Pages

Monday, January 20, 2025

मागे वळून पाहताना - भाग २ : NJ Training ची सहा वर्षे

NJ Training उर्फ स्वत:चं काही चालू केल्याला १ सप्टेंबर २०२४ ला सहा वर्षे झाली. त्यानिमित्ताने एकूणच माझ्या ट्रेनिंग करिअरचा मीच घेतलेला हा धांडोळा.

*****
आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की निर्णय घ्यावाच लागतो. परिस्थितीचा रेटाच इतका जबरदस्त असतो की आवड, हिंमत, इच्छा ह्यांपैकी कशाचीही गरज उरत नाही – निर्णय हा घ्यावाच लागतो. माझ्या बाबतीतही असंच झालं.

त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच होती की आमच्या दोघांकडे आपापल्या क्षेत्रांतला अनुभव होता आणि थोडीफार saving असल्यामुळे हाताशी काही वेळ होता. अर्थात सप्टेंबर २०१८ पासून आजवर एकही महिना बिनकामाचा गेला नाही (कोविडचे २ महिने सोडून), ही गोष्ट वेगळी.

Freelancing ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नव्हती. सारंगच्या जन्माआधीचं एक वर्ष मी freelancing करून पाहिलं होतं. पण त्यावेळी काही ते नीट फलदायी झालं नव्हतं. पण ‘आपण इमानदारीने मेहनत करूनही केवळ इतरांनी न केलेल्या कामामुळे कंपनीला फायदा झाला नाही की आपलीही पगारवाढ बोंबलते’ ह्या टिपिकल corporate रडारडीला एकूणच कंटाळलो होतो. ‘मला पैसे मिळण्याचं आणि न मिळण्याचंही कारण माझाच performance असायला हवा – इतर कुणाचा नव्हे’ अशी माझी धारणा झाली होती आणि ’त्यामुळे freelancing च्या दुसऱ्या इंनिंगसाठी मनाची तयारी झालेली होती. १ सप्टेंबर २०१८ च्या सकाळी ‘चला आता काम शोधायला हवं’ असं वाटण्यापासून हा लेख लिहीत असताना ‘आता कायमचं freelancingच करायचं’ इथपर्यंत झालेला बदल हा केवळ विचारातला बदल नसून एकूण व्यक्तिमत्त्वातला बदल आहे हे नक्की.

माझं काम मुख्यत्वे कॉलेजमध्ये असतं. इंजिनीअरिंग, MCA, MBA कॉलेजेसच्या मुलांना प्लेसमेंटसाठी aptitude training देणे हे मुख्य काम. मग ते कधीकधी NJ Training ला थेट मिळालेलं असतं तर कधी इतर institute कडून मी फक्त सेशन घेण्यापुरतं जातो. ह्याव्यतिरिक्त Content/Courseware Development, Testsसाठी प्रश्न तयार करून देणं हीसुद्धा कामं असतात.

२०१८ चं उरलेलं वर्षं तर असं-तसंच गेलं. Freelancing मध्ये काम हातात असणं महत्त्वाचं एवढंच कळलं होतं त्यामुळे मिळेल ती ट्रेनिंग घेत गेलो. परिणामी काही ठिकाणांहून पेमेंटमध्ये गडबड झाली – एकतर बुडाली किंवा मिळवताना खूप मनस्ताप झाला. २०१९ तुलनेने अधिक बरं गेलं. खूप प्रवास झाला, थोडी स्थिरता यायला लागली. ‘आता हेच कायम करत राहू, मार्केटिंगसाठी थोडं बजेट काढून ठेवू’ अशा विचारांपर्यंत येत होतो तोच कोविडचा मोठा फटका बसला. पण त्याचाही एक मोठा फायदा असा झाला की माझी स्वत:ची वेबसाईट सुरू झाली. कोविडच्या काळात रोज तास-दोन तास धडपड करून, नेटवर शोधाशोध करून मीच वेबसाईट बनवली. लोगो पद्मजाने करून दिला. आणि १३ जून २०२० ह्या दिवशी nachiketjoshi.in ही वेबसाईट सुरू झाली. त्याच्याच आसपास online training सुरू झाली (करावीच लागली). ऑनलाइन ट्रेनिंगचे फीडबॅक उत्साह वाढवणारे होते. ‘सर, तुमच्या सेशनमध्ये insta-fb open करायची इच्छाही होत नाही’ हा फीडबॅक जग जिंकल्याचं फीलिंग देणारा होता. प्रामाणिकपणे सांगायचं तर, कोविड आला म्हणून वेबसाईट आणि ‘आपण ऑनलाइन ट्रेनिंगही तितक्याच प्रभावीपणे घेऊ शकतो’ ही खात्री ह्या दोन गोष्टी होऊ शकल्या.

