Pages

Wednesday, February 1, 2012

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग १

तुम्ही जर मुरलेले भटके असाल, तर शीर्षक वाचताक्षणीच समजायचं ते समजून गेला असाल. आणि नसाल तर, तुम्हाला सांगताना मला विलक्षण आनंद होतोय - ही एक सह्याद्रीमधल्या फारशी प्रसिद्ध नसलेल्या आणि कदाचित म्हणूनच अप्रतिम आडवाटांमधली, भ्रमंती आहे! पार रतनवाडीपासून कात्राबाईला वळसा घालत, आजूबाजूचा अप्रतिम नजारा डोळ्यांत साठवत, कातळ-कपार्‍यांतून चालत, अगदी गुहेरीच्या दारापर्यंत आणि पुढेही थेट कोकणात उतरणारी ही वाट दिवस पूर्ण सार्थकी करते.

तर, त्याचं असं झालं -

शुक्रवार, २७ जानेवारीला प्रीतीचा समस आला - 'रतनवाडी ते आजोबा पायथा व्हाया कात्राबाई घाट. उद्या रात्री निघून परवा रात्री परत. कोण कोण इंटरेस्टेड आहे?'. प्रीती-राजस-सुन्या म्हणजे 'ऑफबीटसह्याद्री'! नो टेंशन! भैरवगडच्या ट्रेकनंतर मी 'ऑफबीट'बरोबर ट्रेक केला नव्हता. या निमित्ताने जुने दोस्त भेटणार होते. मी काहीही अधिक माहिती न विचारताच होकार कळवून टाकला. शनिवारी 'यो'ला बोहल्यावर बघून आलो आणि ट्रेकची इच्छा अधिकच प्रब़ळ झाली.

रात्री ९ वाजता दादरहून कसारा फास्ट ट्रेन पकडायची होती. (अनुभवी मुंबईकरांना सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं असेल.) ट्रेन यायच्या आधी मी प्लॅटफॉर्मवर पेपरस्टॉलवरती पेपर चाळत होतो. त्या विक्रेत्याने आपणहून 'हा घ्या, यात वाचायला बरंच असतं' असं सुचवलं. "वाचायचा नाहीये, त्यावर झोपायचं आहे" - मी. त्याने एकदा मला 'पाहून' घेतलं आणि निमूटपणे TOI हातात दिला. ते जाडजूड धूड मला जेवताना-झोपताना खाली अंथरायला दोन दिवस आरामात पुरलं असतं. प्रीती-राजस मुलुंडहून चढणार होते. ही ट्रेन चुकली असती तर ट्रेक चुकला असता. मी पाठीवर मोठी सॅक असल्यामुळे सामानाच्या डब्यात (लगेज म्हणायचंय मला, 'सामान' नाही!) चढायचं ठरवलं आणि कसाबसा यशस्वीही झालो.

कुर्ला येईपर्यंत केवळ कुठेही दुखत नाही म्हणून अंग शाबूत होतं असं म्हणायला हरकत नव्हती. कारण त्या गर्दीमध्ये माझे स्वत:चे हातही मला दिसत नव्हते. मी मनुष्यमात्रांच्या सागरातील अर्धा थेंब वगैरे असल्याचा भास तेवढ्यात होऊन गेला. ज्याच्या आधारावर स्वस्थ होतो तो पुढच्या माणसाचा खांदा होता, हे ही बर्‍याच वेळाने समजलं. त्यात माझ्या मागच्या वीरमनुष्याला कुर्ल्याला उतरायचं होतं! मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. ठाणे आणि कल्याण ट्रेनने जायचं सोडून हे महाशय चक्क कसारा ट्रेनमध्ये शिरले होते आणि तेही फक्त ५-७ मिनिटांत विरुद्ध बाजूला उतरण्यासाठी! पण ट्रेनमध्ये घुसलात की बाहेर पडायचं ज्ञानही आपोआप मिळतंच. तद्वत, कुर्ल्याला त्याला उतरायला कशीतरी जागाही मिळाली.

