यावेळी ठरवलेला किल्ला होता - "किल्ले पेब उर्फ विकटगड". पुणे - मुंबई लोहमार्गावर नेरळ स्टेशन आहे. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या माथेरान या सुप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणाला लागून पेब किल्ला आहे. यावेळी ६ जण नक्की झाल्यामुळे सिंहगड एक्सप्रेसने जाण्य़ाचा बेत रद्द करून आयत्यावेळी गौरवच्या कारमधून सकाळी साडेसहा वाजता निघालो. खोपोलीपर्यंत द्रुतगती मार्गाने जाऊन खोपोलीला कर्जतकडे जाणाऱ्या मार्गाला लागलो. खोपोली-कर्जत १५ किमी, व कर्जतला नाष्टा करून पुढे कर्जत-नेरळ १३ किमी असा प्रवास करून नेरळला पोहोचलो, तेव्हा दहा वाजले होते. पेबच्या किल्ल्यावर जायला दोन मार्ग आहेत. पहिला, नेरळमध्ये कार-पार्किंग ची सोय आहे. तिथे गाडी लावायची व पेबच्या किल्ल्याच्या दिशेने चालत जायचे. ह्या वाटेने साधारण अडीच-तीन तास लागतात. दुसरा मार्ग म्हणजे, सरळ माथेरानचा नगरपालिकेचा वाहनतळ गाठायचा, तिथे गाडी पार्क करायची आणि डोंगराच्या धारेवरूनच पेब किल्ल्याकडे जायचे. ’पेब किल्ला लवकर पाहून झाला तर थोडा वेळ माथेरानमध्ये भटकता येईल’ असा विचार करून आम्ही माथेरानच्या वाहनतळाच्या दिशेने गाडी हाकली.
घाट अत्यंत खड्य़ा चढाचा आहे. त्यातच छोट्या घाटरस्त्यावर नेरळ-माथेरान मार्गावरचे सर्व अधिकृत टॅक्सीचालक सराईतपणे गाडी हाणत असतात. तो घाटरस्ताही enjoy करत आम्ही वाहनतळावर पोहोचलो. Weekend साजरा करायला नवी मुंबई आणि आसपासच्या अलिशान भागातलं सुखवस्तू तारूण्य सहकुटुंब आलं होतं. आमचं ' weekend destination' वेगळं आणि जरा ’हटके’ होतं, एवढंच. बाकी सर्वत्र उत्साह दाटला होता.
वाहनतळामधूनच एक पायवाट पॅनोरमा पॉईंटच्य़ा दिशेने जाते. माथेरानकडे जाणाऱ्या त्या निसर्गनिर्मीत चालत्याबोलत्या प्रेक्षणीय़ स्थळांकडे पाठ फिरवून आम्ही या वाटेने चालू लागलो. या वाटेला समांतर असा खालच्या बाजूने नेरळ-माथेरान लोहमार्ग गेला आहे. पेबला जाण्यासाठी हा लोहमार्ग गाठावा लागतो. पण लोहमार्गावर उतरण्य़ासाठी पायवाट सहजपणे सापडलीच नाही आणि आम्ही थेट पॅनोरमा पॉईंटजवळ जाऊन पोहोचलो. मग वाट चुकल्याचा साक्षात्कार होणे, सराईतपणे धबधब्याची वाट पकडणे इत्यादी नेहमीचे अविभाज्य आणि अटळ सोपस्कार यथासांग पार पाडून कसेतरी लोहमार्गावर NM 169 जवळ उतरलो.
मग त्या रूळांवरून उलट दिशेने नेरळकडे चालू लागलो. साधारण दीड-दोन किमी वर NM 158 हा milestone लागतो. तिथे एका कमानीजवळच्या पाटीवर ’किल्ले पेब उर्फ विकटगड रेल्वे कर्मचारी आपले सहर्ष स्वागत’ करतात.