कोविडच्या लॉकडाऊनमध्ये माझ्या स्वत:च्या online batches सुरू केल्या होत्या. ज्यांनी कोर्स जॉइन केला, त्यांना ते ट्रेनिंग आवडलंच. पण त्या batchesला म्हणाव्या तितक्या enrolments मिळाल्या नाहीत. आत्तापर्यंत सात-आठ batches घेतल्या पण admissions कायम अपेक्षेपेक्षा कमी (बहुतेकवेळा एक अंकी) झाल्या. त्यानिमित्ताने सुरुवातीला instagram आणि फेसबुकवर जाहिराती पोस्ट करून पाहिल्या. पण त्यातून काहीच फायदा झाला नाही असं वाटतं. नंतर नंतर तो नाद सोडून दिला. इतकंच नाही, तर आता batches ही कमीत कमी १० admissions असतील तरच घ्यायच्या असं ठरवलं आहे. पण ह्या माझ्या batches चालायला हव्या होत्या असं आजही वाटतं खरं. मी मुलांपर्यंत पोचायला कमी पडलो हेच सत्य असणार.

२०२० संपताना एक जुनी इच्छा डोकं वर काढायला लागली. मी freelancing सुरू केल्यापासूनच असं वाटायचं की - मुलांना प्रॅक्टिस साठी भरपूर मटेरियल देता यावं आणि त्यांच्या भरपूर tests घेता याव्यात. प्रिंट्स काढून मटेरियल देणं हे खूप खर्चीक आणि ओझ्याचं काम आहे त्यामुळे त्याला मर्यादा येतात. दीर्घ पल्ल्याचा विचार केला तर आपली स्वत:ची Questions Bank  हवी. ही इच्छा पूर्ण करायची असेल तर एकच मार्ग होता – इंटरनेटवर वेबसाईटच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देणे. २०२१च्या मार्चमध्ये माझी स्वत:ची LMS (Learning Management System) सुरू झाली आणि ही इच्छा प्रत्यक्षात उतरली. यवतमाळ जिल्ह्यातील किनवट ह्या आदिवासीबहुल भागातल्या प्रोफेशनल मुलांनी ती तयार केली आहे – हे विशेष. ती बनवणाऱ्या कंपनीचं नाव सेटट्राईब. गेल्या वर्षी त्यांना महाराष्ट्र सरकारचा स्टार्टअपसाठीचा पुरस्कारही मिळाला आहे.

ह्या प्रवासातली एक विशेष उल्लेखनीय आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ‘आपल्या placement प्रोसेसमधल्या aptitude roundसाठी test design करून देण्यासाठी’ काही कॉर्पोरेट कंपन्यांनी केलेली विचारणा. नंतर त्यांना प्रत्यक्ष test design करून दिल्या आणि कॉलेज आणि कॉर्पोरेट ह्यांना खऱ्या अर्थाने जोडणाऱ्या ब्रिजच्या भूमिकेत गेलो. त्यानिमित्ताने कंपन्या aptitude round मध्ये candidates कडून कशाची अपेक्षा ठेवतात, ह्या राऊंडमध्ये काय टेस्ट करतात हे नक्की समजलं.

