एखादी गोष्ट नेहमी डोळ्यासमोर असावी, पण आपल्या वाट्याला न यावी, तसं काहीसं केंजळगडाच्या बाबतीत होत होतं. एका वर्षापूर्वी जेव्हा रायरेश्वराला पहिल्यांदा गेलो, तेव्हा कोर्ले गावाच्या डाव्या अंगाला दरीला लागून उभ्या असणाऱ्या केंजळगडाशी पहिल्यांदा नजरभेट झाली होती. रायरेश्वरावर दगडू जंगमाकडून केंजळगडाच्या वाटेबद्दल जुजबी माहिती मिळाली होती. त्या दिवशी जवळजवळ दिवसभर केंजळगड डोळ्यासमोर होता, पण जायला जमलं नव्हतं. त्यानंतर मागच्या वर्षभरात पांडवगड, कमळगडला जाताना जुना परंतु न भेटलेला दोस्त असावा तसा केंजळगड लांबूनच दिसत होता, पण जाणं काही होत नव्हतं. अखेर, यंदा सर्व ’कामगारांच्या’ हक्काच्या दिवशी- १ मे ची सुटी धरून केंजळगडाकडे प्रस्थान ठेवले.
३० एप्रिलला, वेळ आणि वाहने यांची आयत्या वेळेपर्यंत ठरवाठरवी करून शेवटी आम्ही ९ जण पाच गाड्यांवर रात्री दहा वाजता निघालो. भारतीय प्रमाणवेळेनुसार निघायला (फक्त) २ तास उशीर झाला होता. भोर पर्यंत सुनसान रस्त्यावरून गाडी चालवण्य़ाचा मनमुराद आनंद घेत भोरमध्ये पोचलो, तेव्हा रात्रीचे साडेअकरा झाले होते. तेवढ्यात सर्वांना चहा नामक ’उत्तेजक पेय’ पिण्याची तल्लफ आली! आणि ती एवढी जोरदार होती की, अगदी आईस्क्रीमच्या दुकानातही चहाची चौकशी करून आलो!! तेव्हा त्या आईस्क्रीमवाल्याचा झालेला चेहरा पाहण्यासारखा होता! शेवटी समस्त उपहारगृहे निद्राधीन असल्याने आम्ही मोर्चा नाईलाजाने वरंधा मार्गावरच्या आंबवडे गावाकडे वळवला. इथून कोर्ले गावाचा फाटा आहे.
एका चौकोनाची जर रायरेश्वर ही एक बाजू असेल, तर, केंजळगड ही लगतची दुसरी बाजू आहे. (क्षेत्रफळ माहित नाही :-) ) दोन्ही डोंगर एकाच धारेने जोडले गेले आहेत. फक्त रायरेश्वर पुणे जिल्ह्यात (भोर तालुका) आहे, आणि केंजळगड सातारा जिल्ह्यात (वाई तालुका) आहे!
यावेळी फक्त केंजळगड हे एकच ठिकाण ठरवलेलं असल्यामुळे कोर्ले गावात गाड्या लावून रायरेश्वराच्याच वाटेने चढून केंजळगडाच्या माचीवरच्या वस्तीजवळ पथाऱ्या टाकायच्या असा बेत होता. बालेकिल्ला चढण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी रामप्रहरी ठेवला होता. हा बेत रायरेश्वराच्या वाटेने चढण्यापर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरळीत पार पडला. आंबवडे ते कोर्ले हा अतिशय खराब रस्ता पार करून कोर्लेमध्ये पोचलो. सुदैवाने गावात दोन तरूण भेटले. त्यांच्य़ा घराजवळ गाड्या लावल्या आणि हेल्मेटही त्यांच्याच घरात ठेवले. रात्री १ वाजता चढायला सुरूवात केली तेव्हा रायरेश्वर आणि केंजळगड अंधारात नाहीसे झाले होते आणि ही मोहीम पाहायला आकाशात फक्त चांदण्य़ा जमल्या होत्या. कृष्णपक्षातली दशमी असल्यामुळे चंद्रराव आमची मोहीम फत्ते होण्याच्या सुमारास हजर राहणार होते!
रायरेश्वराची वाट अत्यंत सोपी आहे. (अवघड भाग आंबवडे ते कोर्ले ह्या खराब रस्त्याने गाडी चालवणे हाच आहे!) निम्म्यापेक्षा जास्त चढून गेलं की, एके ठिकाणी ह्या वाटा वेगळ्य़ा होतात. एक डावीकडे केंजळगडाच्य़ा माचीकडे जाते, आणि एक "यू टर्न" मारून रायरेश्वराकडे जाते. आमची ही वाट चुकली आणि आम्ही थेट रायरेश्वराच्या शिडीजवळच्या सपाटीवर पोचलो. तिथेच मुक्काम करण्यापेक्षा सरळ रायरेश्वराच्या मंदिरात मुक्कामाला जावे, त्यामुळे एकाऐवजी उद्या दोन्ही किल्ले होतील असे ठरवले आणि त्यानुसार शिडी चढू लागलो. मागे सहज वळून पाहिले, तर किल्ले रोहिड्याच्या (विचित्रगड) मागून उगवलेली तांबूस चंद्रकोर दृष्टीस पडली. भोरहून आंबवडेला येताना वाटेत डाव्या हाताला रोहिडा किल्ला दर्शन देतो. आसमंतातली शांतता अनुभवत आणि वाट शोधत रायरेश्वराच्या ऐतिहासिक मंदिरात पोचलो, तेव्हा पहाटेचे साडेतीन झाले होते. विशेष गोष्ट ही होती, की संपूर्ण चढणीत एकदाही रस्ता चुकलो नाही! (केंजळगडाची वाट चुकली हा अपवाद सोडून!)
