Pages

Monday, July 4, 2016

पाउस

तिची आठवण येता, क्षणात भरतो पाउस
कोर्‍या ओळींमध्येही कोसळतो पाउस

पागोळ्यांच्या धारेखाली फुटते माती
खळग्यामध्ये स्वतःशीच मग भिजतो पाउस

चिंब फुलांच्या देहांवरचे नवथर यौवन
ढगात लपलेल्या थेंबानी टिपतो पाउस

ओढे, नाले, विहिरींमध्ये जाउन बसतो
पहा केवढा तहानलेला असतो पाउस!

कधीकधी आभाळ रिकामे होते सारे!
इतके कुठले ओझे हलके करतो पाउस?

त्याची चाहुल येता तीही गंध प्रसवते
मिठीत शिरता मातीच्या मोहरतो पाउस

कॉफी, भेटी, कट्टे सारे पुसून जातो
गालांवरती एकटाच ओघळतो पाउस

- नचिकेत जोशी (२८/७/२०१४)

Friday, June 24, 2016

घरच्या घरी मँगो 'नॅचरल' आईस्क्रीम (चार जणांच्या अंदाजाने)

वीकेंडला थोडा वेळ मिळाला तेव्हा आईस्क्रीम करून पाहिले. चवीलाही उत्तम झाले होते, म्हणून शेअर करतोय -

साहित्य - आंब्याचा रस - दोन वाटी
आंब्याच्या बारीक कापलेल्या फोडी - ८ ते १०
सुकामेवा/ड्रायफ्रूट्स - आवडीनुसार
दूध - दीड वाटी
मिल्क पावडर - एक वाटी
साखर (आवश्यक वाटल्यास, चवीपुरती)

कृती - दूध, मिल्क पावडर, आंब्याचा रस एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यावे. चव अगोड वाटल्यास साखर घालून पुन्हा मिक्सरमधून काढून घ्यावे. हे मिश्रण डीप फ्रीजमध्ये सहा ते आठ तास ठेवावे. डीप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बर्फाचा हलका थर तयार झालेला असतो. म्हणून नंतर पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यावे. दुसर्‍यांदा मिक्सरमधून काढल्यावर मिश्रण खूप सॉफ्ट बनते. त्यावर आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट्स पेरून पुन्हा एक ते दोन तासांसाठी डीप फ्रीजमध्ये ठेवावेत. आईस्क्रीम रेडी!













- नचिकेत जोशी (२२/६/२०१६)

Friday, June 10, 2016

दुवा

तुझ्या आठवांच्या उजेडात माझ्या मनातील अंधार तेजाळतो
मनाआडच्या घोर रानातही मी, तुला जोडणारा दुवा शोधतो

तुझा हात हाती विसावून जावा, निघावे त्वरेने दिगंताकडे
नसावे कुणालाच ठाऊक काही, कुठे चाललो, वाट कोणीकडे
असे एक आयुष्य स्वप्नी तरी दे, असे रोज देवास त्या मागतो - १

नसे एकही भग्न गर्ता न वास्तू, अशा धूळवाटेवरी चाल तू
जिथे स्वप्नतळवे विसावू पहाती, तिथे एक मुक्काम रेंगाळ तू
तुझ्या सोबतीला कुणी एक तारा तुलाही न कळता नभी राहतो - २

अशी सांजवेळा, अशी ही उदासी, असा विश्वसंन्यास क्षितिजावरी
विरहसोहळा रंगतो शामरंगी नि वेणू इथे वाजते अंतरी
विरक्तीसही रंग येतो गुलाबी, नवा अर्थ प्रेमास या लाभतो - ३

- नचिकेत जोशी (१०/६/२०१६)

Monday, May 30, 2016

... करून पाहू!

मनात आहे ते ते सारे लिहून पाहू
मनासारखे कुठेतरी बागडून पाहू

पाटी पुसली आहे सारी गतकाळाची
आता केवळ रेघोट्या आठवून पाहू

अजून त्यांचा ताबा आहे मंचावरती
ताबा घेण्यापूर्वी खाली बसून पाहू

धापा टाकत जातो कायम जिकडेतिकडे
आयुष्यच हे श्वासामध्ये भरून पाहू

भेटायाला तिने घातली आहे बंदी
तिच्याभोवती भासांमधुनी फिरून पाहू

कधी ना कधी तिथे जायचे आहे नक्की!
इथून जाण्यापूर्वी इथले असून पाहू!

नकोच आता कोणाचीही वाट पाहणे
स्वतः स्वतःची सोबत बनुनी, निघून पाहू

नचिकेत जोशी (१०/६/२०१३)

Monday, April 25, 2016

डायरी

केव्हातरी सोशिकपणा माझ्यातला संपेलही
ठेवायला डोके मला खांदा तुझा लागेलही

तंद्रीमध्ये काही बिया थुंकून ती गेली पुढे
कुठली तरी रुखरुख तिची मातीतुनी उगवेलही

नात्यातही धोरण हवे - आत्ता कुठे कळले मला!
निष्ठेतला निष्फळपणा माझा मला उमगेलही

काही दिवस सांभाळली होती तिची मी डायरी
माझ्यातल्या खोलीमध्ये घुसमट तिची नांदेलही!

बोलावणे आले मला, अद्यापही आली न ती
इतक्यात सांगावे कसे? येईलही, थांबेलही!

येणारही नाही कुणी शोधायला येथे मला
स्मरणांमध्ये आहे, उद्या दुनिया मला विसरेलही

- नचिकेत जोशी (१०/३/२०१६)