ह्या काळात आणखी एका गोष्टीवर विश्वास बसत गेला. ती म्हणजे आपण आपलं हातात आलेलं काम नीट करायचं, पुढील कामाची काळजी युनिवर्सकडे सोपवायची. ‘युनिव्हर्स’ नावाची एक जागा अशी आहे जिथे जे मागाल ते मिळतं. आणि खरोखर ह्याचे अनेक अनुभव - दोन्ही अर्थांनी ह्या पांच वर्षांत घेतलेत. ध्यानीमनी नसताना ट्रेनिंगची संधी मिळाली आणि मनात इच्छा असूनही ट्रेनिंग मिळाली नाहीत हे ते दोन अर्थ. एक दोन ट्रेनिंग अशी होती की ती मला करायचीच होती पण काही कारणांनी ती मला मिळाली नाहीत आणि नंतर बाहेरून काही असं कळलं की ‘ती आपल्याला नाही मिळाली तेच बरं झालं’ असं वाटलं. तेव्हापासून मला अमुक एकच दे असं न मागता युनिवर्सकडे ‘माझ्यासाठी जे उत्तम असेल ते दे’ असं मागणं सुरू झालं.

त्यामुळे सुरुवातीला ‘पुढच्या महिन्यात काम मिळेल की नाही’ ही धाकधूक सतत असायची ती आता कमी झाली आहे. कारण आपली सोय ‘तो’ करणार आहे ही नकळत खात्री झाली आहे. एकतर जवळजवळ सर्व ट्रेनिंग ही मागील फीडबॅक वरुन मिळत गेली. आपलं आधीचं ट्रेनिंग आवडलं म्हणून कधी मुलांनी तर कधी कॉलेजनेच (अगदी कॉलेज डायरेक्टरने सुद्धा) दुसऱ्या client हा माझं ट्रेनिंग सुचवलं – बहुतेकवेळी हेच झालं आहे.

सुरुवातीला Fb-insta वर जाहिरातीचा प्रयोग करून पाहिला पण त्यात काहीच यश मिळालं नाही. ह्याचं उत्तर बहुधा माझ्या स्वभावात असावं. स्वत:ची जाहिरात स्वत: करताना ‘आपण किती भारी’ हे स्वत:च्या तोंडाने सांगण्याची कला जमायला हवी – ती माझ्याकडे जवळजवळ नाहीच हे मला गेल्या पाच वर्षांत नक्की कळलं आहे. (इथून पुढे जमली तर भविष्य वेगळं होईल)

(क्रमश:)

नचिकेत जोशी

www.nachiketjoshi.in

Friday, January 17, 2025

मागे वळून पाहताना - भाग १ : स्वतंत्र व्हायच्या आधीची दहा वर्षे

Nachiket Joshi Training उर्फ NJ Training उर्फ स्वत:चं काही चालू केल्याला १ सप्टेंबर २०२४ ला सहा वर्षे झाली. त्यानिमित्ताने एकूणच माझ्या ट्रेनिंग करिअरचा मीच घेतलेला हा धांडोळा.

*****

मी ठरवून NJ ट्रेनिंग सुरू केलं नाही. आपलं स्वत:चं कोचिंग असावं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. शिक्षक व्हायचं, मुलांना शिकवायचं कारण त्यासाठी आवश्यक ते गुण आपल्यात आहेतएवढ्याच इच्छेने 2008 मध्ये – तेही खरंतर परिस्थितीच्या रेट्यामुळे, मी ट्रेनिंगमध्ये आलो. तेव्हा आलो नसतो तर मात्र आयुष्य कुठे भरकटत गेलं असतं ह्याचा कुठलाच अंदाज आता लावता येत नाही.

