Pages

Friday, December 26, 2014

'तुझे दु:ख माझे'

'तुझे दु:ख माझे'
कुणी बोललेले
खरे वाटलेले
कितीदा मनाला

सभोताल सारे
फुलारून येई
मला दूर नेई
भुलोनी जगाला

थरारून जावी
उभी सर्व काया
दिसे फक्त माया
खुळा जीव झाला

अकस्मात यावे
ढगानेच खाली
तसा भोवताली
महापूर आला

मला जागवाया
बिछानी तपेले
दिसे ओतलेले
तळे हे उशाला

तसे स्वप्न माझे
पुराच्या प्रवाही
उसासून वाही
सकाळी दहाला

'तुझे दु:ख माझे'
कधी ऐकताना
हसू आवरेना
कितीदा मनाला

- नचिकेत जोशी (२५/१२/२०१४)

Thursday, December 18, 2014

पुनर्भरारी

दिसू लागली आहे हल्ली
वाळवंटातही हिरवळ,
जाणवू लागली आहे
दगडांखाली खळखळ
चलबिचल होऊ लागलीये
मरगळलेल्या देहावर
कुठलीशी नवथर उमेद
उमटू लागली आहे चेहर्‍यावर

आधार वाटतोय आतून
नवे पंख आल्याचा
पावलोपावली होतोय भास
स्वप्न खरे झाल्याचा

फुंकर बसते आहे आता
धुळीखालच्या खुणांवर
खपली धरली आहे आता
जुन्या जखमांवर
ऐकू येऊ लागलीये टिकटिक घड्याळाची
जुन्या, बंद पडलेल्या
प्रवास सुरु होणार आता वाटेचा
नवीन, नुकत्याच उघडलेल्या

- नचिकेत जोशी (१७/१२/२०१४)

Wednesday, December 10, 2014

खूप दिवसात

नभ खाली आले नाही
खूप दिवसात
माती ओलावली नाही
खूप दिवसात

दिशा धुंडाळू लागल्या
स्वतःलाच आता
आला नाही कुणी यात्री
खूप दिवसात

दु:ख दिसे खिन्न मूक
मीलना आतूर
कुणी आले न साजेसे
खूप दिवसात

किती वेडी स्वप्ने माझी
मातीत माखली
सुचले ना रुजणेही
खूप दिवसात

- नचिकेत जोशी (१०/१२/२०१४)

Friday, October 17, 2014

आता नको!

(ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांची 'हे असे आभासवाणे चांदणे आता नको' ही ओळ व्हॉट्सअ‍ॅप वर एका गप्पांमध्ये मिळाली. त्यावर गझल लिहिण्याचा हा प्रयत्न.)

लाघवी बोलून हे नाकारणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको

एकट्याच्या सोबतीला ज्याक्षणी आलीस तू -
अन् मला वाटून गेले, थांबणे आता नको!

बहर ओसरताच आले भान वार्‍याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको

त्या निरोपाच्या क्षणी ती बोलली नजरेतुनी -
एकही कुठलेच हळवे मागणे आता नको

मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको

तूच बोलावेस आता, 'हो' म्हणावे मी तुला
पण अबोल्याच्या दिशेने खेचणे आता नको

यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको!

धूळ साचू दे जराशी आरशावरती तुझ्या
रोज डोळ्यांना तुझ्या तू फसवणे - आता नको!

वाट संपायास येता फार वाटू लागले -
ऐकणे आता नको अन् बोलणे आता नको

- नचिकेत जोशी (१७/१०/२०१४)

Thursday, August 14, 2014

क्षणिक उमाळे

देशावरचे प्रेम उफाळुन येते
फेसबूकची भिंत थरारून येते

झोपेमध्ये घोरत असतो कायम
जाग मनाला मध्येच दचकुन येते

पोट स्वतःचे भरले की मग सार्‍या -
उपेक्षितांची भूक जाणवुन येते

पुष्कळ चर्चा होते पेपरमध्ये
जनता नंतर रद्दी देउन येते

कर्तव्यांचे भान अचानक होता
भाषणसुद्धा टाळ्या घेउन येते

क्षणिक उमाळे बघून हसतो आता
दया स्वतःची स्वतःस पाहुन येते

देश बिचारा जिथल्या तेथे असतो
जबाबदारी खांदे बदलुन येते

पडेल हाही थर पोकळ भिंतींचा
वेळ कुणाची केव्हा सांगुन येते?

- नचिकेत जोशी (१४/८/२०१४)

(सर्वच काफियांमध्ये र्‍हस्व उकाराची सूट घेतली आहे.)