या ट्रेकचं भविष्य आपल्याच कर्माने संकटात टाकायला कुठलाही कुटुंबधारी ट्रेकर तयार होत नाही, ह्याचं हे उदाहरण!) महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर राहू देत नाहीत, हे त्याच्यामुळे आम्हाला कळलं. रात्री त्याला म्हणे पोलिसांनी स्टँडवर मुक्काम करू दिला नाही. मग त्याने मुकाट्याने हॉटेलमध्ये मुक्काम केला. (पण पुण्याकडे जायचा निश्चय अजिबात बदलला नाही!)

मेटतळ्यामध्ये पोचायला साडेनऊ झाले. तिथल्या एका हॉटेलमध्ये जेवणाचं आधीच सांगून ठेवलं होतं. तिथेच राहण्याचीही सोय झाली. जेवताना 'उद्याचा प्लॅन' ह्यावर थकलेल्या मेंदूंची चर्चा झाली. विरागच्या MI2 Wrist Band नुसार ढवळे गाव ते आर्थरसीट पॉईंट ह्यात आज आमची ३९००० पावलं चाल झाली होती. अंतरात सांगायचं झालं तर २४.८८ किमी एवढं चालून आलो होतो. (म्हणजे ढवळे गाव ते आर्थरसीट हे २४.८८ किमी आहे, असं नसून, जेवढी पावलं आम्ही चाललो ते सगळं मिळून तेवढे किमी भरलं. ह्यात चंद्रगड चढाई-उतराईसुद्धा आली.) एका जहाल गटाचं म्हणणं होतं, की 'काही रडतोंडी नको आणि दाभिळ नको. हवंतर महाबळेश्वरात फिरू आणि संध्याकाळच्या एसटीसाठी डायरेक्ट महाड गाठू' (रविवारी संध्याकाळची महाड-पुणे आणि महाड-मुंबई एसटी रिझर्व्हेशन्स झालेली होती). तर दुसरा गट मवाळ होता. त्याचं म्हणणं होतं, 'फक्त रडतोंडी घाट करू आणि वाडा कुंभरोशीतून पोलादपूर आणि मग महाड गाठू. दाभिळ स्किप करू'. मी आणि आणखी एक-दोघे तिसर्‍या गटात होतो. 'पूर्ण ट्रेक ठरल्याप्रमाणेच करायचा' हा आमचा हेका. वास्तविक, मी इतका दमलेलो होतो, की उद्या सकाळी किती वाजता उठेन ह्याचीही मला कल्पना नव्हती. पण हातातोंडाशी आलेला जबरदस्त ट्रेक अर्ध्यावर सोडायची मनाची तयारी नव्हती.

त्या रात्रीच्या झोपेने खरोख्खर किमया केली. सकाळी उठलो तेव्हा बरंच फ्रेश वाटत होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी नाष्ट्याला जमलो तेव्हा तीनही गटांचं प्लॅनमिलन झालं होतं. 'रडतोंडी आणि दाभिळ दोन्ही वाटा करायच्या'.  विरागने काही जणांकडून स्ट्रेचेस करून घेतले. बाकीच्यांनी लांबूनच हात (स्ट्रेच करून) जोडले. मला ह्या शरीर विलक्षण लवचिक असणार्‍या लोकांचं कौतुकच वाटतं. माझे तर दोन्ही हात - एक मानेवरून आणि दुसरा कमरेवरून असे पाठीवर नेले तरी एकमेकांना भेटत नाहीत. ह्या 'स्ट्रेचर' लोकांचे तर सगळे अवयव त्यांच्या मनानुसार वळतात, वाकतात आणि जुळतातसुद्धा! (मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे - समर्थ रामदास)

