Pages

Saturday, February 16, 2008

पाऊलवाट

सगळं कसं बदलत चाललंय!
हे जाणवतंय की, दूर दूर चाललंय...

ओळखीचे शब्दही आता अनोळखीपणे कानावर येऊ लागलेत,
कधीकाळी अंतराच्या पार गेलेले ते आता खरंच अंतरु लागलेत...
काही ओळखीच्या खुणा सापडताहेत का? - मी शोधतोय.
वेगळ्या झालेल्या वाटांना जोडणाऱ्या वाटेची मी वाट पाहतोय
रंगलेल्या मैफली आणि भावस्पर्शी सोहळे आता इतिहासजमा झालेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

त्यांनी प्रवासाच्या वाटेवरची
माझी पावलंच पाहिली
त्या पावलांचं एकटेपण
त्यांना दिसलंही नाही, जाणवलंही नाही
आता वाटेत काळ्या रात्री भेटतात,
कभिन्न पहाड उभे ठाकतात
वळणावळणाच्या रस्त्याने त्यातून पुढे जाणं चालूच आहे,
नव्या गावांना भेटी देणं चालूच आहे
घाटरस्त्यातल्या गाडीच्या हेडलाईटसारखी मधूनच
त्यांची आठवण उजळते-
तेवढीच चार पावलं लवकर पार होतात
हेडलाईट वळणावर दिसेनासा होतो,
आठवण मात्र गाडीच्या आवाजासारखी साथ देते
ते नाहीशा झालेल्या गाडीसारखे केव्हाच नजरेपार झालेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

कधीतरी परिचित हाक कानी येते
समजावणीच्या चार शब्दांचं दान
न मागताच माझ्या ओंजळीत टाकून जाते
मग पुढचं सगळं अपरिचित होऊन जातं
परत एकदा माझं मन माझ्यातच मिटून जातं
पावलांचे ठसे मात्र शहाणे होत जातात
प्रवासी पक्ष्यांची क्रमश: कहाणी होत जातात
कहाणीच्या सुखद शेवटाची मी वाट पाहत असतो
खऱ्या होणाऱ्या संकेतस्वप्नांची पहाट पाहत असतो
पण पहाटेच्या धुक्यात सगळे हरवून गेलेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

पण वळणावळणाच्या अशाच एका वाटेनेही मला समजावलंय
"काही शिक्के स्यमंतकासारखे असतात,
ते पुसण्यासाठी काळच जावा लागतो.
आणि पावलांचं एकटेपण दिसायलाच हवं असं नाही..."

नवं गाव जवळ येत चाललंय
आता परत सगळं कसं बदलत चाललंय!

- नचिकेत(२९/१/०७)

1 comment:

Pooja said...

Nachiket pahilyandach pahila tuza blog...
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...
khup sahi,it was great composition, shabdancha mahit nahi pan bhavnacha nakki...!!!(chitra pat ubha rahila)