COEP मध्ये शेवटच्या वर्षाला असताना MBA entrance prep मधली एक कंपनीकरियर लॉंचर, प्लेसमेंटसाठी आली होती. जॉब प्रोफाइल होतं – Aptitude trainer. मुळात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या कंपनीचं हे जॉब प्रोफाइल घेऊन येणं हेच माझ्यासाठी आश्चर्य होतं. मात्र असेही जॉब असतात हा साक्षात्कार मला तेव्हा झाला. त्या कंपनीत आपलं selection व्हावं अशी फार इच्छा होती. त्या प्लेसमेंट प्रोसेससाठी जेवढी मुलं आली होती त्यात सर्वात लायक मीच आहे अशी माझी तेव्हाही खात्री होती. ह्याचं कारण म्हणजे त्याआधी 3 वर्षे मी नववी-दहावीसाठी संस्कृत शिकवलं होतं. त्यामुळे आपण उत्तम शिक्षक बनू शकतो हे कळलं होतं. मात्र मी सुरुवातीचाच round क्लियर करू शकलो नाही. त्यादिवशी तीन मुलं select झाली. त्यातल्या तिघांनीही एकतर जॉइनच केलं नाही किंवा ते फील्ड सोडून केव्हाच दुसरीकडे काम सुरू केलं (हे होणारच होतं). त्या दिवशी संध्याकाळी गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर माझी मैत्रीण रूपाली भेटली त्यावेळी तिला सांगताना ‘I deserved it the most but couldn’t get it’ हे फीलिंग जास्त होतं. तिने तिच्या परीने समजूत काढली आणि तो दिवस संपला. नियतीला मात्र माझं ट्रेनर-मेंटर होणं हेच मान्य होतं. पुढे यथावकाश आयटी सोडून अत्यंत वाईट दिवसांच्या काळात पोटासाठी फेब्रुवारी 2008 मध्ये माझ्या आवडत्या क्षेत्रात जायचा निर्णय घेतला आणि तो कमालीचा लाभदायी ठरला. त्यामागे माझा जुना मित्र गिरीशचे बाबा (मी त्यांना देशपांडे काका म्हणायचो) मुख्य कारणीभूत होते.  त्यांना पत्रिकेचं आकलन उत्तम होतं. त्या दरम्यान माझ्या राशीचे दिवस अतिशय खराब होते. इतके की आत्महत्येचे विचार मनात येऊ शकतात अशी काहीशी ग्रहदशा होती. (ज्योतिष हे उत्तम शास्त्र आहे.  गल्लाभरू अर्धवट ज्ञानी ज्योतिषांनी त्याची वाट लावली आहे आणि ते शास्त्र एक चेष्टेचा भाग झालं आहे. ज्यात गणित आणि सारासार आकलन ह्या दोनच गोष्टी आवश्यक आहेत, ते शास्त्र टाकाऊ असूच शकत नाही. हे जाता जाता कंसात लिहून ठेवतो.) देशपांडे काकांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी आपणहून फोन केला, भेटायला बोलावलं आणि गप्पा मारत असताना आवडत्या क्षेत्रात नोकरी कर असं सांगून टाकलं. तो दिवस turning पॉइंट ठरला. त्यानंतर काकांची भेट क्वचितच झाली असेल. फोनवरच बोलणं झालं तर व्हायचं. 2-3 वर्षांपूर्वी काकांचं निधन झालं. आजही जेव्हा जेव्हा मी आवडत्या क्षेत्रात काम करतो हे लक्षात येतं, तेव्हा तेव्हा काकांची आठवण येते.

माझा पहिला जॉब ‘करिअर फोरम’ ह्या तेव्हाच्या MBA entrance prep मधल्या एका उत्तम structure असलेल्या कंपनीत होता. माझ्या aptitude ट्रेनिंग करिअरची सुरुवात करिअर फोरमपासून झाली हे माझं खरोखर भाग्य आहे. जॉइन झालेल्या ट्रेनरला कसं शिकवावं ह्यावर एक महिन्याचं नियोजनबद्ध ट्रेनिंग देणारी दुसरी कंपनी तेव्हा बहुधा एखादीच असेल. आज अनेकदा ‘वाट्टेल तसं’ शिकवणारे aptitude trainers पाहतो, तेव्हा आपण किती सुदैवी होतो ह्याची जाणीव होते. माझा aptitude ट्रेनिंगचा सगळा पाया करिअर फोरम’मध्ये पक्का झाला. मी भले उत्तम शिक्षक होतो/आहे, पण विषयाकडे बघण्याची दृष्टी ‘करिअर फोरम’मध्ये मिळाली. सेशन प्लॅन असतात, ते ट्रेनरनेच तयार करायचे असतात, त्यात आयत्यावेळी बदल होऊ शकतात, २ तासांचं सेशन असेल तर एक तास चाळीस मिनिटांचा सेशन प्लॅन डोक्यात तयार हवा. स्वत:च्या नोट्स मुलांसामोर  अजिबात उघडायच्या नाहीत - ती तयारी आधीच करून जायचं, मुलांच्या शंका ओळखता यायला हव्यात त्यासाठी शिक्षकाकडे ‘empathy’ हवी,  थोडक्यात म्हणजे शिक्षक ११०% तयार हवा म्हणजे सेशन उत्तम होतं, ह्या आणि अशा अनेक बाबी प्रत्यक्ष शिकायला मिळाल्या. बाकीचं निरीक्षणातून आणि अनुभवातून शिकलो. मुख्य म्हणजे शिकवताना त्याचा आनंद घ्यायला शिकलो. एकदा क्लासरूममध्ये शिरलो की बाकी सगळं सगळं विसरु लागलो. एक-दोन वेळा तर सेशन होतं तेव्हा अंगात ताप होता.  पण सेशन सुरू झालं आणि सगळं विसरलो. दोन तासांनी सेशन संपवून वर कॉफी घ्यायला गेलो तेव्हा जाणवलं की ताप वाढला आहे. आपल्या कामावर प्रेम असणार्‍या प्रत्येकाने असे अनुभव घेतलेच असणार आहेत - त्यात माझं एकट्याचंच कौतुक किंवा प्रौढी असं काही नाही. विशेष असलंच तर हे की असा अनुभव घेण्याचं भाग्य मला लाभलं. ‘करिअर फोरम’च्या जॉबने प्रचंड आत्मविश्वास दिला. तीन चार प्रसंग असे झाले की मुलांनी शिकवण्यासाठी माझ्या नावाची मागणी केली.  ‘करिअर फोरम’मध्ये Math foundation च्या batches माझ्या नावावर सुरू व्हायच्या. GMAT च्या batches मी होतो तोपर्यंत तिथे फक्त मीच घेतल्या. हे सगळं आनंददायी होतं. तिथल्या तीन वर्षांच्या काळात साध्या math faculty पासून सेंटर मॅनेजर पर्यंतची शिडी चढता आली. त्यानंतर जेव्हा तिथे आणखी वर जाण्यासाठी जागा नव्हती, तेव्हा 2011 च्या एप्रिलमध्ये ‘करिअर फोरम’ सोडलं. 2011 च्या डिसेंबरमध्ये ती कंपनीही बंद झाली. पण आजही ‘करिअर फोरम’ला माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. ‘करिअर फोरम’चा एक सद्गुण असा की पगाराचा दिवस तिथे कधीही चुकला नाही. पुढे आजवर अनेक कंपन्यांमध्ये कामं केली – पगार उशिरा मिळण्यापासून न मिळण्यापर्यंत अनेक अनुभव घेतले, अगदी मुद्दामहून पैसे न देणारेही भेटले, त्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचार्‍यांच्या पगाराबद्दल काटेकोर असणारी ‘करिअर फोरम’सारखी ट्रेनिंग क्षेत्रातली कंपनी आपल्या नशिबी होती ह्याबद्दल कृतज्ञता वाटते.

‘करिअर फोरम’मध्ये असताना तीन वर्षे चिकार सेशन्स घेतली. आकडाच सांगायचा झाला तर १६८१ सेशन्स घेतली. माझ्याकडे ‘करिअर फोरम’मध्ये आणि ‘करिअर फोरम’कडून घेतलेल्या १६८१ पैकी प्रत्येक सेशनचं रेकॉर्ड आहे. प्रत्येक सेशन दोन तासांचं धरलं तरी ३३०० हून अधिक तास होतात. त्यामुळे ‘करिअर फोरम’ सोडल्यावर काही काळ तरी घशाला आराम द्यावा असं वाटला लागलं. म्हणून TIMEची मुंबई आणि पुण्यातली ट्रेनर प्रोफाइलची ऑफर नाकारून Content Development मध्ये जॉब धरला. IMS Learning Resources Pvt Ltd उर्फ IMS च्या मुंबई मुख्यालयात तो जॉब होता. त्यासाठी जून २०११ मध्ये मुंबईला शिफ्ट झालो. IMS च्या courseware साठी आणि इतर test series साठी लागणारे प्रश्न तयार करणे हे मुख्य काम. पण मूळचा शिक्षक स्वस्थ बसू देईना म्हणून मग कधी कधी ट्रेक नसेल त्या रविवारी IMS च्या अंधेरी center मध्ये सेशन्सही घ्यायचो. मुंबई मला सर्वाधिक आवडली ती ह्याच काळात. मुंबईने माझी खूप छान काळजी घेतली. २०११ च्या जुलैमध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले त्यातला दादर कबुतरखान्याचा स्फोट झाला त्यानंतर अगदीच दोन-एक मिनिटात मी ट्रेनने दादर स्टेशनला उतरून परळला रूमवर गेलो. असं काही स्फोट वगैरे झालेत ह्याचा पत्ताच नव्हता. तेव्हा मोबाइल नेटवर्क बंद केले गेले होते. त्यामुळे पुण्यात ज्यांना ज्यांना कळलं ते सगळे काळजीने फोन लावत होते. त्या स्फोटाच्या अनुभवावर नंतर -  