मेटतळे गावातूनच रडतोंडी घाट सुरू होतो असं ऐकलं/वाचलं होतं. महाबळेश्वर-पोलादपूर हायवेच्या उजव्या बाजूला मेटतळे गाव आहे आणि डाव्या बाजूला दरी. (जिथे दरी नाही, तिथे गावातली घरं-मंदिरंही आहेत) तर अशा मेटतळे गावातून घाट सुरू होतो म्हणजे नक्की कुठून हे कळेना. ओंकारच्या (उर्फ आदरणीय सह्याद्रीगूगल) मते 'समजा मेटतळे नावाचं एखादं घर असेल, तर त्याच्या एखाद्या दरवाजातून घाट सुरू होतो' असं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर, काल चिकार चाल झाली होती, आणि आजही नक्की किती उतरून जायचंय हे माहित नव्हतं. पुन्हा पारगाव ते वाडा कुंभरोशी ह्या दहा-बारा किमी अंतरासाठी गाडी मिळालीच नाही, तर ती चाल नक्की होती. म्हणून सुरुवातीलाच वाट चुकायला नको ह्या सद्हेतूने हॉटेलवाल्याकडे चौकशी केली - 'रडतोंडी घाटाची सुरूवात कुठून आहे?'. त्याला हे असं काही घाटाचं नाव आहे हेच माहित नव्हतं! मग 'शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ज्या वाटेने पारमध्ये उतरवलं ती वाट दाखवा' असं सांगितलं. त्याला फक्त 'पार' कळलं आणि त्याने त्याच्या हॉटेलमधल्या एकाला आम्हाला वाट दाखवायला पाठवलं.

मेटतळे गाव संपल्यानंतरच्या (बहुतेक) पहिल्याच वळणावर महाबळेश्वर-पोलादपूर घाटरस्त्याची संरक्षक भिंत फोडलेली आहे. हीच ती इतिहासप्रसिद्ध रडतोंडी घाटाची सध्याच्या काळातली सुरूवात. आमच्या वाटाड्याला आम्ही पुन्हा पुन्हा विचारत होतो की 'हीच बरोबर वाट आहे ना?' त्यावर त्याने दोन-तीन मिनिटे काहीतरी संवाद केला. त्यावरून आम्हाला एवढंच कळलं, की तो एक 'शिवभक्त मावळा' आहे. अखेर आमच्यातही मतभेद व्हायला लागले. अनिरुद्ध तर समोर पायवाटांमधल्या हायवेसारख्या दिसणार्‍या प्रशस्त वाटेने चालायलाही लागला. ती वाट खालीच चालली होती म्हणजे कुठेतरी नक्की पोचली असती. मला मात्र रडतोंडी घाटानेच उतरायचे होते. म्हणून मी रडतोंडी घाटाची खात्री झाल्याशिवाय एक पाऊलही उतरायला तयार नव्हतो. जर अर्ध्या वाटेवर गेल्यावर समजलं असतं की हा रडतोंडी घाट नाहीच, तर केवढी पंचाईत झाली असती? (मग ज्या वाटेने आम्ही गेलो तिलाच रडतोंडी घाट म्हणून ब्लॉगमध्ये लिहावं लागलं असतं, ते वेगळंच!) त्या वाटाड्याला एवढंच माहित होतं की 'ही वाट घोघलवाडीला जाते. थोडं उतरून गेल्यावर मध्येच एक वाट फुटते - ती दुधोशीला जाते. तुम्ही ह्याच वाटेने जावा.' अखेर त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला निरोप दिला आणि त्याच वाटेने निघालो. वाटेत एक गावकरी भेटला. त्यानेही वाटाड्याचीच माहिती दिली. पण त्याच्याकडून आणखी एक माहिती मिळाली की पारसोंड गावात अकरा वाजता एसटी येते. हे तर फारच बरं झालं. कारण एसटीमुळे आमचा पारसोंड (उर्फ पार) ते वाडा कुंभरोशी टप्पा पार पडणार होता. एरवी हे अंतर डांबरी रस्त्याने चालावे लागले असते.