बाजूच्या कोपर्‍यात भजन रंगायला लागलं होतं. अशी चालत्या गाडीतली भजने अनेकवेळा प्लॅटफॉर्मवरून ऐकली होती. आज प्रत्यक्ष बघायला मिळाली असती. म्हणून मग हळूहळू त्या दिशेने वळायचा प्रयत्न करायला सुरूवात केली. कुर्ल्याला जsssरा जागा मिळाली आणि त्या बैठेकर्‍यांच्या दिशेने घुसलो. काहीही म्हणा, महाराष्ट्रामध्ये झांज-तबला-चिपळ्या आणि अभंग ऐकले आणि मनात ताल सुरू झाला नाही हे होणारच! आजूबाजूची गर्दी विसरून मीही अगदी रंगून गेलो. ते हातांनी ठेका-बिका देणं बघून त्यांच्यातल्या एकाने 'काँगो वाजवणार का' (इथे तबला नव्हता, काँगो होता) असं विचारलंही. एका अभंगासाठी मी मग झांज वाजवायची हौस भागवून घेतली. काय सुंदर अभंग-गवळणी होत्या! व्वाह!! तास कसा गेला कळलंही नाही. कल्याणला ती 'सेवा' थांबली आणि एकमेकांच्या पाया पडून ते क्षणिक 'वारकरी' आपापल्या वाटेने निघून गेले. आम्हीही सगळे मग एकाच डब्यात एकत्र आलो.

कसार्‍याला उतरलो तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा झाले होते. इथून आम्हाला रतनवाडी (रतनगडाच्या पायथ्याचे गाव) गाठायचे होते. या वेळी आम्ही सहाच जण होतो. कुठल्याही ट्रेकसाठी ६ ते ८ जण हा अगदी योग्य संख्या! जास्त जण असले की गर्दी होते आणि कमी असले की कंटाळा येतो! एक जीप सांगून ठेवली होती. रतनवाडीकडे येताना रस्त्यावर जीवनबाबूला एका तरसाने दर्शन दिले (आम्ही सगळे बसल्या बसल्या झोपलो होतो). रतनवाडीला पोचलो तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. कमालीची म्हणजे कमालीची थंडी पडली होती. 'या ट्रेकमध्ये चाल खूप आहे' असे ओझरते ऐकले होते. त्यामुळे मुक्काम करण्याऐवजी रात्रीच रतनगडाच्या दिशेने निघावे आणि मध्येच कुठेतरी उघड्यावर योग्य जागा बघून शेकोटी करून मुक्काम करावा असा विचार आला आणि ६ जण निघालोही.

जेमतेम १५-२० पावले गेल्यावर कुणालातरी रतनगड-भंडारदरा हा बिबट्यांच्या हालचालींसाठी ओळखला जाणारा भाग असल्याचं आठवलं आणि मुकाट परत फिरलो. रतनवाडीमध्ये भगवानदादांच्या अंगणात पथार्‍या पसरल्या. कडाक्याच्या थंडींमुळे स्लीपिंगबॅगमध्ये बर्फ ठेवले आहेत की काय अशी शंका येत होती. झोप माझ्यासकट कुणालाच लागली नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर बाकीचे मला 'किती घोरत होतास रात्रभर' वगैरे काहीबाही म्हणत होते, पण ते खरं नाही! तसं म्हणायची पद्धत आहे(या जगाची!). आता दिवसभर इतके काबाडकष्ट केल्यावर थोडेसे आवाज घशातून आलेही असतील! मी जागा होतो हे मात्र खरं! अपवाद म्हणून मला 'थंडीमुळे हात-पाय आखडून गेले आहेत, आणि त्यामुळे ट्रेक अर्धवट सोडून मागे फिरावे लागले आहे, मी भजने म्हणतोय तरी एकाही गावकरी मला वाट दाखवत नाहीये' अशी एकदोन स्वप्ने पडली. अखेर थंडी असह्य झाली आणि साडेपाचला दादांचे दार वाजवून 'घोंगडी देता का' असं विचारलं. तर त्या मावशींनी बाजूच्या खोलीतच झोपायला सांगितलं. अर्थात तिथेही झोप स्वस्थ लागली नाहीच, पण बरीच बरी सोय झाली. सात वाजता उठलो, आणि मावशींनी पातेलंभर गरम पाणी आणून दिलं! क्या बात! सुख याला म्हणत असावेत! या सुखाची व्याख्या उद्या विस्तारणार आहे, हे आम्हाला तेव्हा ठाऊकच नव्हतं!

(क्रमशः)
- नचिकेत जोशी

2 comments:

Nachiket Javkhedkar said...

sahich....
pudhchya bhagachi waat pahatoy!! :)

sagar mehta said...

भन्नाट लिखाण...