स्फोट झाले, लोक मेले - क्षणभरातच संपली

माणसांनी माणसांना जगावण्याची कारणे

हा शेर सुचला. त्या काळात नवे मित्र-मैत्रिणी मिळाले. आयुष्यात पहिल्यांदाच घरापासून लांब राहिलो – तो अनुभव मोलाचा वाटला. गझल आणि कविता लेखन आणि ट्रेकिंग मुंबईमधल्या काळातच बहरलं. इतकं की लग्न ठरल्यावर मुंबई सोडून पुण्यात येताना मुंबईसाठी दोन ओळी लिहिल्या –

बंध स्वत:शी जुळता कोणी जवळ नकोसे झाले

इतके आवडले की शेवट शहर नकोसे झाले

पुण्यात आल्यावर CRT म्हणजेच Campus Recruitment Training ह्या क्षेत्राशी ओळख झाली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना कंपन्या प्लेसमेंट साठी येतात तेव्हा पहिला round aptitude test चा असतो. पूर्णवेळ CRTमध्ये असणार्‍या कंपन्या २०१२ मध्ये जवळजवळ नव्हत्याच. (आता ती संख्या खूपच वाढली आहे आणि ओघानेच दर्जाही खालावला आहे) अशाच एका कंपनीत मी नोकरी धरली आणि सुरू झाला भरपूर प्रवास. दोन-सव्वादोन वर्षांत जवळजवळ पस्तीसएक हजार किलोमीटरचा प्रवास केला असेल. पण ते सगळे प्रवास आनंददायी होते. आमची टीम उत्तम होती. ट्रेनिंग फील्डमध्ये टिकायचं असेल तर ट्रेनिंगच उत्तम हवं हा धडा त्या काळात मिळाला. जवळजवळ चाळीसएक कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी फिरलो. त्यावेळचे काही students आजही संपर्कात आहेत आणि ते आपल्या क्षेत्रात उत्तम काम करताहेत ह्याचं कौतुक आहे. त्या कंपनीचं नाव न लिहिण्याचं कारण म्हणजे आजही तिथून माझे कष्टाचे पैसे येणं बाकी आहे. पण इतर अनुभव छान होता.