या ठिकाणी रूळ सोडून पेबच्या किल्ल्याच्य़ा दिशेने पायवाट जाते. वाटेत दोन लोखंडी शिड्या, एक गुहेसदृश घळ, आणि बरेच झरे यांना ओलांडून आपण माथेरानचा डोंगर आणि पेब किल्ला यांच्या मधल्या खिंडीत येऊन पोहोचतो. या खिंडीच्या बरोब्बर खूप वर पॅनोरमा पॉईंट आहे. तिथून या खिंडीत उतरायला एकच मार्ग आहे - पाण्यासारखी थेट उडी घेणे. (तात्पर्य, कोणताच मार्ग नाही.)
त्या खिंडीपासून वाट अगदीच सोपी आहे. गडावर पोहोचण्य़ासाठी आणखी दोन - एकावर एक आणि एकमेकांशी कोनात वळवलेल्या - शिड्या आहेत. गडावर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराकडे पाठ करून उभे राहिलो की समोर लगेच खोल १००० फूट दरी, दरीपलीकडे उजव्या हाताला माथेरानचा पॅनोरमा पॉईंट, आणि डाव्या हाताला दूरवर नेरळ गाव दिसते. इथून दिसणारे सह्याद्रीचे सरळसोट कडे आपले नजर खिळवून ठेवतात. मंदिराजवळच पिण्याच्या पाण्याचे टाके आणि पाणी काढायला बादली ठेवलेली आहे.
नेरळ गावाकडून येणारी वाट पेबच्या किल्ल्याला ओलांडून मागच्या बाजूने वर येते. त्या वाटेवर दोन गुहा आहेत. या गुहांत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा मठ आहे. विविध उत्सवांच्या निमित्ताने इथे बऱ्याच भक्तांची गर्दी होते, हे तिथल्या फोटोंवरून कळते. याच गुहांजवळ एक माणूस जाऊ शकेल एवढ्या आकाराचे आणखी एक भगदाड आहे. तिथून आत गेल्यावर एक छोटीशी अंधारी खोलीसदृश जागा आहे. आम्ही सरपटत आत गेलो, आणि अमोनियाच्या उग्र दर्प नाकातोंडात भरून परत आलो. आत फक्त एक वटवाघूळ दिसले. अंधाऱ्या जागेचे प्रयोजन मात्र कळू शकले नाही. या वाटेवर केळीची पाने भरपूर आहेत, आम्ही जेवणासाठी (लगेच) तोडून घेतली.
त्याच वाटेवर पुढे काटकोनात एक लोखंडी शिडी बसवली आहे. नेरळकडून येताना या शिडीवरून चढून येणे हा एकमेव मार्ग आहे. आम्ही माथेरानकडून गेलो असल्यामुळे आम्ही ही शिडी उतरून त्या मठात गेलो.
गडाच्या सर्वोच्च ठिकाणी दोन पादुका व त्याभोवती छोटेखानी फरसबंदी आहे. संपूर्ण गड तासाभरात फिरून होतो. या तासाभराच्या संपूर्ण भटकंतीमध्ये ’भन्नाट रानवारा’ आमच्या बरोबर होता. पावसाची आशा शेवटपर्यंत आशाच राहिली. जेव्हा आम्ही पेबवर होतो, तेव्हा माथेरानच्या डोंगरावर ढग सांडत होते, आणि आम्ही माथेरानवर पोहोचलो, तेव्हा पेब पावसात भिजत होता!
परत येताना Casette rewind करावी तसं तोच रस्ता, त्याच शिड्या, तोच NM 169 milestone अशी सारी माघारी पायपीट करून माथेरानच्या वाहनतळावर परत आलो. इथे माथेरानमध्ये जाण्य़ासाठी तिकीट फाडावे लागते. आणि मुख्य म्हणजे, आत ३०-३५ मिनिटांची पायपीट केल्यावर मुख्य माथेरानची पर्यटनक्षेत्रे लागतात. वेळेअभावी आम्ही माथेरानमधल्या ’सर्व’ प्रेक्षणीय स्थळांकडे पाठ फिरवली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
गार वाऱ्याची झुळूक यावी आणि क्षणभरात ताजंतवानं वाटावं तसं सह्याद्रीतली ही पेबची पटकन संपून गेलेली भटकंती दीर्घकाळ मनाला ताजं ठेवेल यात शंकाच नाही!
नचिकेत जोशी (२९/६/२००८)
No comments:
Post a Comment