रडतोंडी घाट मात्र अप्रतिम आहे. दोन्ही बाजूला दगडी कुंपण (आता ढासळलं आहे, पण तरी ओळखू येईल इतपत आहे), पायर्‍या आणि छान वळणं घेत जाणारा प्रशस्त घाट. ह्याच वाटेने अफझलखानाला आणि त्याच्या सैन्याला महाराजांनी पारगावापर्यंत आणलं होतं. काहींच्या मते हा घाट थेट महाबळेश्वरातून सुरू होतो. बाँबे पॉईंटकडे जाणार्‍या वाटेपाशी मूळ सुरूवात आहे. हे खरेही असावे. कारण, वाईतून डोंगर चढून महाबळेश्वरला खान आला. पारकडे खाली उतरायची सुरूवात महाबळेश्वरातूनच होणे हे पटण्यासारखेच आहे. पण, तिथून सुरू होणारी वाट मेटतळ्यात हायवेला मिळते आणि पुन्हा डोंगरात उतरते. म्हणून आम्ही मेटतळ्यातून उतरायचं ठरवलं. हा घाट खास खानासाठी महाराजांनी बांधला. आता बराच सोपा वाटत असला तरी त्या काळात तो भयानकच होता. महाबळेश्वर खोर्‍यातली त्यातल्या त्यात बरी दिसणारी एक वाट म्हणजे हा घाट असं म्हणायला हरकत नाही. शेवटच्या टप्प्यात झाडी आहे. अगदी पूर्ण सावली! झाडांझाडांवर दिशादर्शक खुणा म्हणून हिरव्या/भगव्या रिबिनी लावलेल्या आहेत. 'जावळीची आल्हाददायक जंगलशोभा अनुभवायला खानसाहेबांनी सैन्यासह यावे' हा आग्रह खानापाशी महाराजांच्या वकिलांनी धरला होता. त्यामागचा हेतू वेगळा असला, तरी 'आल्हाददायक जंगलशोभा' मात्र ह्या घाटात आहेच, ह्यात शंका नाही.

तो घाट अवघ्या चाळीस मिनिटात उतरून घोघलवाडीत आलो. तिथून डांबरी रस्त्याने कोयनेवरचा शिवकालीन पूल ओलांडून पारगावात पोचलो. रडतोंडी घाटाने उतरलेल्या अफझलखानाला पारगावात जाण्यासाठी वाटेतली कोयना नदी ओलांडता यावी म्हणून कोयनेवरचा तो पूल महाराजांनीच अफझलखानासाठी बांधला असं म्हणतात. (अफझलखानाची भेट आणि एकूणच लढाई हे शिवरायांच्या युद्धतंत्राचा आणि नियोजनाचा एक मास्टरपीस आहे, हे जाता जाता लिहून ठेवतो.) पारगावात रामवरदायिनीचं दर्शन घेऊन एसटीने वाडा कुंभरोशीला उतरलो. तिथून टेंपोने दाभिळ टोक. दाभिळ टोकापासून जावळी खोरं, आर्थरसीट, महाबळेश्वर हा सगळा आसमंत सुरेख दिसतो. खाली लहुळसे गाव दिसतं (आम्ही त्याला दाभिळ समजत होतो). चंद्रराव मोर्‍यांवर हल्ला करण्यासाठी महाराज ज्या वाटेने जावळीत उतरले ती निसणीची वाट तसंच जावळीचं खोरं हेही दिसतं. आर्थरसीट पॉईंट दिसतो. चंद्रगड कुठे असेल, ह्याचा अंदाज करता येतो.

