ट्रेक हे एक न सुटणारे व्यसन आहे. ते एकदा लागले की मग काळ-वेळ, तिथी-नक्षत्र, सणवार यापैकी कशाचेही भान राहत नाही. खूप दिवसांपासून मनात असलेली दिवाळीत ट्रेकला जायची इच्छा यावर्षी पूर्ण झाली, आणि तीही (नेहमीप्रमाणे) अगदी अवचित!!
’दिवाळी पहाट’ नामक एका गाण्याच्या कार्यक्रमाचे निमित्त आणि नोकरीला (शुद्ध भाषेत रोजंदारीला) मिळालेली सुटी या पार्श्वभूमीवर किल्ले रोहिडाच्या भेटीचा योग जुळून आला. तिकीटे काढल्यामुळे लवकर तसेही उठणारच आहोत, मग एखादा किल्लाच ’करून’ येऊ असा किडा डोक्यात आला आणि गाण्याच्या मैफलीऐवजी मी, सुजय आणि ’हमारा बजाज’ (डिस्कव्हर १३५) सकाळी सकाळी ७.३० वाजता रा.म.४ वरून भोरच्या दिशेने मार्गस्थ झालो. सकाळचे मस्त धुके बघून काही कविकल्पना सुचायच्या आत महामार्गावर पोहोचलो (आणि धुक्यानेही हळूच काढता पाय घेतला!!)
रमतगमत भोर गाठले तेव्हा घड्याळ्यात अवघे साडेआठ झाले होते. तीन किल्ले आणि दोन राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा यानिमित्ताने भोरला ही एकूण पाचवी भेट होती. भोर आणि आसपासचा परिसर मला कायम भुरळ घालतो.(असते एकेकाची आवड!) तालुक्याचे गाव, तरीही बऱ्यापैकी गावपण टिकवून असलेले भोर आणि आजूबाजूच्या डोंगररांगा क्षणात इतिहासात घेऊन जातात. मावळच्या दऱ्याखोऱ्यांनी शिवबाला सुलतानशाही झुगारून टाकण्याची प्रेरणा दिली, या ऐतिहासिक सत्यावर भोर परिसरातील या रांगा पाहिल्यावर माझा लगेच विश्वास बसला होता. बाकी शिवकालीन इतिहासावर विश्वासापेक्षा आपल्याकडे अविश्वासच अधिक दाखवला गेलाय. असो. भोर या शब्दाचा हिंदी की उर्दू भाषेतला अर्थ पहाट असा आहे. मी पहाटेच्या वेळीही भोर पाहिले आहे. आणि तेव्हापासून मला भोर शब्दही आवडू लागला आहे.
तुम्ही जर याआधीची आमच्या ट्रेकची वर्णने वाचली असतील, तर आम्ही किल्ल्यांच्या वाटेबद्दल, ती मुळीच ठाऊक नसली तरी अत्यंत निश्चिंत असतो, हे तुम्हाला एव्हाना माहित झाले असेल. यावेळी किल्ल्याची वाट सोडाच, पायथ्याच्या गावाचे, बाजारवाडीचे, नाव फक्त लक्षात होते. (कारण सगळा बेत अगदी ऐनवेळी ठरला होता.) अर्थात ’दुर्ग संवर्धन समिती’च्या विकासकामामुळे रोहिडा नुकताच प्रकाशात आला आहे. भोर स्टॅण्डवर आणि चौपाटीजवळ एकदा रस्ता विचारून घेतला आणि बाजारवाडीकडे निघालो. रस्ता अगदी सोपा, सरळ (आणि मुख्य म्हणजे खड्डेविरहीत, डांबरी) आहे. मांढरदेवीच्या रस्त्यावर सुमारे ५ किमी वर खानापूर नावाचे गाव आहे. त्या गावात उजव्या हाताच्या कमानीखालून रोहिड्याकडे निघालो. धावडी-बाजारवाडी गावाच्या आणखी एक कमानीने आमचे ’सहर्ष स्वागत’ केले आणि लगेच मानकरवाडीकडे जाणाऱ्या दिशेने रोहिड्याची वाट आहे असा फलक दिसला. काहीही माहिती नसतानाही मराठी वाचू शकणाऱ्याला रोहिड्याचा पायथा गाठणे अजिबात अवघड नाही. जागोजागी मार्गदर्शक फलक आहेत.