’सकाळी पाच वाजता उठलो, तर ऊन चढायच्या आत केंजळगड उतरता येईल’ असा (निष्फळ) निष्कर्ष काढून सर्वांनी मंदिराबाहेरच्या चौथऱ्यावर पथाऱ्या टाकल्या. सकाळी सहा वाजता उठल्यावर शंकर जंगम यांच्याकडे चहा घेतला, दगडूचीही भेट झाली. तो आदल्या रात्री खावली गावात लग्नाला गेल्याचे कळले होते, नाहीतर सकाळच्या नाष्ट्याचीही सोय झाली असती. त्यांचा निरोप घेऊन केंजळगडाकडे निघालो. रायरेश्वर ते केंजळगड ही वाट अगदी सोपी आहे. डोंगराच्या धारेवरून चालत गेलं की आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. हा किल्ला थोडा पुरंदरसारखा आहे. म्हणजे खाली माची आणि वर तसाच बालेकिल्ला. माचीवरच्या वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सोपी वाट आहे. आणि आता तर, दोन ट्रक एकावेळी जाऊ-येऊ शकतील एवढा रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. हा रस्ता केंजळगडाला वळसा घालून पलीकडे कमळगडाकडे जाणार असल्याचं कळलं. डेक्कन ओडिसी सारखं एकाच वाटेवर रायरेश्वर, केंजळ, कमळगड दर्शन असा काही बेत असावा!
अर्ध्या तासात माचीवरच्या केंजळवाडीला पोहोचलो, आणि रानातून केंजळगडाच्या शिखराकडे चालायला सुरुवात केली. ही वाट जरा दमवणारी आणि बऱ्यापैकी चढणीची आहे. मे महिना असल्यामुळे रानमेवा झाडाझाडावर दिसत होता. कैऱ्या, थोडी कच्ची करवंदे यांचा भरपूर आस्वाद घेत अर्ध्या तासात वर पोहोचलो. शेवटच्या टप्प्यात एकाच कातळात कोरलेल्या ऐसपैस पायऱ्या आवर्जून पाहण्यासारख्या आहेत.
याही गडावर पाहायला काहीच नाही. अगदी मंदिराचं बांधकाम ही नाही. फक्त एक साठवणीची खोली वाटावी असं एक दगडी बांधकाम आहे. गडाची देवी उघड्यावर स्थानापन्न झाली आहे. तिथेच एक मारूतीरायही आहेत. एक प्रचंड मोठा जात्याचा वाटावा असा दगड उभा करून ठेवलेला सापडला. पण नुसत्या ऐतिहासिक पडक्या बांधकामापलीकडचा निसर्ग इथे भरपूर आहे. सुदैवाने मळभ असल्यामुळे उन्हाचा फारसा त्रास होत नव्हता. केंजळगडावरून वाई-भोर प्रदेशाचा तोच चिरपरिचित आसमंत दिसतो. रायरेश्वर, रोहिडा, कमळगड, नवरा-नवरीचे सुळके, वाळकी नदी, धोम धरण हे जुने ओळखीचे दोस्त्स वेगळ्या angle ने दिसले- नव्याने ओळख व्हावी तसे!
परतताना, ज्या वाटेने रात्री चढलो त्या रायरेश्वराच्या लांब-रूंद रस्त्याकडे न जाता केंजळवाडीतून पायवाटेने दरी उतरून पुन्हा कैऱ्या तोडत थेट कोर्ले गावात उतरलो. एखाद्या ट्रेक किंवा भटकंतीमध्ये निसर्गही हा असा सामील होऊन आणखी धमाल आणतो. ही वाटही सोपी आहे. रात्री आकाशात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे चुकायची risk नको, म्हणून या वाटेने आलो नाही, एवढंच! मग नेहमीप्रमाणे कोर्ले ते भोर, भोर ते हायवे गाडी चालवत, आणि हायवेवर कुलकर्ण्यांच्या उपहारगृहात निवांत पाहुणचाराचा आस्वाद घेत चार वाजता पुण्यात पोहोचलो.
अगदी ध्यानीमनी नसताना आमच्यापैकी काहीजणांचे या ट्रेकमध्ये रायरेश्वर आणि केंजळ असे एकाऐवजी दोन किल्ले झाले. वाट न चुकता झालेला हा पहिलाच ट्रेक असावा! पण तरीही यावेळी काहीच ’चुकल्यासारखं’ वाटलं नाही! केंजळगड नावाच्या, खूप पूर्वीच मैत्री झालेल्या, पण भेटीचा योग न आलेल्या जुन्या आणि अजाणता दुर्लक्षित मित्राला भेटल्याचा आनंद कदाचित त्यापेक्षा अधिक वाटला असेल...
- नचिकेत (४/५/२००८)
No comments:
Post a Comment