दाभिळ गावात उतरणे हा आमच्या ट्रेकचा शेवटचा टप्पा होता. दाभिळ टोकाखाली दाभिळ गाव आहे. ह्या संपूर्ण वाटेवर पायर्‍या आहेत. पायर्‍या सुस्थितीत नाहीयेत, पण जुन्या काळी ही एक प्रचलित वाट होती हे लगेच कळतं. आजही दाभिळ गावातून डांबरी रस्त्याहूनही कमी वेळात महाबळेश्वरकडे येणारी हीच एक वाट आहे. आम्हाला दाभिळ टोक ते दाभिळ गाव ह्यासाठी अर्धा तास (गावकर्‍यांच्या चालीने २० मिनिटे) पुरतील असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात एका सपाटीवरून ही वाट डावीकडे वळते आणि मग अगदीच संथ उतारांनी, लांबच्या लांब वळसे मारत (एकदाची) दाभिळमध्ये उतरते. ही वाट उतरायला आम्हाला जवळजवळ एक तास लागला. (आदल्या दिवशीच्या थोडाफार थकव्याचा परिणाम असेलही)

दाभिळमध्ये पोचलो तेव्हा एक वाजला होता. दाभिळहून चार वाजता पोलादपूर एसटी होती. एवढा वेळ वाट पाहण्यापेक्षा एक जीप ठरवून कापडा गाठलं. (पोलादपूर-महाबळेश्वर हायवेवरचं कापडा हे गाव). तिथून टमटमने पोलादपूरला पोचलो. चौकातल्याच हॉटेलमध्ये सामिष-निरामिष जेवणाची ऑर्डर दिली. पोलादपूरच्या त्या हॉटेलात सुरमई थाळी ३०० रुपयांना होती. (लोक शहर महागडी असतात म्हणून उगाच शहरांना नावं ठेवतात). बिल आल्यावर ही गोष्ट कळल्यामुळे नाईलाज झाला. महाडमध्ये पाच वाजताच पोचलो. साडेसहाच्या एसटीला तुडुंब गर्दी होती. पुण्यात पोचायला रात्रीचे बारा वाजले.

ढवळे ते आर्थर ते दाभिळ (मार्गे चंद्रगड, रडतोंडी घाट) हा 'सुईदोरा ट्रेक' अशा प्रकारे संपला. मला 'सुईदोरा ट्रेक'चे दोन अर्थ वाटायचे. पहिला, ज्या ट्रेकला सुईदोर्‍यापासून सगळं न्यावं लागतं. आणि दुसरा - अवघड ट्रेकमध्ये भीतीने किंवा चढाई-उतराईमध्ये 'फाटलेली' शिवण्यासाठी सुईदोरा न्यावा लागतो असा ट्रेक म्हणजे सुईदोरा ट्रेक. खरा अर्थ 'सुईतून दोरा ओवताना जसा यू-टर्न मारून दोरा पुन्हा मूळ दिशेने येतो, तशा प्रकारचा मार्ग असलेला ट्रेक' हा आहे. आम्ही ढवळ्यातून (कोकणातून सुरू करून आर्थरसीटपर्यंत जाऊन पुन्हा दुसर्‍या मार्गाने कोकणात उतरलो होतो).

एक विलक्षण ट्रेक संपला. मागे उरल्या त्या आठवणी.  काही वर्षांनी मागचं आठवताना हे उद्योग नक्की आठवावेत, ह्यासाठीच लिहिण्याचा हट्ट. खरं सांगायचं तर आम्हाला वेळेची बंधनं होती (स्पेशली ढवळे-आर्थरसीट ट्रेकसाठी) म्हणून आम्ही जरा काटेकोरपणे वागलो. अन्यथा वाटा चुकाव्यात आणि आपलं आपण शोधत कुठेतरी पोचावं, इतका सुंदर हा जावळी प्रदेश आहे. इथला सह्याद्री एक वेगळीच घनदाट माया करतो. इथे पावलापावलावर सावली आहे. रानाचं भय आहेच पण आपली पावलं जर मुघली आणि आदिलशाही मनसुब्याची नसतील, तर आपल्याला भ्यायचं कारण नाही. पाठपिशवी घ्यायची, मनात उत्साह आणि छातीत इथला भर्राट वारा भरायचा आणि निघायचं - पुढचं सगळं सह्याद्रीबाबाच्या भरोशावर सोडायचं!