गावात एका घरी नेहमीप्रमाणे हेल्मेट आणि जॅकेट ठेवले आणि समोर दिसणारी डोंगराची सोंड धरून निघालो. किल्ला मध्यम उंचीचा आहे, चढायला सोपा आहे, चुकायची शक्यता नाहीच. तासाभरात वर पोहोचलो. सिंहगडासारखेच येथेही एकामागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत. दुसऱ्या दरवाजानंतर एका भुयारात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. रोहिड्यावर साप भरपूर आहेत, हे कुठेतरी वाचल्यामुळे त्या थंड भुयाराच्या तोंडावर बसून पाणी काढतानाही मला त्या अहिकुळाच्या जलनिवासी शाखेतील एखाद्या सदस्याच्या तिथे दर्शन देण्य़ाचीच अधिक भीती वाटत होती. पण संपूर्ण ट्रेकमध्ये एकदाही सापाची कातही दिसली नाही. साप दिवाळीनिमित्त दुसऱ्या प्रांतात गेले असावेत!
किल्ला साधारण अर्ध्या तासात पाहून होतो. किल्ल्यावर नुकताच जीर्णोद्धार झालेले महादेवाचे मंदिर (जे बाहेरून बंद असल्यामुळे आम्हाला आतून पाहता आले नाही), तीन बुरूज, पडकी सदर, एक चोर दरवाजा आणि पुष्कळ पाण्याची टाकी आहेत. सभोवतालचा आसमंत नितांतसुंदर आहे. एका बाजूला मांढरदेवी रांग, त्यापलिकडे उजवीकडे पांडवगड, कमळ, केंजळ हे परिचित गड, रायरेश्वर पठार, नीरा नदी, वातावरण अगदी स्वच्छ असेल तर त्यापलीकडे दूरवर राजगड, सिंहगड आणि शेवटी तशाच उजव्या हाताने भोर गाव आणि त्याच्या उजवीकडे पुरंदर (याठिकाणी पाहणाऱ्याची स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होते)- एवढा विस्तीर्ण परिसर दिसतो.
सगळा गड आरामात पाहून आणि भरपूर फोटो काढून, गड उतरून खाली आलो तेव्हा घड्याळात फक्त एक वाजत होता. मग ’परतीच्या वाटेवरती’ पुन्हा रमतगमत हायवेवर कुलकर्ण्यांच्या उपहारगृहात (यावेळी) झटपट पाहुणचाराचा आस्वाद घेत तीन वाजता पुण्यात पोहोचलो.
माझ्या दुर्गभ्रमंतीमधला किल्ला क्र. ३० - रोहिडा. कसलीही अविस्मरणीय़ आठवण नाही, कुठलाच थरार नाही, पण तरीही डोंगरदऱ्या पालथ्या घालायची हौस पूर्ण झाल्यामुळे व अगदी आयत्यावेळी ठरूनही मुळात सोपा असल्यामुळे सहज पार पडलेला ट्रेक म्हणून रोहिडा उर्फ विचित्रगड कायम स्मरणात राहील!
नचिकेत जोशी (२९/१०/२००८)
1 comment:
Nachiket, me Rohidyala janyabaddal vicharle hote. Tujha ha lekh wachun ekda jaun yawe asehi tharawle hote re... pan somehow office groupbarobar jaane jamle nahi. :(
But would like to go for such treks. If you know any such trek group, please mala sang ha. :)
-Ameliya
Post a Comment