Pages

Saturday, February 16, 2008

हुंदका

हुंदका साधा तुझा सांगून गेला
टाळले तू, मात्र तो बोलून गेला

दाटले आभाळ जे तव पापणीला
कोरलेले भाळ ते दावून गेला

पार होता वेस संगे गाव माझा
लक्तरे वेशीवरी टांगून गेला

भय अखेरी संपले कैसे म्हणावे?
बाहुला काळा घरा रांगून गेला

घसरलो तेव्हा कुठे मज भान होते?
संचिताचा दीप तेजाळून गेला

बोलते झालोच ना? मग पाहताना
दाह का नजरेतला जाळून गेला?

नचिकेत (९/४/२००७)