************

एकाही फोटोशिवाय नुसत्या शब्दांतून वर्णन केलेलं एवढं सगळं वाचायचं, आणि समजून घ्यायचं ह्यासाठी तिसरा डोळा असावा लागतो. प्रिय वाचकहो, तो तुम्हाला आहे ही माझी खात्री झालेली आहे. ह्या चिकाटीला पुन्हापुन्हा सलाम. हा ट्रेक आयोजित केल्याबद्दल, आणि त्यासाठी घेतलेल्या आवश्यक मेहनतीबद्दल नरेशकाका उर्फ गिरी ह्यांनाही सलाम. (पुढचा ट्रेक लवकर ठरवा ही विनंती).

तर दोस्तहो, भेटूच, पुन्हा असंच कुठेतरी, केव्हातरी, कुठल्यातरी आडवाटेवर.
शुभास्ते पन्थानः सन्तु |

(पुढचा भाग शेवटचा: फक्त फोटो)
- नचिकेत जोशी

11 comments:

Dheeraj said...

भन्नाट लिहिलं आहेस नची...ट्रेकच्या सगळ्या आठवणी जाग्या केल्यास...घुमटी ला मुक्काम करायचा का पुढे जायचं आणि रात्री जेवताना उद्या च्या वाटा करायच्या की नाही यावरच डिस्कशन आठवलं तर अत्ता पण हसू येतं.
परत एकदा, जबरी झालाय हा ब्लॉग.

हेमंत पोखरणकर said...

भन्नाट लेख रे!फुल मुडमधे लिहिलंयस.. असेच ट्रेक करत रहा म्हणजे आम्हांला असंच वाचायला मिळेल!!

उनाड भटकंती said...

जबराट मजा आली. शेवट अप्रतिम झालाय.

Sidhu Patil said...

जे काही लिहिलंयस तोड नाही...
ज ब र द स्त ...

पुढचा ट्रेक तुझ्यासोबत करायची इचछा आहे. पटकन एखादा प्लॅन कर..

prash21 said...

माझं ब्लॉग लिहीणं फार अगोदर बंद झालं होतं...त्यात इतरांचे ब्लॉग वाचणंही बंद होतं...ढवळे, बहिरीची घुमटी, आर्थरसीट हे मथळ्यातले की वर्ल्डस्‌ खास आर्कषक...
मला त्यावेळी लिहायला जमलं नाही, म्हटलं आपल्या एका अत्यंत आवडत्या ट्रेकची माहिती वाचुन बघावी...खरोखरच खुप छान झालेत...तीनही भाग एक टाकी वाचून काढले...उत्तम शैली...असेच लिहीत रहा! पुढील ट्रेकसाठी आणि त्यावरच्या ब्लॉगसाठी अनेक शुभेच्छा!

Bhatkantiunlimited said...

भन्नाट , याशिवाय दुसरा शब्द नाही आठवत...🙏

Neelima G said...

भन्नाट मज्जा आली हा ट्रेक नुसता वाचून.. करून मिळालेली कृतार्थता तर काय विलक्षण असेल !

sanjaa said...

खरंच हा सुई दोरा ट्रेक होता..!
मस्त ब्लॉग.

Shraddha Mehta said...

जबरदस्त ट्रेक चे जबरदस्त वर्णन. सगळ्या अर्थानी सुईदोरा ट्रेक आहे हा.

नचिकेत जोशी said...

Thank you all my readers :)

मिलिंद कल्पना राजाराम धनावडे. said...

खूप छान लिहिता तुम्ही नचिकेत...म्हातारे झाल्यावर जेव्हा हात पाय चालायचे थांबतील...तेव्हा ह्याच आठवणी सोबत करतील... असेच लिहीत राहा