ती कंपनी सोडल्यावर एक वर्ष freelancing करून पाहिलं. त्याच सुमारास PMP ची परीक्षा दिली आणि ते सर्टिफिकेशन पूर्ण केलं. तो अभ्यास मला मनापासून आवडला. बर्‍याच काळानंतर अभ्यास एन्जॉय केला म्हणून ती परीक्षा लक्षात आहे. सारंगच्या जन्माच्या दोनच आठवडे आधी ‘सीड इन्फोटेक’मध्ये जॉब लागला. नव्या जॉबमध्ये सुरूवातीला दोन महिने फक्त batches मध्ये शिकवल्यानंतर Practice head झालो. थोडक्यात कामाचं स्वरूप असं होतं की ‘सीड इन्फोटेक’च्या देशभरात असलेल्या centers मध्ये कुठेही Aptitude मध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा गरज निर्माण झाली तर ‘bug/query should stop at me’. ‘सीड इन्फोटेक’मध्ये गरजेनुसार शिकवलं आणि उरलेल्या वेळेत Aptitude Course design पासून execution पर्यंत कामं केली. ह्या जॉबची अमूल्य भेट म्हणजे ‘सीड इन्फोटेक’ने माझ्या एकूणच आयुष्याकडे बघण्याची माझी दृष्टी बदलणार्‍या माणसाशी भेट घडवली. तो माणूस म्हणजे राजेश वर्तक सर. कंपनीच्या हुद्द्यांनुसार ते माझे ‘सीड इन्फोटेक’मध्ये थेट बॉस होते. पण वर्तक सर उर्फ RV केवळ बॉस नव्हते तर एक उत्तम मेंटर होते/आहेत. आपल्या टीममेंबरकडून काम कसं करून घ्यायचं ह्याची उत्तम जाण असलेला असा हा माणूस आहे. त्यांच्या सोबत काम करणं हा माझ्या करिअरमधल्या आजवरच्या भाग्याचा कळस होता असं म्हटलं तरी चालेल. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमवर – मग तो वैयक्तिक आयुष्यातले का असेना, त्यांच्याकडे उत्तर असायचं – अजूनही असतं पण आता मला ती उत्तरं माहीत झाली आहेत. त्यांनी एकूणच माझ्या स्वभावाला माझ्या स्वभावानुसार पूरक अशी दिशा दिली. वर्तक सरांची भेट ही नियतीने माझ्यासाठी राखून ठेवलेली स्पेशल गोष्ट होती असं आता मला वाटतं. NJ Training सुरू केल्यापासून सरांशी भेट कमी होते पण माझ्या करिअर आणि एकूणच आयुष्यात त्यांचं स्थान काय आहे ह्याची जाणीव असल्यामुळे तीन-चार महिन्यांनी पद्मजाही आठवण करून देते – “बरेच दिवस झाले वर्तक सर भेटले नाहीत का?”

‘सीड इन्फोटेक’मध्ये RV सरांसोबत काम करताना आम्ही अनेक काळाच्या पुढच्याही गोष्टी करून ठेवल्या. मी २०१७ मध्येच aptitude चा self-paced video Course बनवला. ही कल्पना राजेशसरांची होती आणि त्यांनी सुरुवातीला ती मला समजावून सांगितल्यानंतर पूर्ण स्वातंत्र्य दिलं. सकाळी १० ते संध्याकाळी पार ७-८ वाजेपर्यंत मी ‘सीड’च्या स्टुडिओत बसून कोर्सची सेशन्स रेकॉर्ड केली. पुढे ३ वर्षांनी कोरोनामुळे online अभ्यासाला महत्त्व आलं, आणि अनेक MOOC websites वर तसे कोर्सेस सुरू झाले, पण तसा कोर्स आमच्याकडे २०१७ मध्येच तयार होता. २०१८ च्या जुलैनंतर आपण freelancing सुरू करावं असं वाटायला लागलं. त्याला कारणंही तशी होती.  बाकीची कारणे तात्कालिक आणि कमी महत्त्वाची वाटतात पण माझ्या मते त्यातलं सर्वात मुख्य कारण म्हणजे ‘आपल्या कामाचा योग्य तो मोबदला मिळायलाच हवा’ ही वाढत चाललेली भावना. मग ‘सीड इन्फोटेक’चा राजीनामा दिला. ३१ ऑगस्ट २०१८ हा माझा आणि पद्मजाचा, दोघांचाही last working day होता. १ सप्टेंबरला सकाळी झोपेतून उठलो तेव्हा दोघेही शब्दश: बेरोजगार होतो आणि साडेतीन वर्षांच्या सारंगसाठी आमच्याकडे भरपूर वेळ होता.

हे सगळं लिहून ठेवायची इच्छा गेली अनेक वर्षे होती, पण लिहीत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा कामात वेळ घालवू असं म्हणत ते पुढे ढकलत होतो. आणि स्वत:बद्दल लिहायला अवघडल्यासारखंही होत होतं. पण NJ Training ला सहा वर्षे झाली त्यानिमित्ताने ही हिंमत केली. २००८ ते २०१८ ह्या पहिल्या दहा वर्षांतल्या अनुभवाचा फायदा NJ Training सुरू करताना झालाच. त्याबद्दल पुढच्या भागात. चिकाटीने इथपर्यंत वाचलंत, त्याबद्दल वाचकहो, तुमचे मनापासून आभार!

(क्रमश:)

नचिकेत जोशी

www.nachiketjoshi.in