Pages

Monday, September 19, 2011

या इथे कधी काळी...

माणसांमधे इथल्या एक देवघर होते
या इथे कधी काळी देखणे शहर होते

या इथे तिचे माझे चिमुकलेच घर होते
या इथे कधी काळी देखणे शहर होते

भेटतो कधीकाळी, त्यातही तुझे नखरे!
बातमी उगाचच पण पूर्ण गावभर होते!

वाढली महागाई, हरवले जुने पैसे
मोजके जिव्हाळे पण नेहमी हजर होते

सर्व भरजरी नाती मी लपेटली देही
नेमके मनावरचे घसरले पदर होते

एकट्या सुन्या वाटा, झुंजल्यात दिवसांशी
सोबतीस स्वप्नांचे खूळ रातभर होते

ओळ मागते काही, शब्द उमटती काही
हे असेच आताशा रोज पानभर होते

दु:ख खोल गेले की, जीव पोरका होतो
संपतात जाणीवा, कोरडी नजर होते

एकटाच जगलो पण, शेवटी सुखी झालो
(एकट्याच स्वप्नांचे मरणही सुकर होते)

- नचिकेत जोशी (१८/९/२०११)

1 comment: